Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 February 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
शेतकऱ्यांना किमान आधारभूत
किंमत देण्याचा केंद्र सरकारनं आज पुनरुच्चार केला. किमान आधारभूत किमतीला अधिक प्रभावी
बनवण्यासाठी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर समिती स्थापन करण्यात येईल,
असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत सांगितलं. सरकारने
किमान आधारभूत किमतीत दीडपट वाढ केली असून, या भावात शेतकऱ्यांकडून सातत्याने खरेदी
केली जात असल्याचं कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी सभागृहात सांगितलं.
राज्यसभेत आज तामिळनाडूच्या
राज्यपालांनी राज्य सरकारनं पारित केलेलं विधेयक मंजूर न केल्याचा मुद्दा उपस्थित करुन,
द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या सदस्यांनी, कामकाजावर बहीष्कार टाकला. तामिळनाडू विधानसभेनं
राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत सूट देण्याची तरतूद असलेलं विधेयक पारित
केलं होतं. मात्र राज्यपालांनी हे विधेयक विद्यार्थ्यांच्या हिताचं नसल्याचं सांगून
ते मंजूर केलं नाही. आज राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर डिएमकेच्या सदस्यांनी हा मुद्दा
मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी त्यास नकार दिला.
यामुळे डीएमके सदस्यांनी सभात्याग केला.
****
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
पदव्यूत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश
परीक्षा - नीट पीजी २०२२ सहा ते आठ आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. याआधी ही परीक्षा १२
मार्च रोजी होणार होती. आता ती परीक्षा मे-जून मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नीट पीजी २०२१ या परीक्षेचं समुपदेशन याच दिवशी होणार असल्यानं ही परीक्षा पुढे ढकलण्याची
मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात
आली होती.
****
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिंदखेड राजा इथं मोती तलावाची पाहणी
केली आणि राजमाता जिजाऊंचा जन्म स्थळाला भेट दिली. या पुरातन वास्तू अनमोल ठेवा असल्याचं
ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली
सिनेट सदस्यांनी काल राज्यपालांकडे, विद्यापीठाच्या स्वायत्ततेला बाधा पोहोचवणाऱ्या
राज्य सरकारच्या विधेयकास मंजुरी न देण्याची मागणी केली. औरंगाबाद इथं काल त्यांनी
राज्यपालांना या मागणीचं निवेदन सादर केलं.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या
अंमलबजावणी बाबत कुठलीही ठोस भूमिका न घेता महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठांना आपल्या
कक्षेत घेण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांची प्र-कुलपती पदी, तर विद्यापीठ सार्वजनिक
कायद्यात बदल करत राज्यपाल ऐवजी राज्य सरकारच्या शिफारसीनुसार कुलगुरूंची निवड करण्याचा
निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे शिक्षण व्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न
असून, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये महाराष्ट्र सरकारने केलेले बदल रद्द करावेत,
तसंच या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी करू नये, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी
यांची आज जयंती. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जगभरातल्या शास्त्रीय संगीत रसिकांनी
पंडितजींना अभिवादन केलं आहे. पुण्यात आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आजपासून ‘अभिवादन’
या सांगितिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमा
दरम्यान रसिकांना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचं गायन
ऐकण्याची संधी मिळणार आहे.
****
राज्यातल्या जनावरांच्या
विम्यासंदर्भातला प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला असून, या प्रस्तावास मंजुरी मिळावी,
तसंच याबाबतचा निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन
मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे
केली आहे. त्यांनी काल रुपाला यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राष्ट्रीय पशुधन मिशनअंतर्गत
राज्याकडून येणाऱ्या प्रस्तावास मंजुरी आणि परदेशी संकरित गायी आणि बकऱ्यांच्या आयातीबाबत
परवानगी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
****
राज्यात महाआवास अभियानाच्या
दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच लाख घरं ३१ मार्च २०२२ पर्यंत बांधण्याचा दृढनिश्चय करू
या, असं ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. महाआवास अभियान
टप्पा दोन संदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या टप्प्यात गुणात्मक आणि संख्यात्मक
बदल करण्यात आला असल्याचं, मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहराचं मुख्य आकर्षण
क्रांती चौक इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबरच, पुलाखाली दोन्ही बाजूला
छत्रपतींचं जीवन दर्शवणारी शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट
सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे याचं काम सुरू करण्यात आलं असून, एप्रिल
अखेरपर्यंत ते पूर्ण होणार आहे.
****
No comments:
Post a Comment