Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 05 February 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व
श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक
लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक
आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर
अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी
राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
· राजकीय नेते तसंच उद्योजकांनी आपल्या भागाच्या विकासाचं धोरण निश्चित
करावं - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं आवाहन.
· वेंगुर्ला नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा सीबीएसई अभ्यासक्रमात
समावेश.
· औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध
निवड.
आणि
· १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेत स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात
थोड्याच वेळात अंतिम सामना.
****
उत्पादन, विपणन आणि बाजारपेठ याचा अभ्यास करुन उद्योजकांनी आपापल्या भागाच्या
विकासाचं धोरण निश्चित करावं, असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
यांनी केलं आहे. ते आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री असोसिएशनच्या कार्यक्रमात
बोलत होते. राज्यातल्या नेत्यांनी अर्थसंकल्पात घोषित योजनांचा अभ्यास करुन आपल्या
विभागाच्या विकासासाठीचं धोरण ठरवावं असंही ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी
येणारा २५ वर्षाचा काळ अमृत काळ असून अर्थमंत्र्यांनी भविष्यातली धोरणं या अर्थसंकल्पात
मांडली आहेत, असं डॉ. कराड यांनी यावेळी नमूद केलं.
****
देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढत असून व्यापार, उद्योग
आणि कृषि क्षेत्रात राज्याची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री
नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं महाराष्ट्र विकास परिषदेच्या कार्यक्रमात
बोलत होते. वीज, पाणी, समुद्र किनारे आणि उत्क़ृष्ट रस्ते या सर्व उपलब्ध साधनसामुग्रीच्या
मदतीने आपण नजीकच्या भविष्यात राज्याचा विकास करू शकतो असं ते म्हणाले. राज्याच्या
अर्थव्यवस्थेत इथेनॉल महत्त्वाचं आहे असं त्यांनी नमूद केलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला नगरपरिषदे मार्फत शहरात राबवण्यात
आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या अभ्यासक्रमात
समावेश करण्यात आला आहे. इयत्ता ६वीच्या विज्ञान विषयात “कचरा-संघटन एवं निपटान” या
धड्यात वेंगुर्ला शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वच्छतेतून
समृद्धीकडे असा बीजमंत्र घेऊन सुरू झालेल्या स्वच्छतेच्या चळवळीची देशपातळीवर दखल घेतली
गेली असून, या उपक्रमासाठी वेंगुर्ला नगर परिषदेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
****
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालवली आहे, मात्र त्या
उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाच्या सूत्रांनी
सांगितलं. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे लता दिदींना गेल्या ९ तारखेपासून मुंबईत
ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, उपचारानंतर त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत.
मात्र आज अचानक त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं, त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार
सुरू आहेत.
****
राज्याच्या विविध भागातून लसीकरणासाठी नागरिकांचा मिळणारा अत्यल्प प्रतिसाद
लक्षात घेऊन हर घर दस्तक ही मोहीम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक
फेब्रुवारीनंतर या मोहिमेला मुदतवाढ देण्यास आरोग्य विभागाकडून नकार देण्यात आल्याचं,
राज्य लसीकरण कार्यालयातून सांगण्यात आलं.
****
कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियानात आतापर्यंत कोविड लसीच्या एकशे एकोणसत्तर
कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. कोविड विरुद्ध लढाईतील हा महत्त्वाचा टप्पा
असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगानं लवकर जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश
आंबेडकर यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या निवडणुकांमध्ये
कॉंग्रेस सोबत युती करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारच्या किराणा दुकानात
वाईन विक्री निर्णयाचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी समर्थन केलं.
****
वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरभ यांनी राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या
शिष्टमंडळाला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद आज औरंगाबाद इथंही उमटले. औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीनं सर्व अध्यापकांनी
एक दिवसाची सामुहिक रजा घेतली. तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या
समोर आंदोलन केलं.
धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी आज सामूहिक
रजा घेत कामबंद आंदोलन केलं. त्यामुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची
आज बिनविरोध निवड झाली आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांचे समर्थक दिलीप
निरफळ यांची संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदासाठी भुमरे आणि महसुल
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांत सामना झाल्यानं, ही निवडणूक चुरशीची झाली.
यात भुमरे समर्थक निरफळ हे ९ विरुद्ध ५ मतांनी विजयी झाले.
****
१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात
अंतिम सामना होणार आहे. वेस्ट इंडिजमधल्या नॉर्थ साउंड मैदानावर, भारतीय वेळेनुसार
थोड्याच वेळात, साडे सहा वाजता हा सामना सुरु होणार आहे. या स्पर्धेत सर्व साखळी सामने
जिंकून तसंच उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत ९६ धावांनी विजय मिळवत, भारतीय संघ
अंतिम फेरीत दाखल झाला. भारतानं आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं
आहे.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेला उद्यापासून सुरवात होत आहे. अहमदाबाद इथं दुपारी दीड वाजता सामन्याला सुरवात
होईल. या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.
****
बीड विधानसभा क्षेत्रात १०० कोटी ६० लाख रूपयांच्या विविध विकास कामांचं
भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते परवा सोमवारी होणार आहे.
या कामांमुळे बीड मतदार संघाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. या विकास कामांमध्ये जिल्हा
रुग्णालयातल्या वाढीव २०० खाटांच्या इमारतीचं बांधकाम, तालुका क्रीडा संकुलाच्या जागेवर
बॅडमिंटन हॉल-जिम हॉल आणि कार्यालय इमारत बांधकाम, नवीन व्हीव्हीआयपी विश्रामगृह आणि
सध्याच्या विश्रामगृहाचं नूतनीकरण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारत
आणि कार्यशाळा बांधकाम तसंच अनेक रस्ते, जोडरस्ते आणि पुलांच्या बांधकामांचा समावेश
आहे.
****
No comments:
Post a Comment