Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना
खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात
मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित
राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा
आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय
हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
** चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च
मानाचे दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान; शेरशाह-सर्वोत्कृष्ट
चित्रपट तर पुष्पा चित्रपटाला-मुव्ही ऑफ दी इयर पुरस्कार
** चारा घोटाळ्याच्या पाचव्या
प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षे तुरुंगवास आणि ६० लाख रुपये दंड
** राज्य सरकार
मराठवाड्यासोबत
दुजाभाव करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका
** औरंगाबाद इथं शेततळ्यात
पोहण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू
आणि
** उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्व १५ जागा जिंकून महाविकास आघाडीला एकहाती सत्ता
****
चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च
मानाचे दादासाहेब फाळके पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. शेरशाह या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट
चित्रपट तर पुष्पा या चित्रपटानं मुव्ही ऑफ दी इयर पुरस्कार पटकावला आहे. सरदार उधम
या चित्रपटानं समीक्षकांचा पुरस्कार मिळवला. 83 या चित्रपटासाठी रणवीरसिंह याला सर्वोत्कृष्ट
अभिनेता तर मिमी चित्रपटासाठी क्रीती सेनॉन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
मिळाला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा तसंच कियारा अडवाणी यांनी शेरशहा चित्रपटातल्या अभिनयासाठी
समीक्षकांचा पुरस्कार मिळावला आहे. अहान शेट्टी यानं तडप चित्रपटातून अभियानात सर्वोत्तम
पदार्पणासाठीचा पुरस्कार पटकावला. विशाल मिश्रा तसंच कनिका कपूर यांनी पार्श्वगायनासाठीचे
पुरस्कार पटकावले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी
विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विजेत्यांचं
अभिनंदन केलं आहे.
****
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख
लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातल्या पाचव्या 'डोरंडा कोषागार प्रकरणी' रांचीतल्या
विशेष सीबीआय न्यायालयानं पाच वर्षे तुरुंगवास आणि ६० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
लालूप्रसाद यादव यांनी डोरंडा कोषागारातून १३९ कोटी रुपये अवैधरीत्या काढल्याचं १५
फेब्रुवारीला न्यायालयात सिद्ध झालं होतं. यादव यांच्यासह या प्रकरणातील ३८ दोषींनाही
विशेष सीबीआय न्यायालयाने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षा सुनावली. या प्रकरणातल्या
इतर २४ जणांची पुराव्या अभावीनिर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. १९९६ सालापासून सुरू असलेल्या या खटल्याचा तब्बल २६ वर्षानंतर
निकाल लागला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं
लालू प्रसाद यादव यांच्या वकीलांनी सांगितलं. यादव यांना चारा घोटाळ्याच्या चार वेगवेगळ्या
प्रकरणात एकूण १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.
****
राज्य
सरकार मराठवाड्यासोबत
दूजाभाव करत असल्याची टीका विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. औरंगाबाद
जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या लासूर स्टेशन इथं आमदार प्रशांत बंब यांनी भरवलेल्या
महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा तसंच १२० कोटी
रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी
ते बोलत होते. राज्य सरकारच्या मनामध्ये मराठवाड्याविषयी द्वेष आहे, म्हणूनच मराठवाड्याची
कवच कुंडल असलेल्या गोदावरी खोऱ्यातलं १५०
अब्ज घनफूट पाणी मराठवाड्यापर्यंत पोहचू दिलं नाही, असं फडणवीस म्हणाले. औरंगाबाद
शहरासाठी भाजप सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या एक हजार ६८० कोटी रुपयांच्या
पाणी पुरवठा योजनेचं कामं केंद्र सरकारनं दिलेल्या तीनशे कोटी रुपये निधीतून होत
असल्याचं, त्यांनी सांगितलं.
दिव्यांगासाठी
विविध उपकरणे केंद्र सरकारच्या वतीनं दिली जात असून, महिला बचत गटांसाठी एक लाखांपर्यंत
बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याचा लाभ महिला बचत गटांना
होणार असल्याचं फडणवीस म्हणाले. महिला बचत गटाच्या माध्यमातून गंगापूर तालुक्यात होत
असलेल्या मशरुम उत्पादनाचं फडणवीस यांनी कौतूक केलं.
****
मराठी
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या प्रलंबित मागणीसंदर्भात, राज्याचे मराठी भाषा
मंत्री सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री जी. किसन रेड्डी यांची
दिल्ली इथं भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती सुभाष देसाई
यांनी ट्विटरवरून दिली आहे. येत्या मराठी भाषा गौरव दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा
दर्जा मिळेल अशी आशा असल्याचंही देसाई यांनी म्हटलं आहे.
****
आझादी
का अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा
दिन आज साजरा करण्यात येत आहे. यावर्षी चा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन “बहुभाषिक शिक्षणासाठी
तंत्रज्ञानाचा वापर: आव्हाने आणि संधी” या संकल्पनेवर आधारित आहे.
उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मातृभाषा
आपल्याला अनेक प्रकारे सक्षम बनवते, मातृभाषेत संवाद साधून आपल्या भाषेचं जतन आणि संवर्धन
करावं, असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे.
केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला जागतिक मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “भाषा
हे परंपरा आणि संस्कृती यांचं जतन करण्याचं सर्वांत शक्तिशाली साधन आहे” असं गडकरी
यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
इथं शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा मृत्यू झाला. शहरानजिक भांगसीमाता
गड परिसरात आज ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये प्रतीक आनंद भिसे या पंधरा वर्षाच्या,
आणि तिरुपती मारुती कुदळकर तसंच शिवराज संजय पवार या सतरा वर्ष वयाच्या युवकांचा समावेश
आहे. हे तिघे शहरातल्या बजाजनगर इथून भांगसी माता गडाकडे सायकल वरून फिरण्यासाठी आले
होते. अग्निशमन दलाच्या मदतीने तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
****
उस्मानाबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्व १५ जागा जिंकून महाविकास आघाडीनं
एकहाती सत्ता मिळवली आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी
पाच जागा मिळाल्या.
****
No comments:
Post a Comment