▼

Saturday, 19 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.

किल्ले शिवनेरीवर सकाळी शिव जन्मसोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संभाजीराजे छत्रपती यावेळी उपस्थित होते.

शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराजांचं सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवजयंती निमित्तानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये अभिवादन सभा, पोवाडे गायन, रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे.

****

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं यंदाची शिवजयंती वैचारिक शिवजयंती म्हणून साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्तानं प्रसिद्ध विचारवंत दिवंगत गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता, हे पुस्तक क्रांती चौकात वितरित केलं असून, याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

****

महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवाकर पथकानं करचुकवेगिरी प्रकरणात एवरांट फेरोमेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्य़ा संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बनावट पावत्या बनवल्याप्रकरणी अटक केली आहे. या कंपनीनं बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट बनवून जवळपास २९ कोटी १७ लाख रुपयाचा परतावा मिळवला होता.

****

नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे भोकर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या परभणी ते ताडकळस तसंच परभणी ते झिरोफाटा दोन राज्य मार्गांवरील अपघाताच्या मालिकांना कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित एजन्सीच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी परभणी इथं खानापूर नाका भागात काल रास्ता रोको आंदोलन केलं.

****

No comments:

Post a Comment