Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 March 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड
पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना
करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा
स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६
आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत
वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
केंद्र सरकारनं देशात अघोषित आणिबाणी लागू केल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची
टीका
**
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार - उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन
**
आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त
**
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल विक्रमी दर
आणि
**
लोकसेवा हक्क कायद्याची सर्व विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करावी - आयुक्त डॉ. किरण
जाधव यांची सूचना
****
केंद्र
सरकारनं देशात अघोषित आणिबाणी लागू केल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली
आहे. आज विधान सभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी
माध्यमांनाही वार्तांकन करताना तारतम्य बाळगण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले –
कुठे कायदा, व्यवस्था आणि लोकशाहीचा खून याच्या पलिकडे काय आणखीन असू शकतं?
अघोषित आणीबाणी. निदान इंदिरा गांधीनी तरी आणीबाणी घोषित केली होती. ही अघोषित आणीबाणी.
एवढा डरपोकपणा त्यांच्यात नव्हता. चांगली वाईट तो वेगळा भाग आहे. त्यांनी एक धारीष्ट्य
दाखवलं ते धारीष्ट्य त्यांच्यामध्ये होतं. आणि मला प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा सांगायचं
आहे. बातम्या दाखवा, जरूर दाखवा. पण कोणाचं तरी आयुष्य उध्वस्त होईल अशा प्रकारे जी
बदनामी केली जाते, तिला तरी आपण निदान साथसोबत देऊ नका. आयुष्य उध्वस्त होतात. आणि
कालांतराने कळतं याच्यामध्ये काही नव्हतच. तर ही एक माणुसकी आपण सत्ताधारी असो, विरोधी
असो पण या देशाचे नागरिक आहोत, तसं वागा एवढीच माझी विनंती आहे.
राज्य
सरकारच्या न आवडलेल्या कामावर टीका करताना, चांगल्या कामाचं कौतुक करण्याचं आवाहनही
मुख्यमंत्र्यांनी केलं. विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी राज्यपालांकडे जातात मात्र
राज्यपाल काय बोलतात ते ऐकूनही घेतलं पाहिजे असं ते यावेळी म्हणाले. कोविड काळात राज्याच्या
यंत्रणेनं दिवसरात्र काम केलं याचा राज्याला अभिमान आहे. तसंच स्कॉटलंड मध्ये झालेल्या
हवामान बदल परिषदेत राज्याला पुरस्कार मिळाला याचं कौतुक राज्यपालांनी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी नमूद केलं.
****
मराठवाडा
वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा
अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर
ते आज विधानसभेत बोलत होते. मराठवाडा तसंच विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, या भूमिकेचा
त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले –
काही सन्माननीय सदस्य बोलतांना मराठवाडा ग्रीडच्या संदर्भात बोलले. वास्तविक
त्याला आमचा विरोध असायचा काहीच कारण नाही. आम्हाला वाटत नाही का की मराठवाड्यातल्या
लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जायचं ठरवलेलं आहे.
पहिल्यांदा नाथसागरच्या जवळचा पैठण, वैजापूर हे तालुके कव्हर करायचं ठरवेलेलं आहे.
आणि पुढे टप्प्याटप्प्याने जाणार. माझ्या मराठवाडा, विदर्भातल्या जनतेच्या पण लक्षात
आणून देऊ इच्छितो, की जोपर्यंत आम्हाला इथं कामाची संधी आहे, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत
मराठवाडा, विदर्भावर महाविकास आघाडीचं सरकार अन्याय होऊ देणार नाही.
****
एनएसईल
घोटाळाप्रकरणी सक्तवसूली संचालनालय - ईडीनं शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांची
११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सरनाईक यांना ठाणे आणि मीरारोड इथली
संपत्ती तसंच हिरानंदानी इथलं घर जप्त केल्याची नोटीस आणि राहत्या घराच्या जप्तीची
नोटीस ईडीनं पाठवल्याचं त्यांनी आज सांगितलं. ते आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत
होते. येत्या तीन दिवसांत या कारवाईबद्दल ईडीला न्यायालयात आव्हान देणार असून न्यायव्यवस्थेवर
आपला पूर्ण विश्वास असल्याचं ते यावेळी म्हणाले. ईडीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
देवून तसंच प्रत्येक वेळी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहून ईडीला सहकार्य करणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारचा संघर्षाचा फटका आपल्याला बसल्याचं ते म्हणाले.
****
अकोला
जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल
असा विक्रमी दर मिळाला. या बाजार समितीत विदर्भ तसंच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून
शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी आणत आहेत. खरीप हंगामात कापसाचे उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांनी
हंगामाच्या सुरवातीपासून कापूस साठवणूकीवर भर दिल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना आता
होत असल्याचं अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन फुंडकर यांनी सांगितलं.
****
शेतमाल
हमीभावा पेक्षा कमी किमतींत खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद
करणारा कायदा मंजूर करावा असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू
शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज वाशिम इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांना
दिवसा शेतीसाठी वीज मिळाली पाहिजे, पीकविमा मिळाला पाहिजे अशी ही मागणी त्यांनी यावेळी
केली.
****
महाराष्ट्र
लोकसेवा हक्क कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महाराष्ट्र
लोकसेवा हक्क आयोगाचे औरंगाबाद विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिल्या आहेत. ते
आज परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. या कायद्यामुळे राज्याच्या
नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं. आतापर्यंत या कायद्यातंर्गत राज्यात ११ कोटी नागरिकांना सेवा देण्यात
आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय समन्वय समितीची
स्थापना करण्यात यावी, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले. ते
आज जिल्हा स्तरीय समन्वय समितीच्या तिसऱ्या बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातील प्रत्येक
शासकीय विभागातील कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी आणि पंचायत समितीतील सदस्यांचं प्रशिक्षण
घेऊन सर्वांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणामाचे गांभीर्य समजावून सांगण्याची
सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेचा प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार युक्रांदचे संस्थापक
आणि पुरोगामी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना उद्या प्रदान करण्यात येणार आहे. अकरा
हजार रुपये, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून व्यक्तिरंग या त्यांच्या
पुरस्कारप्राप्त ग्रंथावर नांदेड इथले पत्रकार संजीव कुलकर्णी हे भाष्य करणार आहेत.
मसापच्या औरंगाबाद इथल्या डॉ. ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा
कार्यक्रम होणार आहे.
****
इंडियन
प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ उद्यापासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी
होत आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांना यंदा भारतीय क्रिकेट
नियामक मंडळांनं नव्यानं लीगमध्ये सहभागी करून घेतलं आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर
उद्या पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला
जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment