Thursday, 3 February 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राष्ट्रपती अभिभाषधन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला संसदेत प्रारंभ

·      बांधकाम मजुरांच्या अर्थसहाय्यासाठी तीन नवीन योजना राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय

·      आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी

·      चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन

·      राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ११३ नवे रुग्ण, उस्मानाबादमधील दोन तर औरंगाबाद जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश

·      कोविड संसर्गाचे १८ हजार ६७ नवे रुग्ण, मराठवाड्यात दहा जणांचा मृत्यू तर एक हजार ५४५ बाधित

·      राज्य शासनाच्या वाङ्गमय पुरस्काराची घोषणा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भारत सासणे यांना यावर्षीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

आणि

·      १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी विजय मिळवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

****

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला काल संसदेत प्रारंभ झाला. लोकसभेत या चर्चेत बोलताना, भारतीय जनता पक्षाचे खासदार हरीश द्विवेदी यांनी, देशातल्या लाखो युवकांना कुठल्याही भेदभावाशिवाय, पारदर्शकरित्या रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं सांगितलं. अयोध्येत राम मंदिर उभारणी, जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवणं, यासारख्या केंद्र सरकारनं केलेल्या विविध कामांचा त्यांनी आढावा घेतला.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर कडाडून टीका केली. मेड इन इंडियासाठी लघु आणि मध्यम उद्योगांना बळ देणं आवश्यक आहे, मात्र केंद्र सरकार हे क्षेत्र उध्वस्त करत असल्याचा आरोप, गांधी यांनी केला.

राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा काल सुरू झाली. भाजपच्या खासदार गीता उर्फ चंद्रप्रभा यांनी हा धन्यवाद प्रस्ताव मांडला. समाजातल्या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र सरकार अविरत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेत बोलताना, लाभात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमातून, केंद्र सरकार निर्गुंतवणूक करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, डीएमके पक्षाचे तिरुची शिवा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विकास रंजन भट्टाचार्य यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

****

राज्यसभेत काल शून्य काळात सदस्यांनी रेल्वे परीक्षेचा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी या परीक्षेच्या निकालातल्या कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची तसंच उमेदवारांच्या तक्रारींचा निराकरण करण्याची मागणी केली.

****

केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणसाच्या हाती फारसं काही लागलं नसल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते काल बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. अर्थसंकल्पात कर रचनेत कोणतेही बदल झाले नसल्यानं, सामान्य माणूस आणि नोकरदारांना दिलासा मिळेल असं या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, सुपर मार्केट आणि मॉल्समधून वाईन उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध होत असल्यानं तो निर्णय मागे घेतला गेला; तरी त्यात वाईट वाटण्याचं कारण नाही, असं पवार म्हणाले. या निर्णयाला विरोध करणाऱ्यांनी वाईन आणि मद्य यातला फरक समजु घेतला पाहिजे अशी भूमिका पवार यांनी मांडली.

****

बांधकाम मजुरांच्या अर्थसहाय्यासाठी तीन नवीन योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. बांधकाम मजुराच्या एका मुलीच्या विवाहकरता ५१ हजार रुपये सानुग्रह निधी, बांधकाम मजुराचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह मूळ गावी पाठवण्याचा वाहतूक खर्च, तसंच मजुराचा अपघात होऊन हात अथवा पाय निकामी झाला, तर कृत्रिम हात किंवा पाय बसवण्यासाठी अर्थसहाय्य, अशा या तीन योजना आहेत. इमारत आणि अन्य बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या बांधकाम मजुरांना, या योजनांचा लाभ मिळेल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. या तीन योजनांची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी मंडळाला दिले आहेत.

****

आमदार नितेश राणे काल कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले. न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कणकवली इथले शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी आमदार राणे यांचा नियमित जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं परवा फेटाळला होता, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दिलेलं आव्हान मागे घेत, राणे काल कणकवली दिवाणी न्यायालयासमोर हजर झाले.

दरम्यान, सिंधुदुर्ग न्यायालयासमोर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते.

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी पाटलाची पोर या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या आंधळा मागतो एक डोळाया सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या १९६२ साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

२०१३ साली रमेश देव यांना ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. २००६ साली आलेल्या निवडुंग या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती. रमेश देव यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले ११३ नवे रुग्ण आढळले. यापैकी ४२ रुग्ण नागपुरात आढळले असून, बृहन्मुंबईत तसंच ठाण्यात प्रत्येकी १८, नवी मुंबई १३, पुणे सात, अमरावती चार, सातारा तीन, उस्मानाबाद तसंच सिंधुदूर्ग प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद, उल्हासनगर, रायगड, तसंच नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३३४ झाली असून, यापैकी एक हजार ७०२ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८ हजार ६७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७ लाख ५३ हजार ५४८ झाली आहे. काल ७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ७८४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८ शतांश टक्के आहे. काल ३६ हजार २८१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७ लाख ३३ हजार ६३३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९ पूर्णांक ८७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक लाख ७३ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ५४५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये परभणी तसंच नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, बीड दोन, तर औरंगबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४२४ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात २५९, नांदेड २१२, उस्मानाबाद १६३, हिंगोली १५४, जालना १२६, बीड ११०, तर परभणी जिल्ह्यात ९३ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आज आणि उद्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राज्यपाल विमानाने मुंबईहून औरंगाबाद इथं पोहोचतील. आज सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर त्यांचा वेळ राखीव असेल. उद्या सकाळी ते मोटारीने सिंदखेडराजाकडे प्रयाण करणार आहेत.

****

राज्य शासनाच्या वाङ्गमय पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. यावर्षीचा विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

श्री. पु. भागवत पुरस्कार, मुंबईच्या लोकवाङ्गमय गृह या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे.

डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार, रमेश वरखेडे तसंच पुण्याच्या मराठी अभ्यास परिषदेला, तर कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार, डॉ. चंद्रकांत पाटील तसंच मुंबईच्या मराठी भाषा अभ्यास केंद्राला जाहीर करण्यात आला आहे. दोन लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर इथले नारायणराव वाघमारे महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक, लेखक डॉ. माधव जाधव यांच्या, "चिन्हांकित यादीतली माणसं", या कथासंग्रहाला, दिवाकर कृष्ण कथा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

औरंगाबाद शहरात कर वसुलीसाठी आजपासून मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता कराच्या वसुलीसाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आलं आहे. शहरात कोरोनाच्या संसर्गात मालमत्ता कराच्या वसुलीचं प्रमाण अत्यंत कमी झालं असून, ही मोहिम राबवण्यात येत आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. मालमत्ता धारकांनी आणि व्यापार्यांनी त्यांच्याकडे थकलेले मालमत्ता कर जमा करुन महापालिकेला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

परळी -बीड- अहमदनगर रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतुक लवकरच सुरु होणार आहे. अहमदनगर ते आष्टी दरम्यान बारा डब्यांची रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावर गेल्या २० डिसेंबरला चाचणी घेण्यात आली होती. ही रेल्वे थेट मुंबई पर्यंत चालवण्याचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

महसूल आणि ग्रामविकास विभागानं नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी प्राधान्य द्यावं, शा सूचना महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित विभागनिहाय आढावा बैठकीत ते काल बोलत होते. गौण खनिज आणि वाळू उपसाबाबत महसूल उदिष्टपूर्ती करणं , प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना हक्काचा निवारा देणं तसंच राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून रोजगाराबरोबरोच विकास काम पूर्ण करणं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

१९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. अँटिग्वा इथं काल झालेला हा सामना भारतानं ९६ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला २९१ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ १९४ धावातच सर्वबाद झाला. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच फेब्रुवारीला होणार आहे. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सात फेब्रुवारी पासून सुरु करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी परवानगी दिली आहे. यापूर्वीच जिल्हयात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

****

हिंगोली इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल एचडीएफसी एग्रो पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची नासधुस केली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याची विचारणा केली असता काहीच उत्तर न मिळाल्यानं, संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयाची नासधूस केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment