Tuesday, 8 February 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 February 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नवं रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

·      देशभरात १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याकडे वाटचाल सुरू; राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पंतप्रधानांचं उत्तर; काँग्रेसचा सभात्याग

·      कोविड प्रतिबंधक लसीकरणामुळे मृत्यू दरात घट

·      बीड जिल्ह्यातल्या वाळू माफियांविरुध्द कडक कारवाईची माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मागणी

आणि

·      जालना जिल्हा रुग्णालयातून अर्भक चोरी प्रकरणी एका महिलेस अटक; बाळ आईकडे सुपूर्द

****

देशातल्या १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याकडे देशाची वाटचाल सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. देशानं कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपायांचं जगभरात कौतुक होतं असल्याचं सांगत, पंतप्रधानांनी आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि वैज्ञानिकांच्या कष्टांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातून शतक महोत्सवी वर्षापर्यंत पुढच्या २५ वर्षात देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी निर्णय घेण्याची योग्य वेळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्थानिक पातळीवरच्या आकांक्षांची पूर्तता होणं गरजेचं असून त्यामुळे देशाची प्रगती आणखी जोमानं होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधान उत्तर देत असताना, काँग्रेसह काही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी संसद परिसरात याबाबत पत्रकारांशी बोलताना, सरकारच्या विविध योजना तसंच कामकाजावर सदस्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याऐवजी, पंतप्रधानांनी काँग्रेसवर आरोप करण्याला प्राधान्य दिलं, या शब्दांत पंतप्रधानांच्या उत्तरावर टीका केली.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरणामुळं कोविड रुग्णांच्या मृत्यू दरात आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारनं कोविड मृतांची संख्या लपवली नसल्याचं मांडवीय यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत देशात कोविड संसर्गानं पाच लाख ३३ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला प्रारंभ झाला. काँग्रेस खासदार पी चिदंबरम यांनी बेरोजगारीच्या मुद्याकडे लक्ष वेधत, दर वर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्यात सरकार अयशस्वी झाल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, कोविडमुळे झालेले मृत्यू यासंदर्भात आकडेवारी देण्यातही सरकार अपयशी ठरल्याची टीका चिदंबरम यांनी केली.

भाजपचे अरुणसिंह यांनी हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षांचं प्रतिबिंब असल्याचं म्हटलं आहे. हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक स्थैर्य प्रदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

****

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असून वाळू माफियांविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कायदे करुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आकाशवाणीशी बोलतांना केली आहे. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला इथं वाळूसाठी खोदलेल्या खड्यात पडून चार लहान मुलांचा परवा मृत्यू झाला, या घटनेबद्दल मुंडे यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. त्या म्हणाल्या –

बीडमधल्या या माफियांमुळे किती लोकांचे असे जीव जाणार आहेत? हा माझा प्रश्न आहे. कलेक्टरांनी तात्काळ याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरवर अशी माझी मागणी आहे.

अहमदनगर - बीड - परळी या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनानं निधी दिला नसल्यानं हे काम अपूर्ण असल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत, रेल्वेमार्गासाठी राज्यशासनानं दिलेल्या निधीमुळेच या मार्गावर इंजिन धावल्याचं सांगितलं. आज बीड इथं प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. ते म्हणाले –

आजपर्यंत राज्य सरकार आगाऊचा वाटा देत गेली. म्हणून या ठिकाणी आष्टीपर्यंत आज इंजिन हाय स्पीडने धावलं. वस्तूस्थिती ही आहे की राज्य सरकार निधी देतांना केंद्राच्या बरोबरीनं कुठेही कमी पडलेलं नाही. उलटं जास्त निधी देत आला.

 वाळूच्या खड्डयात बुडून चार बालकांच्या मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दिले आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

****

डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू पदी झालेल्या नियुक्तीची चौकशी करावी अशी मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत असतांना त्या जवळपास तीन वर्षे विना वेतन रजेवर होत्या. तसंच पंडित यांनी शिक्षण क्षेत्रासाठी कोणते योगदान दिलं, असा प्रश्न माजी अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला आहे.

****

जालना इथल्या जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयातून नवजात बालकाची चोरी करणाऱ्या संशयित महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथून ताब्यात घेतलं. संशयित महिलेकडे असलेल्या बालकास पोलिसांनी जालना इथं घेऊन येत त्याच्या आईकडे सुखरुप सोपविलं. दरम्यान, जिल्हा महिला रुग्णालयातून काल या बालकाच एका बुखराधारी महिलेनं अपहरण केलं होतं.

****

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं अवैध विदेशी मद्याचे एक हजार ३७४ खोकी आणि दोन वाहने असा एकूण एक कोटी २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रक चालक चंद्रकांत शेरे आणि महावीर भोसले यांच्याविरोधात दारुबंदी कायद्याअन्वये कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

जालना जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे ४० तर परभणीत नवे ३४ रुग्ण आढळले आहेत.

****

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना उद्या अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे. या सामन्यात के एल राहुल, मयंक अग्रवाल आणि नवदीप सैनी यांना खेळवलं जाणार आहे. या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकत १-० नं आघाडी घेतली आहे.

//*********//

No comments:

Post a Comment