Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 03 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व
श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक
लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक
आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर
अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी
राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
· कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट.
· कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक एकशे अडुसष्ट कोटी लस मात्रांचं वितरण.
· मनमाड - मुदखेड - डोन या रेल्वेमार्गावर विद्युतीकरणासाठी २२९ कोटी रुपयांचा
निधी.
·
आणि
· रमेश देव यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार.
****
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये
घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी
आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. गेल्या चौदा दिवसांमध्ये हे प्रमाण कमी झालं
असल्याचंही ते म्हणाले. गेल्या चोवीस तासांमध्ये या संसर्गाचे एक लाख ७२ हजार नवे रुग्ण
आढळले आहेत. या काळात रुग्ण सापडण्याचं प्रमाण दहा पूर्णांक ९९ शतांश टक्के झालं असल्याचं
त्यांनी नमुद केलं. आठ राज्यांमध्ये रुग्णांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. केरळ
आणि मिझोराममध्ये नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. अठरा वर्षांवरच्या ९६ टक्के युवकांना कोरोना विषाणू
संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाची पहिली मात्रा देण्यात आली असून ७६ टक्के युवकांच्या
दोन्ही मात्रा झाल्या आहेत. सहा राज्यांमध्ये शंभर टक्के लसीकरण झालं असून लसीकरणामुळं
मृत्यूचं प्रमाण कमी झालं असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.
****
देशातल्या पात्र लोकसंख्येला कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक एकशे
अडुसष्ट कोटी लस मात्रा आता पर्यंत देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे ही माहिती दिली आहे. देश कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या
लढाईमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचही आरोग्य
मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात
त्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात भाग घेण्याची मुदत आज संपत आहे. या कार्यक्रमाचं
हे पाचवं वर्ष आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीचा कार्यक्रमही ‘ऑनलाईन’ पद्धतीनच
होणार आहे. या कार्यक्रमासाठी इयत्ता ९वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक तसंच पालकांची
निवड ‘ऑनलाईन’ स्पर्धेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
****
ग्रामीण भागातल्या सामान्य गोरगरीब जनतेला स्वत:च्या हक्काचं छत मिळावं
यासाठी राज्यात सुरू ‘महाआवास’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या ३१ मार्च पर्यंत
पाच लाख घरं बांधण्याचा दृढनिश्चय करण्याच्या सूचना ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन
मुश्रीफ यांनी केल्या आहेत. मुंबईत आज यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी
मुश्रीफ बोलत होते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख घरं बांधून उद्दीष्टपूर्ती
करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
मनमाड - मुदखेड - डोन या रेल्वेमार्गावर विद्युतीकरण करण्यासाठी केंद्र
सरकारनं २२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे
मुख्य व्यवस्थापक संजीव किशोरे यांनी दिली आहे. त्यांनी दूरदृश्य संवाद प्राणालीच्या
माध्यमातून पत्रकारांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे मार्ग विद्युतीकरणासाठी
पिंपळखुटी - मुदखेड आणि परभणी - परळी वैजनाथ या मार्गासाठी १२९ कोटी रुपये, परळी वैजनाथ
- विकाराबादसाठी १०९ कोटी रुपये, पूर्णा - अकोलासाठी १०३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात
आला असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेसाठी नऊ हजार
१२५ कोटी रुपये निधीची तरतूद केंद्र सरकारनं केली असल्याचं किशोरे म्हणाले.
****
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत विलेपार्ले
इथल्या पारशी वाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आधी सकाळी ११ ते दुपारी
दीड या वेळेत त्यांचा पार्थिव देह त्यांच्या वर्सोवा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी
ठेवण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र नव निमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसंच ज्येष्ठ
अभिनेते रझा मुराद, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, किरण कुमार, महेश मांजरेकर यांच्यासह
अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं.
****
किराणा दुकानात वाईन विक्री कारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात
‘ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लीमीन – एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद शहरातल्या
क्रांतीचौक इथं आज धरणे आंदोलन केलं. राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकावत या कार्यकर्त्यांनी
यावेळी निदर्शनं केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.
****
किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध
सातारा जिल्ह्यात आज व्यसनमुक्त युवक संघ आणि वारकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात आलं. पोवई
नाका ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान दंडवत घालत हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलन
आणखी तीव्र करण्याचा इशारा वारकरी महामंडळाचे मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी यावेळी
दिला.
****
वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू, इतर गौण खनिज संपत्तीची
चोरी थांबवण्यासाठी महसूल प्रशासन आता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत या संपत्तीवर लक्ष
ठेवत आहे. या भागातली ही चोरी रोखण्यासाठी ‘ड्रोन’ कॅमेऱ्याचा उपयोग केला जात आहे.
जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही सुरू आहे.
तहसीलदार महेंद्र गिरमे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह या भागातल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी
‘ड्रोन’ द्वारे नदी पात्राची निगराणी करत आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर-जालना महामार्गावर मालेगाव शिवारात काल संध्याकाळी
दोन दुचाकींच्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला तर तिघं गंभीर जखमी झाले. अपघातातल्या
जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात २५ शिवभोजन केंद्र कार्यान्वित असून एकूण २१ शिवभोजन
केंद्रावर ‘सीसीटिव्ही कॅमेरा’ बसवण्यात आले आहेत. उर्वरित चार केंद्रांवर दोन दिवसांत
हे कॅमेरा बसवण्याबाबत प्रशासनाकडून सुचना देण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment