▼

Saturday, 19 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत राज्यातल्या गड-किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संभाजीराजे छत्रपती यावेळी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, आरक्षणात येणाऱ्या कायदेशीर अडचणी समजून घेतल्या पाहिजे, असं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण फेटाळलं असून, ५० टक्क्यांवर आरक्षण जाऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच यासंदर्भात कायदा करून आरक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा, असं ते म्हणाले. छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं, त्यांचा तो वारसा सर्वांना सोबत घेवून पुढे जायचं आहे. कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे, असं पवार म्हणाले.

खासदार छत्रपती संभाजी महाराज यांना आजच्या दिवसाच्या निमित्तानं मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करु नये, अशी विनंती अजित पवार यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराजांचं सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यात सर्वत्र शिवजंयतीचा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणच्या शिवाजी पुतळ्याजवळ नागरीक अभिवादन करण्यासाठी जमत आहेत. शिवजयंती निमित्तानं अभिवादन सभा, पोवाडे गायन, रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. 

****

अनधिकृत बांधकामावरुन आपल्याला पाठवलेली नोटीस चुकीची असून, आपण कोणतंही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात सध्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे, कायदा सुव्यस्था नाही, बेकारी वाढली आहे, याकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं राणे म्हणाले. सरकारला विकासाच्या बाबतीत काहीही बोलायचं नसल्यानं, इतर वेगळे विषय समोर आणत असल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला. 

****

भारतानं पात्र प्रौढ लोकसंख्येच्या ८० टक्के लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा पार केला असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका प्रयास’ हे ब्रीदवाक्य घेऊन भारत शंभर टक्के लसीकरणाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १७५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३६ लाख २८ हजार ५७८ मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत या लसीच्या १७५ कोटी तीन लाख ८६ हजार ८३४ मात्रा देण्यात आल्या आहेत. ७६ कोटी ७४ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर, एक कोटी ८७ लाख १४१ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

****

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या चिंचपूर इथल्या वक्फ बोर्ड इनामी जमीन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे तसचं मंडळाधिकारी शिवशंकर सिंघनवाड यांना अटक करण्यात आली आहे. काल विशेष तपास पथकानं ही कारवाई केली. या प्रकरणात यापूर्वीच तीन आरोपींना अटक झाली आहे.

****

रस्ते विशेष दुरूस्ती कार्यक्रमाअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या, कळंब- मोहा- येडशी या रस्त्याची, आणि जिल्हा सरहद्द ते बहुला- इटकूर- मांडवा- बावी- तेरखेडा- कडकनाथवाडी, या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी, राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं, दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी मिळावा म्हणून उस्मानाबाद- कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा आणि अखेरचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना उद्या कोलकाता इथं खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

No comments:

Post a Comment