Saturday, 5 February 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैद्राबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते हैद्राबादच्या पाटणचेरू इथल्या इक्रीसॅट म्हणजेच आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेला भेट देतील आणि संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या सोहोळ्याला सुरुवात करतील. संध्याकाळी पंतप्रधान हैदराबादमधला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ म्हणजेच “समतेचा पुतळा” राष्ट्राला समर्पित करतील. हा २१६ फूट उंच पुतळा अकराव्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ उभारला आहे.

****

जम्मू काश्मीर तसंच दिल्ली परिसरात आज भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता पाच पूर्णांक सात दशांश इतकी होती. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर असून, उत्तर भारतातल्या इतर भागातही त्याचे धक्के जाणवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून भूकंपाबाबत माहिती घेतली.

****

राज्याच्या विविध भागातून लसीकरणासाठी नागरिकांचा मिळणारा अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेऊन हर घर दस्तक ही मोहीम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक फेब्रुवारीनंतर या मोहिमेला मुदतवाढ देण्यास आरोग्य विभागाकडून नकार देण्यात आल्याचं, राज्य लसीकरण कार्यालयातून सांगण्यात आलं.

****

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं १७ राज्यांना महसूल तुटी अंतर्गत नऊ हजार ८७१ कोटी रुपयांचं अनुदान जारी केलं आहे. राज्यांना जारी करण्यात आलेल्या अनुदानाचा हा अकरावा हप्ता आहे. राज्यांना १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार हे अनुदान जारी केलं जातं, जेणेकरून राज्यांच्या महसूल खात्यातील तफावत भरून निघते, असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. वित्त आयोगानं १७ राज्यांना अनुदानाची शिफारस केली आहे आणि ते समान मासिक हप्त्यांमध्ये जारी केलं जाईल. पंधराव्या वित्त आयोगानं २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७ राज्यांना एकंदर एक लाख १८ हजार ४५२ कोटी रुपयांचं महसुली अनुदान देण्याची शिफारस केली आहे. आतापर्यंत पात्र राज्यांना एक लाख आठ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी करण्यात आली असल्याचं, मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

बंगळुरूमधल्या जैव माहिती तंत्रज्ञान आणि उपयोजित जैवतंत्रज्ञान शासकीय संस्थेनं, खाजगी क्षेत्रातील एचसीजी कॅन्सर सेंटरच्या सहकार्यानं केलेल्या अभ्यासात, मानवांमधील मौखिक कर्करोगाला कारणीभूत ११४ जनुकीय रूपं ओळखल्याचा दावा केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर सी एन अश्वथ नारायण यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त काल बेंगळुरू इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदीश कुमार यांची, विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात एक अध्यादेश जारी केला. ही नियुक्ती पुढच्या पाच वर्षांसाठी किंवा जगदीशकुमार यांच्या वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत असेल.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेदच्या वार्षिक उद्दीष्टाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी काल तुळजापूर इथं बैठक घेतली. भूम तसंच परंडा तालुक्यातल्या कामावर वसेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रगती न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. स्वयंसहाय्यता समूहांच्या प्रलंबित बँकनिहाय कर्जप्रकरणांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

****

दक्षिण आशियाई सार्क स्पर्धा आंतराष्ट्रीय स्पर्धा असल्याने यात सहभागी आणि प्राविण्यप्राप्त महाराष्ट्रातल्या खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देतांना त्यांना वर्ग-एक किंवा वर्ग-दोन च्या अधिकाऱ्यांच्या प्रवर्गात सामावून घेण्यात यावं, अशी मागणी परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी राज्याचे क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे केली आहे. त्यावर मंत्री केदार यांनी, याबाबत नवीन धोरण जाहीर करून खेळाडूंना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. या निर्णयामुळे सार्क सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना नोकरीची चांगली संधी प्राप्त होणार आहे.

****

वेस्ट इंडीजमध्ये सुरू एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघाची लढत आज इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय एकोणीस वर्षाखालील संघ सलग चौथ्यांदा विश्र्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरवात होत आहे. अहमदाबाद इथं दुपारी दीड वाजता सामन्याला सुरवात होईल. या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.

****

No comments:

Post a Comment