▼

Wednesday, 23 March 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्य परीवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भातील शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत

·      महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा, गडचिरोलीपर्यंत विस्तार करणार

·      पेट्रोल - डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी प्रत्येकी ८३ पैशांची प्रतिलिटर वाढ

·      पुष्पक ग्रुप कंपनीचे ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातले ११ फ्लॅट सक्तवसुली संचालनालयाकडून जप्त

·      राज्यात कोविड संसर्गाचे १५६ तर मराठवाड्यात ६ नवे रुग्ण

·      पैठणची नाथषष्ठी यात्रा आजपासून सुरु

·      राज्यात शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

आणि

·      महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय

****

राज्य परीवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीनं अलिकडेच आपला अहवाल राज्य सरकारला दिला होता. या अहवालावर राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयाकडे १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार न्यायालयानं काल राज्य सरकारला मुदतवाढ दिली. यावेळी न्यायालयानं सरकारला समितीच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी ही अखेरची संधी देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी न्यायालयानं संपकरी संघटनेलाही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास काय हरकत आहे? अशी विचारणा केली.

दरम्यान, या अहवालात आर्थिक तरतुदी असल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या अहवालाला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल विधानपरिषदेत दिली. एसटी कर्मचारी आणि ग्रामीण जनतेसाठी हा संप मिटणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात विधानपरिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे सदनाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं.

****

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा, नागपूरपासून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचं, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. या विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले. विधानसभा सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला शिंदे उत्तर देत होते. नागपूर ते मुंबई दरम्यान ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचं १६ बांधकाम पॅकेज अंतर्गत काम प्रगतीपथावर असून निविदा कालावधीनुसार हा महामार्ग येत्या सप्टेंबर पर्यंत जनतेसाठी खुला करण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गंत मुद्दामहून रस्त्यांची कामं सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस देण्यात येईल. तसंच या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं जाईल, असं आश्वासन, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्ताधारी पक्षानं उपस्थित केलेल्या प्रस्तावात उत्तर देताना दिलं. वीज बिलं न भरणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावर कोणतीही कारवाई होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यातल्या  शाळांमधल्या  विद्यार्थीसंख्येमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात संच मान्यतेचे निकष नव्यानं  निश्चित करण्याची  कार्यवाही सुरू असल्याचं  उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं.

राज्यातल्या  अंशत: अनुदानित शिक्षकांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू नाही. मात्र १०० टक्के अनुदान मंजूर झाल्यावर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू होईल असं  उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमदार विक्रम काळे यांच्या तारांकित प्रश्नावर दिलं.

****

मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून ही सकारात्मक भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मुस्लिम समाजासह धनगर, मराठा, इतर मागासवर्गीयांचं आरक्षण असावं अशी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे, असं कदम यावेळी म्हणाले.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ८३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. कालही पेट्रोल प्रतिलीटर ८४ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ करण्यात आली होती. औरंगाबाद शहरात आता पेट्रोलचा दर ११२ रुपये ४८ पैसे प्रती लिटर, तर डिझेलचा ९६ रुपये ६५ पैसे प्रती लिटर झाला आहे.

****

सक्तवसुली संचालनालयानं काल केलेल्या एका कारवाईत पुष्पक ग्रुप या श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीचे निलांबरी प्रकल्पात असलेले ११ फ्लॅट जप्त केले आहेत. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत. ही मालमत्ता सहा कोटी ४५ लाखांची आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या संदर्भात ६ मार्च २०१७ साली गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संदर्भात पुष्पक बिलिएनर या कंपनीचे महेश पटेल आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या विरोधातली कारवाई करण्यात आली होती.

****

प्राप्तिकर विभागानं काल करचुकवेगिरी प्रकरणी रिअल इस्टेट क्षेत्रातली आघाडीची कंपनी हिरानंदानी उद्योग समुहाविरोधात कारवाई करत विविध ठिकाणी छापे घातले. २४ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरुमधल्या कंपनीतल्या वरीष्ठ कर्मचार्यांच्या निवासस्थानांचा यात समावेश आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १५६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७२ हजार ५१२ झाली आहे. काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४३ हजार ७६७ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल २६९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २३ हजार ७३७ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार १५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल सहा नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात तीन, बीड दोन, तर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. हिंगोली, जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याची यात्रा आजपासून सुरु होत आहे. यात्रेनिमित्त अनेक ठिकाणाहून दिंड्या पैठण नगरीत दाखल होत आहेत. नाथ षष्ठीची परंपरा असलेला संत एकनाथ महाराज यांच्या गावातल्या वाडा मंदीरातला नाथांचा रांजण श्रीराम गुरु सळजोशी यांच्या हस्ते काल भरण्यात आला. यावेळी नाथवंशज तथा पालखी दिंडी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी या भरलेल्या रांजणाचं पूजन केलं.

****

अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी इथल्या कानिफनाथांच्या उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. गेल्या दोन दिवसांपासून नाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. काल रंगपंचमीच्या दिवशी सुरु झालेल्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी कानिफनाथांचा जयघोष करत दर्शन घेतलं.

****

राज्यात काल शिवसेनेनं शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ केला. औरंगाबादमध्ये खासदार विनायक राऊत, परभणीत खासदार श्रीकांत शिंदे, उस्मानाबाद जिल्ह्यात खासदार सदाशिव लोखंडे, बीडमध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, नांदेड जिल्ह्यात खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते तर जालना जिल्ह्यात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५९ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण आणि पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. मराठवाड्यात हे एकमेव महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांचा त्याकडे अधिक ओढा आहे, या निधीमुळे नाविण्यपूर्ण गोष्टी करता येणार असल्याचं राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेअंतर्गत उद्या गुरूवारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीत कडधान्य पिकांचं जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील कडधान्य पिकांचं उत्पादन घेणाऱ्यांनी शेतमाल या संमेलनात विक्रीसाठी आणावा असं आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक यांनी केलं आहे. 

****

खाजगीकरणाच्या विरोधात काल परभणीच्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघानं वीज वितरण कंपणीच्या कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन निषेध नोंदवला. विद्युत सुधारणा विधेयक, महावितरणमध्ये सातत्यानं होत असलेला राजकिय हस्तक्षेप आणि स्वतंत्र कृषी कंपणी स्थापन करण्याचा शासनाचा निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला.

****

हिंगोली जिल्ह्यात जागतिक जल जागृती सप्ताहाचा काल कळमनुरी तालुक्यातील उगम ग्राम विकास संस्थेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या सप्ताहात जनजागृती मेळावा, चर्चासत्र, ग्रामसभांसह विविध कार्यक्रम घेण्यात आले.

****

क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत राज्यातल्या बीड, अहमदनगर, आणि अकोला जिल्ह्यांना सब नॅशनल सर्टिफिकेशन पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. दिल्ली इथं २४ मार्च ला जागतिक क्षयरोग दिनी हा कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कारांअंतर्गत बीड जिल्ह्याला कांस्यपदकानं सन्मानित केलं जाईल.

****

महाराष्ट् पर्यटन संचालनालय आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या २७ आणि २८ मार्च रोजी तेर पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचं उद्धाटन पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

****

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं बांग्लादेशावर ११० धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना भारतानं ५० षटकांत ७ बाद २२९ धावा केल्या. भारताच्या यास्तिका भाटिया हीनं सर्वाधिक ५० धावा केल्या. विजयासाठी २३० धावांचा पाठलाग करतांना बांग्लादेशाचा डाव ४० षटकं आणि ३ चेंडूंमध्ये केवळ ११९ धावांतच आटोपला. स्नेहा राणा हीनं बांग्लादेशाच्या ४ खेळाडूंना बाद केलं.

गुणतालिकेत भारत सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतला भारताचा अखेरचा साखळी सामना २७ मार्चला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.

****

No comments:

Post a Comment