आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०८ फेब्रुवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
आयकर विभागाच्या नव्या ई-फायलिंग पोर्टलवर कालपर्यंत अंदाजे सहा कोटी
१७ लाख आयकर परतावे, आणि १९ लाख कर लेखा परीक्षण अहवाल नोंदवण्यात आले आहेत. करदात्यांनी
मुदत संपण्याची वाट न बघता आपले कर विवरणपत्र आणि कर लेखा परीक्षण अहवाल भरावेत असं
आवाहन आयकर विभाग ई मेल, एस एम एस आणि ट्वीटरच्या माध्यमातून करत आहे. ई-फायलिंगशी
संबंधित अडचणी सोडवण्यासाठी आयकर विभागानं दोन नवे ई मेल जारी केले आहेत.
****
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या स्थापनेपासून गेल्या वर्षीपर्यंत सुमारे
एक कोटी ३४ लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे, अशी माहिती, केंद्रीय कौशल्य
विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल लोकसभेत दिली. कोविड-19
चा प्रभाव कमी करण्यासाठी मंत्रालयाने कौशल्य परिसंस्थेच्या अंतर्गत ई-स्किल इंडिया
पोर्टल आणि भारत स्किल पोर्टलद्वारे ऑनलाइन कौशल्य प्रशिक्षण, कोविड योद्ध्यांसाठी
गरजेनुसार अल्प कालावधीचे कार्यक्रम, असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणसंदर्भात राज्य मागासवर्ग
आयोगानं हंगामी अहवाल काल राज्य सरकारकडे सुपूर्द केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
महाराष्ट्र सरकारने, ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांची उपलब्ध माहिती राज्य
मागासवर्ग आयोगाला दिली होती. त्या आधारे आयोगानं हा अहवाल तयार केला आहे, अशी माहिती
ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
****
मराठवाड्यात काल ४८७ कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळले, तर सहा
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच तर लातूर
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ८४ नवे रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात ९८, उस्मानाबाद
७७, लातूर ७५, नांदेड ६३, बीड ४१, परभणी ३६, तर जालना जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची
नोंद झाली.
****
रथसप्तमी निमित्त तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरात काल देवीची रथ अलंकार
पूजा करण्यात करण्यात आली होती. यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
No comments:
Post a Comment