Wednesday, 2 February 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

नवा अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुणांवर केंद्रीत असून त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारत अर्थसंकल्प या विषयावर ते आज जनतेशी संवाद साधत होते. नव्या संधींचा, नव्या संकल्प पूर्तीचा हा काळ असून, भारत आत्मनिर्भर बनावा आणि याचा पाया एक आधुनिक भारत असावा, असं ते म्हणाले. हर घर नल से जल, प्रधानमंत्री आवास योजना, शिक्षण, कृषी, संरक्षण यासारख्या क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. सरकारनं आकांक्षित जिल्हा अभियान सुरु केलं असून, अशा जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ते विकास अशा विविध क्षेत्रात काम करण्यात येत असून, या कामाची संयुक्त राष्ट्रसंघाने प्रशंसा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानावर आधारित बनवण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक योजना प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले. स्टार्ट अप, पीएम किसान सन्मान निधी, डिजिटल शिक्षण, बँकिंग प्रणाली, इंटरनेट सुविधा, फाईव्ह जी सेवा अशा विविध क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. 

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १६७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५७ लाख ४२ हजार ६५९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १६७ कोटी २९ लाख ४२ हजार ७०७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

फायजर आणि बायोटेक या औषध निर्माण कंपन्यांनी पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोविड-19 लसीचा आपत्कालीन वापर करण्याकरता परवानगी मागितली आहे. सहा महिने ते चार वर्ष वयोगटातल्या मुलांना कोरोनाच्या वर्तमान आणि संभाव्य भविष्यातल्या प्रकारांपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी लसीच्या तीन मात्रा आवश्यक असतील, असं फायझरनं एका निवेदनात म्हटलं आहे. अशी मंजुरी मिळाल्यास, फाइझर-बायोटेक लस ही पाच वर्षांखालील बालकांसाठी उपलब्ध असलेली पहिली COVID-19 लस असेल.

****

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीतून सूट देण्याचा कालावधी या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत वाढवला आहे. तसेच उप-सचिव स्तराच्या खालील ५० टक्के कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याचा कालावधीही, १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे. दिव्यांग व्यक्ती आणि गरोदर महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट दिली जाईल. कार्यालयात उपस्थित राहणारे केंद्र सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेगवेगळ्या वेळांचं पालन करावं लागेल, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या प्रत्येक कामगारांना तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळ-ई.एस.आय.सी.चं किमान ३० खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे. कामगार मंत्री तथा कमर्चारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली. कर्मचारी राज्य विमा महामंडळच्या प्रादेशिक मंडळाची काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. दहा किलोमीटरनंतर एक या महामंडळाची अट काढण्यात येणार असून आता लोकसंख्या तसंच आवश्यकतेनुसार रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. कोविड काळात ई.एस.आय.सी.च्या रुग्णालयांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं.

****

महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळांतर्गत खतांचं उत्पादन वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असे निर्देश कृषी मंत्री दादा भूसे यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना चालू हंगामासह खरीप २०२२ हंगामात अडचण येणार नाही यासाठी खतांचा पुरवठा सुरळीत होईल, असं नियोजन करावं, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

****

उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारी अमृत पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करण्यात यावी यासाठी पुढील एक महिन्यात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. लातूर इथं काल या योजनेच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या अमृत योजनेतून पुढील काळात आणखी चार हजार घरांना नळ जोडण्या देण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.

****

परभणी इथले सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उर्सला यावर्षी कोविड संसर्गामुळे परवानगी दिलेली नाही, असं जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. काल या उर्सनिमित्त संदलला सुरुवात करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या दर्ग्याचे धार्मिक आणि पारंपारिक अत्यावश्यक कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जातील, असंही त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment