▼

Wednesday, 23 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.03.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 March 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मार्च २०२२ दुपारी १.०० वा.

****

पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज काही काळासाठी स्थगित झालं होतं.

राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी ही मागणी फेटाळून लावली. यावरुन विरोधकांनी सदनात फलक झळकावत घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.   

****

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आज देशभरात शहीद दिवस पाळण्यात येत आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन मिनिटं मौन पाळून क्रांतीकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना अभिवादन करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना अभिवादन केलं आहे.

शहीद दिनानिमित्त आज औरंगाबाद इथं स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ इथं रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

मराठवाड्यात गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल आज सदस्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. वाहून गेलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिलं. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा वार्षिक अहवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहासमोर मांडला.

****

कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८१ कोटी ८५ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २७ लाख ३० हजार लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. यापैकी १२ ते १४ वर्षे वयोगटातल्या ५० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीची मात्रा मिळाली, तर दोन कोटी २० लाखांहून अधिक पात्र लाभार्थ्यांना बुस्टर डोस देण्यात आला आहे.

****

केंद्र सरकारनं रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केलं आहे. या त्रीसदस्सीय समितीच्या एका सदस्यानं काल हा अहवाल जाहीर केला. या समितीनं अनेक शिफारशी केल्या होत्या, मात्र शेती कायदे रद्द करण्यात आल्यामुळे आता या अहवालाचे महत्त्व उरलेलं नाही, पण भविष्यात कृषी क्षेत्रासाठी धोरण तयार करताना या अहवालाचा उपयोग होईल, असं या सदस्यांनी सांगितलं.

****

पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याची यात्रा आजपासून सुरु झाली. नाथ षष्ठीची परंपरा असलेला संत एकनाथ महाराज यांच्या गावातल्या वाडा मंदीरातला नाथांचा रांजण श्रीराम गुरु सळजोशी यांच्या हस्ते काल भरण्यात आला.

****

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी राज्यातल्या ८४६ फौजदारांच्या पदोन्नतीची यादी जाहीर केली. या सर्व फौजदारांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. यात बीड जिल्ह्यातील सध्या कर्तव्यावर असलेल्या दहा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर पोलिस ठाण्याचा उप निरीक्षक हुकुमसिंग डांगर याला वीस हजार रुपयांची लाच घेतांना लाचलचुपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. वैजापूर इथं असलेला बियरबार सुरळीत चालू देण्यासाठी आणि बियरबारवर काही कारवाई करु न देण्यासाठी त्यानं ही लाच घेतली होती.

****

धारूर पोलिस ठाण्यातला पोलीस तेजस वाहूळे याला काल दहा हजार रुपये लाच स्वीकारताना पकडण्यात आलं. गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

नांदेड जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल या कालावधीत “होट्टल सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सवाचं” आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल ही माहिती दिली. या तीन दिवसीय महोत्सवाचं नियोजन राज्याच्या पर्यटन विभागामार्फत केलं जात आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ मार्चला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल.

****

No comments:

Post a Comment