▼

Sunday, 20 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १७५ कोटी ३७ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३० लाख ८१ हजारांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोविडमुक्तीचा दर ९८ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आजवर ७२ कोटी २१ लाखांपेक्षा अधिक कोविड लसीच्या मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. राज्यांकडे आजही ११ कोटी १६ लाख मात्रा शिल्लक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यात ७ जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. यासोबतच पंजाब विधानसभेच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात ५९ आणि पंजाबमध्ये ११७ जागांसाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशात सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१८ टक्क्यांहून अधिक तर पंजाबमध्ये १७ पूर्णांक ७७ टक्क्यांवर मतदान झालं होतं.

****

रुंदीकरणाच्या मागणीसाठी पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्यामध्ये नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी पर्यायी मार्ग आता खुले करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ-एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे. पुणे-मुंबई महामार्ग हा लोणावळ्यातून जाताना अरुंद होतो त्यामुळे या महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी या महामार्गाच्या रुंदीकरणाची मागणी केला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आज हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलक नागरिकांनी सांगितलं.

****

आपण कोणत्याही कोविड नियमांचं उल्लंघन न केल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या म्हटलं आहे. आज मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिस ठाण्यात त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलंत होते. आपल्या विरुद्ध राजकीय सुडापोटी कारवाई होत असून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखला केला असल्याचं सोमय्या म्हणाले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या विरोधात आरोप केले, मात्र पुरावे सादर करु शकत नाहीत. कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कारवाई होत नसून, खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला लुटत असल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.

****

येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. थोर कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आहे. तो महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धुमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपल्या पक्षानं सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली असल्याचं ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज कोलकाता इथं खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

****

महाराष्ट्र राज्य नाविण्यता सोसायटीच्या वतीनं महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम हा महाराष्ट्रातील महत्वकांक्षी आणि नाविण्यपूर्ण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी एक विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये महिलांना उद्योजकीय कौशल्य आणि त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी इच्छूक महिला उद्योजकांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु आहे. या उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविण्यता सोसायटीच्या www.mahawe.in या संकेतस्थळावर २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असं आवाहन हिंगोलीच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त रा. म. कोल्हे यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment