Thursday, 3 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र शासनाने २०१९ मध्ये केंद्रीय मोटार वाहन कायदा लागू केल्यानं, राज्याने २०१७ मध्ये मंजूर केलेलं विधेयक मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्र शासनाच्या केंद्रीय मोटार वाहन सुधारणा कायद्यात राज्याने प्रस्तावित केलेल्या बाबींचा समावेश असल्यानं हे विधेयक मागे घेण्यात आलं.

राज्यातल्या अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचं बळकटीकरण करण्यासाठी नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणासोबत सामंजस्य करार करण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

पीसीपीएनडीटी-गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र लिंग निवड प्रतिबंध कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये, दोषसिध्दीचं प्रमाण वाढणं आवश्यक असून, यासाठी कार्यप्रणाली तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. लिंग गुणोत्तर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

****

मुंबईतल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातल्या एका गैरव्यवहार प्रकरणी सुरु असलेल्या तपासात सीबीआयनं काल अंदाजे १३ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली. मुंबईत कांदिवली इथल्या आपल्या कार्यालयात बनावट खात्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्याचा आरोप, ईपीएफओच्या नवी दिल्ली इथल्या मुख्यालयानं केला होता. 

****

जालना इथल्या मत्स्य व्यवसाय कार्यालयातला सहायक आयुक्त सुनील वंजारी आणि विकास अधिकारी शशिकांत जाधव या दोघांविरोधात, दीड लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तलावाच्या मासेमारीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचा अवर्षण प्रस्ताव मंजूर करून, २१ लाख रुपये महसूल माफ करण्यासाठी या दोघांनी ही लाच मागितली होती.

****

लातूर जिल्ह्यातील तळेगांव इथं काल केलेल्या कारवाईत २ लाख ६६ हजार ७४० रुपयांचा अवैध मद्यसाठा आणि एक चारचाकी गाडी जप्त करण्यात आली. उदगीर आणि देवणी पोलिसांनी संयुक्त रित्या केलेल्या कारवाईत एकूण १० लाख १६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

No comments:

Post a Comment