Monday, 21 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलाच्या ताफ्याची पाहणी केली. राष्ट्रपतींनी आयएनएस सुमित्रावरुन बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या विविध युद्धनौका, तटरक्षक दलाच्या युद्धनौका, पाणबुड्यांची पाहणी केली. भारतीय नौदलाच्या ताफ्यात ६० जहाजं, पाणबुड्या आणि ५५ विमानं आहेत. हा ताफ्याचा बारावा पाहणी दौरा होता. लष्कर, वायुदल आणि नौदलाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. भारतीय नौदलाचं सामर्थ्य दर्शवणाऱ्या, ‘फ्लीट रिव्ह्यू’ या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपतींनी नौदलाकडून मानवंदना स्वीकारली.

****

आजच्या तरुण पिढीला सक्षम बनवणं म्हणजे भारताचं भविष्य मजबूत करणं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ च्या अंमलबजावणीबाबत, शिक्षण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. केंद्रीय अर्थसंकल्पाचा शैक्षणिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. आपल्या शिक्षण पद्धतीचा विस्तार करून तिची गुणवत्ता सुधारण्यासाठी, आणि शिक्षण क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी, अर्थसंकल्पात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. देशात डिजिटल स्किलिंग इकोसिस्टम तयार झाली पाहिजे, उद्योगाच्या मागणीनुसार कौशल्य विकास व्हायला हवा, उद्योग जोडणी अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी, याकडेही अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

उद्योग जगतात कर्मचाऱ्यांमधलं वैविध्य वाढवणं आणि कार्यशक्तीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी काय करता येईल, याबाबत उद्योग प्रतिनिधींना मत देण्याचं आवाहन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. सीतारामन या आजपासून दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून, आज त्यांनी उद्योग जगतातल्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आपण कच्चा माल बाहेरून आयात करण्यापेक्षा भारतातच उपलब्ध असलेला माल वापरायला हवा. मात्र, भारतात निर्माण न होणाऱ्या लांब धाग्याच्या कापसाच्या आयात शुल्कावर थोडेही निर्बंध लावण्याबाबत विरोध होत असल्यानं, कर कायम ठेवला असल्याचं त्या म्हणाल्या.

आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर होणाऱ्या मंथनाचा भाग म्हणून सीतारामन, मुंबईत आर्थिक समूह, उद्योग, वाणिज्य, व्यापार आणि काही प्रमुख क्षेत्रातील करदाते तसंच मान्यवरांशी चर्चा करत आहेत.

****

चारा घोटाळ्यातल्या दोरांडा कोषागार प्रकरणी रांची इथलं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं विशेष न्यायालय आज राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं होतं. 

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल सात लाख ७०६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १७५ कोटी ४६ लाख २५ हजार ७१० मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी ८९ लाख ८५ हजार १४९ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

दरम्यान, देशात काल नव्या १६ हजार ५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २०६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३७ हजार ९०१ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत चार कोटी २१ लाख २४ हजार २८४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या दोन लाख दोन हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८६ वा भाग असेल.

****

मराठवाडा विभागात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं ७६३ कोटी रुपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला आहे. विभागात बीड जिल्ह्याला सर्वाधिक १४२ कोटी ३१ लाख, नांदेड १३६ कोटी ६९ लाख, औरंगाबाद जिल्ह्याला ९८ कोटी ८६ लाख, जालना ९३ कोटी २७ लाख, लातूर ९७ कोटी ४९ लाख, उस्मानाबाद ७१ कोटी ११ लाख, परभणी ६७ कोटी ६१ लाख, तर हिंगोली जिल्ह्याला ५६ कोटी १७ लाख, इतका निधी उपलब्ध होणार आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्यामार्फत विभागातल्या आठही जिल्ह्यांना हा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्व १५ जागा जिंकून महाविकास आघाडीनं एकहाती सत्ता मिळवली आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या.

****

No comments:

Post a Comment