Tuesday, 22 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’, या उपक्रमाअंतर्गत आजपासून देशभरात ७५ शहरांमध्ये ‘विज्ञान गौरवशाली सप्ताहाला’ प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्घाटन सोहळा दिल्लीत विज्ञान भवनात होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांमध्ये हा कार्यक्रम होत असून, औरंगाबाद इथल्या विवेकानंद महाविद्यालयाची यासाठी निवड करण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातले प्रमुख टप्पे, स्वदेशी पारंपारिक शोध आणि नवोन्मेष, तसंच परिवर्तनशील भारत, या चार मुख्य विषयांवर, पूर्ण आठवडाभर अनेक स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिनी, २८ फेब्रुवारीला या सप्ताहाचा समारोप होणार आहे.

****

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सुरू असला तपास नऊ मार्चपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, परमबीर सिंह यांच्या संदर्भातला तपास केंद्रीत अन्वेषण विभाग - सीबीआयकडे हस्तांतरित करण्यावर नऊ मार्च रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.

****

राज्य मार्ग परिवहन - एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या मागणीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीनं आपला अहवाल न्यायालयात सादर केला आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर पासून संप पुकारला आहे.

****

बनावट कागदपत्रांद्वारे मद्यालयासाठीचा परवाना मिळवल्याबद्दल ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आणि रद्द केलेला परवाना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. काल याचिका दाखल करण्यात आली आणि आज लगेच सुनावणीला आली यामुळे खंडपीठानं कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत, या याचिकांवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३५ लाख ५० हजार ८६८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १७५ कोटी ८३ लाख २७ हजार ४४१ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी ९१ लाख ६१ हजार ४१९ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

दरम्यान, देशात काल नव्या १३ हजार ४०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २३५ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३४ हजार २२६ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत चार कोटी २१ लाख ५८ हजार ५१० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ८१ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतल्या सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. इयत्ता १० वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी आणि आठवीमधल्या क्रीडास्पर्धेतला सहभाग विचारात घेतला जाईल. तर इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्षातला क्रीडा स्पर्धेतला सहभाग विचारात घेऊन, क्रीडा गुण दिले जातील. तसे निर्देश राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना दिले असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. ही सवलत फक्त सन २०२१-२२ च्या परीक्षेसाठीच दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

****

यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या आणि केवळ इंटर मीजीएट चित्रकला स्पर्धा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळणार आहे. राज्य सरकारनं काल यासंदर्भातला शासन आदेश प्रसिद्ध केला. २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या धोरणानुसार इलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय इंटर मीजिएट परीक्षेचे गुण मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र गेल्यावर्षी कोरोना परिस्थितीमुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळं ही अट यंदाच्या वर्षासाठी शिथिल करण्याचं सरकारनं ठरवलं आहे.

****

शेतमजुर, यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते काल कोल्हापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कामगारानं नोंदणी करावी तसंच नोंदणीचं नुतनीकरण गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. मर्यादित कामासाठी असणारं बांधकाम मंडळ आता व्यापक झालं असून, मंडळाकडे निधीही मोठ्या प्रमाणात जमा झाला असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment