Tuesday, 22 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      ‘देशात ७५ शहरांमध्ये 'विज्ञान गौरवशाली सप्ताहाला' आजपासून प्रारंभ; राज्यात मुंबई पुणे नागपूरसह औरंगाबादची निवड

·      मॉल्स, कार्यालयं आणि उपनगरी रेल्वे प्रवेशासाठी लावलेल्या निर्बंधांवर पुनर्विचार करावा- मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

·      ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकारण मजबूत करण्यासाठी शेतीचं आर्थिक आरोग्य सुधारणं आवश्यक - माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार

·      राज्य सरकारचा मराठवाड्यासोबत दूजाभाव - देवेंद्र फडणवीस यांची टीका

·      राज्यात ओमायक्रॉनचे नवे ५३ तर कोविडचे ८०६ रुग्ण; मराठवाड्यात तिघांचा मृत्यू तर नव्या २५ रुग्णांची नोंद

·      चित्रपट सृष्टीतले सर्वोच्च मानाचे दादासाहेब फाळके पुरस्कार मुंबईत समारंभपूर्वक प्रदान 

आणि

·      नांदेड जिल्ह्यात वऱ्हाडाला अपघात होऊन नवरीसह पाच जण ठार; औरंगाबाद इथं शेततळ्यात बुडून तीन युवकांचा मृत्यू

 

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते', या उपक्रमाअंतर्गत आजपासून देशभरात ७५ शहरांमध्ये 'विज्ञान गौरवशाली सप्ताहाला'प्रारंभ होत आहे. केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान प्रसार संस्थेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्घाटन सोहळा दिल्लीत विज्ञान भवनात होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांमध्ये हा कार्यक्रम होत असून, औरंगाबाद इथल्या विवेकानंद महाविद्यालयाची यासाठी निवड करण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातले प्रमुख टप्पे, स्वदेशी पारंपारिक शोध आणि नवोन्मेष, तसंच परिवर्तनशील भारत, या चार मुख्य विषयांवर, पूर्ण आठवडाभर अनेक स्पर्धा, व्याख्यानं, प्रदर्शनं आणि चित्रपट प्रसारण होणार असून हा कार्यक्रम सर्व विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असणार आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनी, २८ फेब्रुवारीला या सप्ताहाचा समारोप होणार आहे.

****


मॉल्स, खासगी तसंच शासकीय कार्यालयं आणि उपनगरी रेल्वे गाडीत प्रवेशासाठी लावलेल्या निर्बंधांवर पुनर्विचार करण्याची सूचना, मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. या ठिकाणी प्रवेशासाठी कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या असणं, सध्या बंधनकारक आहे. सध्या नियंत्रणात आलेली परिस्थिती पाहता, हा निर्णय मागे घ्यायला हवा, असं न्यायालयानं म्हटलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय, मनमानी असल्याचा आरोप करणाऱ्या दोन स्वतंत्र याचिकांवर काल सुनावणीदरम्यान, न्यायालयानं, तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा निर्णय, हा कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. या संदर्भात काय भूमिका घेता येईल, हे विद्यमान मुख्य सचिवांनी आज सांगण्याची सूचना न्यायालयानं केली आहे.

****

केंद्र शासनानं जाहीर केलेल्या रास्त आणि किफायतशीर भाव -एफआरपी नुसार गाळपासाठी आलेल्या ऊसासाठी कारखान्यांनी किंमत अदा करण्याची कार्यपद्धत, राज्य शासनानं निश्चित केली आहे. त्यानुसार २०२१-२२ तसंच त्यापुढच्या हंगामाकरता साखर उतारा विचारात घ्यावा, असा शासन आदेश काल जारी करण्यात आला. अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, एफआरपी निश्चित करण्यासाठी आधारभूत धरण्याचा साखर उतारा, महसूल विभागनिहाय निश्चित करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक विभागासाठी किमान दहा टक्के, तर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागांसाठी, किमान साडे नऊ टक्के साखर उतारा ठरवण्यात आला आहे.

****

ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकारण मजबूत करायचं असेल तर शेतीचं आर्थिक आरोग्य सुधारले पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई इथं, राज्यस्तरीय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या एक दिवसीय परिषदेनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. ज्या बॅंकांचं अर्थकारण साखर कारखान्यांवर अवलंबून आहे, त्या बॅंका भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारची परवानगी घेवून कर्ज वितरणाचे नवीन खात्रीलायक मार्ग काढू शकतो का याचा विचार करण्याची गरजही शरद पवार यांनी व्यक्त केली.

****

राज्य सरकार मराठवाड्यासोबत दूजाभाव करत असल्याची टीका विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या लासूर स्टेशन इथं, आमदार प्रशांत बंब यांनी भरवलेल्या महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा, तसंच १२० कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ, फडणवीस यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांगांसाठी  विविध उपकरणे केंद्र सरकारच्या वतीनं दिली जात असून, महिला बचत गटांसाठी एक लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याचा लाभ महिला बचत गटांना होणार असल्याचं फडणवीस म्हणाले. महिला बचत गटाच्या माध्यमातून गंगापूर तालुक्यात होत असलेल्या मशरुम उत्पादनाचं त्यांनी कौतुक केलं.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्गाचे नवे ५३ रुग्ण आढळले. पुणे ३३, अहमदनगर १९ तर लातूर इथं एक रुग्ण आढळला. राज्यातल्या एकूण ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची संख्या चार हजार ५०९ झाली असून, त्यापैकी तीन हजार ९९४ रुग्ण बरे झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८०६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ५९ हजार २३७ झाली आहे. काल चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ५८६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ६९६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७६ लाख ९७ हजार १३५रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १४ हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल २५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी दहा नवे रुग्ण आढळले. नांदेड तीन, तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. बीड, हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध शिथील केले जाणार आहेत. यासंदर्भातला प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन आकडी झाली असल्यानं सर्व कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

****

चित्रपट सृष्टीतले सर्वोच्च मानाचे दादासाहेब फाळके पुरस्कार मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. शेरशाह या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर पुष्पा या चित्रपटानं मुव्ही ऑफ दी इयर पुरस्कार पटकावला आहे. सरदार उधम या चित्रपटानं समीक्षकांचा पुरस्कार मिळवला. 83 या चित्रपटासाठी रणवीरसिंह याला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर मिमी चित्रपटासाठी क्रीती सेनॉन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सिद्धार्थ मल्होत्रा तसंच कियारा अडवाणी यांनी, शेरशहा चित्रपटातल्या अभिनयासाठी समीक्षकांचा पुरस्कार मिळवला आहे. अहान शेट्टी यानं तडप चित्रपटातून अभियानात सर्वोत्तम पदार्पणासाठीचा पुरस्कार पटकावला. विशाल मिश्रा तसंच कनिका कपूर यांनी पार्श्वगायनासाठीचे पुरस्कार पटकावले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

समाजामध्ये बदल घडवण्याची ताकद नाटकांमध्ये असून महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीला नाटकांमधून विचारांचं बळ मिळालं असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या 'हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचं' राज्यस्तरीय उद्घाटन काल थोरात यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख या कार्यक्रमात सहभागी झाले होते. येत्या काळात सिनेमा-नाटक-मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचं, देशमुख यावेळी म्हणाले.

****

यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या आणि फक्त इंटरमीजिएट चित्रकला स्पर्धा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळणार आहेत. राज्य सरकारनं काल यासंदर्भातला शासन आदेश जारी केला. २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या धोरणानुसार इलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय इंटर मीजिएट परीक्षेचे गुण मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र गेल्यावर्षी कोरोना परिस्थितीमुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे ही अट यंदाच्या वर्षासाठी शिथिल करण्याचं सरकारनं ठरवलं आहे.

****


नांदेड जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाला अपघात होऊन नवरीसह पाच जण ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले. भोकर हिमायतनगर महामार्गावर काल सांयकाळी हा अपघात झाला. धर्माबाद तालुक्यात जरिकोट इथं विवाहानंतरचे पारंपारिक विधी आटोपून हे वऱ्हाड यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातल्या सखरा गावी जात होतं. समोरून आलेल्या टेम्पोची या वाहनाशी धडक होऊन हा अपघात झाला.

****

औरंगाबाद इथं शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा मृत्यू झाला. शहरानजिक भांगसीमाता गड परिसरात काल ही दुर्घटना घडली. हे तिघे शहरातल्या बजाजनगर इथून भांगसी माता गडाकडे सायकल वरून फिरण्यासाठी गेले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

****

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्व १५ जागा जिंकून महाविकास आघाडीनं एकहाती सत्ता मिळवली आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. 

****

ईडी आणि सीबीआय चौकशी ही विनाकारण किंवा त्रास देण्यासाठी नसल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. संबंधित चौकशी ही राज्य सरकार पाडण्यासाठी असल्याचा आरोप खासदार संजय राऊत करत आहेत, तो बिनबुडाचा असल्याचं ते म्हणाले. इतर मागास प्रवर्ग ओबीसींच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यासंदर्भात अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. भटके विमुक्तांना या ओबीसीतून वगळून वेगळं आरक्षण देण्यासंदर्भात या समितीचा निर्णय आल्यानंतर भूमिका घेण्यात येणार असल्याचं, आठवले यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे हे कर्तव्य बजावत असताना देखील पोलिसांनी त्यांच्यावरच तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले, याचा निषेध करून, जिल्हाभरातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल लेखणी बंद आंदोलन केलं. खाडे यांच्यावरील गुन्हे तात्काळ रद्द करून संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

****

रब्बी हंगामाच्या ई-पीक पाहणीची मुदत २८ फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती, ई-पीक पाहणीचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी दिली आहे. पीक पाहणीच्या नोंदणीसाठी सुधारीत ॲप उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्व खातेदार शेतकऱ्यांनी हे नवीन ॲप अपडेटेड करून घेणं आवश्यक असल्याचंही तांबे यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment