▼

Monday, 21 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मराठवाड्यात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून ७६३ कोटी रुपये वाढीव मदत

·      जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात तेलंगणा राज्याशी सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·      राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ४३७ रुग्ण; मराठवाड्यात ६४ रुग्णांची नोंद

·      आरोग्य विभागाच्या उर्वरीत ५० टक्के रिक्त जागा लवकरच भरणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

·      नक्षलवाद्यांना स्फोटकं पुरवणाऱ्या चौघांना गडचिरोलीतून अटक; स्फोटकासाठीची सामग्री जप्त

·      हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेला आजपासून प्रारंभ

आणि

·      तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर १७ धावांनी विजय; टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप

****

मराठवाडा विभागात गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारनं ७६३ कोटी रुपये वाढीव मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीमधून राज्यभरात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एक हजार ३५ कोटी १४ हजार रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यापैकी ७६३ कोटी ७५ लाख रुपये निधी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. विभागात बीड जिल्ह्याला सर्वाधिक १४२ कोटी ३१ लाख, नांदेड १३६ कोटी ६९ लाख, औरंगाबाद जिल्ह्याला ९८ कोटी ८६ लाख, जालना ९३ कोटी २७ लाख, लातूर ९७ कोटी ४९ लाख, उस्मानाबाद ७१ कोटी ११ लाख,  परभणी ६७ कोटी ६१ लाख, तर हिंगोली जिल्ह्याला ५६ कोटी १७ लाख, इतका निधी उपलब्ध होणार आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्यामार्फत विभागातल्या आठही जिल्ह्यांना हा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

****

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचे दोन नवीन विभाग आणि केंद्राचं उद्घाटन केलं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यावेळी उपस्थित होत्या. सर्वेक्षण, संशोधन आणि विश्लेषण तसंच कुटुंब आणि पिढ्या याविषयासंबंधीचे हे विभाग असून, लोकसंख्या शास्त्र आणि वृद्धत्वाचा अभ्यास यावर हे केंद्र काम करेल. मुली, स्त्रिया, तसंच ज्येष्ठांच्या कल्याणावर या केंद्रांचा भर असेल.

माहिती संकलन करण्याच्या नव्या पद्धती विकसित करणं, बालपण-तारुण्य-प्रौढत्व, तसंच वृद्धापकाळात होणाऱ्या बदलांवर अभ्यास, ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक तसंच शारीरिक समस्यांबाबत शास्त्रोक्त माहिती संकलन, आदी कामं या केंद्रांमध्ये होणार आहेत. केंद्र सरकार नागरिकांसाठी आखत असलेल्या नव्या धोरणांसाठी त्याचा उपयोग होईल.

****

एक हजार किलोमीटर अंतराची प्रदीर्घ सीमा असलेला तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी, काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली, त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. महाराष्ट्राच्या सहकार्याने कालेश्वरम प्रकल्प पूर्ण झाला, यापुढेही अशाच सहकार्यातून काम करण्याची इच्छा, राव यांनी यावेळी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवर काम करून लोकशाही मार्गाने एकत्र पुढे जाण्याच्या चर्चेला प्रारंभ झाल्याचं, चंद्रशेखर राव यांनी नमूद केलं. याच संदर्भात हैदराबाद इथं एक बैठक घेऊन अनेक प्रादेशिक पक्षांशी चर्चा करणार असल्याचं सांगत, या बैठकीला येण्याचं आमंत्रण राव यांनी ठाकरे यांना दिलं.

दोन्ही समपदस्थ नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीत देशाच्या विकासाला गती देण्यासह अनेक विषयांवर चर्चा होऊन अनेक विषयांवर सहमती झाल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

राव यांनी मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही काल भेट घेतली. देशात अपेक्षित गतीने विकास होत नसून, याची कारणं शोधण्यासंदर्भात पवार यांच्याशी चर्चा झाल्याचं, राव यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं. पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना, शेतकऱ्यांचे प्रश्न, विकास, गरीबी, बेरोजगारीच्या मुद्द्यासह देशासमोरच्या विविध समस्या आणि तोडग्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री राव यांनी भाजपाविरोधी आघाडी उभारण्यासाठी केलेले प्रयत्न स्वागतार्ह असल्याचं, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातली आघाडी पूर्ण किंवा यशस्वी होणार नाही, असंही पटोले यांनी नमूद केलं आहे.

****

मराठी भाषेला "अभिजात" भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची चार हजार पोस्ट कार्ड, काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत, ही पोस्टकार्डस् रवाना करण्यात आली. मराठी भाषेला "अभिजात" दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात एक जन अभियान सुरू करण्यात आलं आहे. याआधी सुद्धा एक संच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ४३७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ५८ हजार ४३१ झाली आहे. काल सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ५८२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ३७५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७६ लाख ९४ हजार ४३९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १६ हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कालही ओमायक्रॉन संसर्गाचा नवा रुग्ण आढळला नाही.

****

मराठवाड्यात काल ६४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १६ रुग्ण आढळले. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १५, बीड दहा, नांदेड सहा, तर परभणी जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. जालना आणि हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

आरोग्य विभागाच्या उर्वरीत ५० टक्के रिक्त जागा नवीन परीक्षा पद्धत वापरून लवकरच भरणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालन्यात मत्स्योदरी महाविद्यालयात काल राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीनं, टोपे यांचा उत्कृष्ट कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. चुकीच्या परीक्षा पद्धतीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाला. त्यामुळे उर्वरित ५० टक्के जागा नवीन परीक्षा पद्धत वापरून लवकरच भरणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर होणाऱ्या मंथनाचा भाग म्हणून त्या, आज आणि उद्या आर्थिक समूह, उद्योग, वाणिज्य, व्यापार आणि काही प्रमुख क्षेत्रातील करदाते तसंच मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित असतील. हा कार्यक्रम आणि इतर घडामोडी सकाळी साडे दहा वाजेपासून अर्थमंत्रालय आणि पत्र सूचना कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर आणि यू-ट्यूब माध्यमांवर उपलब्ध होणार आहे.

****

नक्षलवाद्यांना स्फोटकं पुरवणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून स्फोटकांसाठी वापरली जाणारी सामग्री पोलिसांनी जप्त केली, यामध्ये साडे तीन हजार मीटर लांबीच्या कार्डेक्स वायरच्या १० बंडलचा समावेश आहे. पोलीस विभाग आणि जलद कृती दल यांनी संयुक्तपणे अहेरी तालुक्यात ही कारवाई केली. या टोळीतला पाचवा आरोपी फरार झाला आहे. 

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रं आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवल्याप्रकरणी ठाणे इथं गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या नवी मुंबई विभागानं ही फिर्याद दाखल केली. नवी मुंबईतल्या सद्गुरु हॉटेलसाठी वयाच्या सतराव्या वर्षी समीर वानखेडे यांच्या नावावर बार परवाना घेतल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

****

पंतप्रधान पीक विमा योजनेत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. ते काल अमरावती इथं बोलत होते. पीक विमा योजनेत शेतकरी हिताचे बदल अपेक्षित आहेत, यासंदर्भात केंद्र सरकार कडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला, बीड पॅटर्नसारखा यशस्वी प्रयोग राबवण्यात आला, मात्र केंद्र सरकारने दखल घेतली नसल्याचं, भुसे यांनी सांगितलं. ते म्हणाले...

 Byte….

या योजनेमधे जे काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत, शेतकरी हिताचे बदल झाले पाहिजेत, त्या दृष्टीकोनातनं केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्याच्यापैकीच एक बीड मॉडेल की ज्याच्यामध्ये नफ्यालाही कंपन्यांना एक मर्यादा आणि उद्या तोटा तर झाला तर त्याच्यातही एक मर्यादा. त्याच्यावरची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची. हे जे मॉडेल होतं, दुर्दैवानं केंद्र सरकारनं अद्याप त्यालाही मान्यता दिलेली नाही. आणि म्हणूनच हा अतिशय संवेदनशील विषय आहे. आणि या संदर्भामधे गंभीरपणे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव विचार करत आहेत.

 

****

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सायंकाळी सात वाजता या स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. ही स्पर्धा मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत नाटकं तसंच बालनाट्य, आणि दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांत राज्यातल्या ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

****

उदगीर इथं नियोजित पंचाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीला भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते काल या नामफलकाचं अनावरण करण्यात आलं. संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

कोलकाताइथं इडन गार्डन्सवर झालेल्या तिसर्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर १७ धावांनी विजय मिळवत, तीन सामन्यांची मालिका तीन - शून्य अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं दिलेलं १८५ धावांचं लक्ष्य साध्य करताना, वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित षटकात नऊ बाद १६७ धावा करु शकला. हर्षल पटेलने तीन, तर दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ३१ चेंडुत सात षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने ६५ धावा करणारा सूर्यकुमार यादव सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयासह भारताने टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका संघात टी ट्वेंटी मालिकेला येत्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना २४ तारखेला लखनौ इथं होणार आहे. टी ट्वेंटी मालिकेनंतर दोन्ही संघात दोन कसोटी सामनेही खेळवले जाणार आहेत.

****

मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार, 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं.

औरंगाबाद, बीड, परभणी तसंच हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती संचालक कार्यालय, तसंच जिल्हा माहिती केंद्रात जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं.

****

वक्फ बोर्डाची सर्व नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यानं, आता कोणत्याही कामासाठी राज्यातून कोणालाही औरंगाबादला जाण्याची गरज नसल्याचं, राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा यांनी सांगितलं आहे. ते काल सोलापूर इथं बोलत होते. राज्यात वक्फ बोर्डाची ९७ हजार एकर जमीन असून त्यातल्या ४० टक्के जमिनीवर अतिक्रमण झालं आहे. या सर्व जमिनींचा महसूल मिळाल्यास राज्य सरकारला मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्र निधीची गरज पडणार नाही, असं मत डॉ मिर्झा यांनी व्यक्त केलं.

****

No comments:

Post a Comment