▼

Thursday, 24 March 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोविड रुग्णसंख्येत मोठी घट झाल्यानं सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मात्र मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना कायम

·      राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचं स्पष्ट करणारा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल, राज्य मंत्रिमंडळानं स्वीकारला

·      पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ

·      राज्यात मुलींचं प्रमाण घटलं नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

·      राज्यात कोविड संसर्गाचे १४९ तर मराठवाड्यात ५ नवे रुग्ण

·      अखंड हरीनामाच्या गजरात पैठणच्या नाथषष्ठी महोत्सवाला सुरुवात

आणि

·      आंबा निर्यातीसाठीची अत्यावश्यक प्रक्रिया सुरू

****

देशात दोन वर्षांपूर्वी कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आह़े.  कोविड रुग्णसंख्येत मोठी घट झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला असला, तरी मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचं पालन यापुढेही करावं लागणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.  केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्राद्वारे  सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत कळवलं आहे. गेल्या सात आठवड्यापांसून देशातली कोविड संख्या लक्षणीय रित्या कमी झाली असून देशात सध्या केवळ २३ हजार ९१३ सक्रीय रूग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. कोविडची संख्या वाढल्यास त्या त्या ठिकाणचं प्रशासन स्थानिक कारवाई करण्याबाबत विचार करू शकतात असंही त्यांनी भल्ला यांनी स्पष्ट केलं आहे.

कोविड चाचण्यांच्या तुलनेत बाधिताचं प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या भागांत मात्र प्रतिबंधात्मक निर्बंध लागू ठेवावेत़,  तसंच ४० टक्क्यांहून अधिक प्राणवायू युक्त खाटा व्यापलेल्या भागांतही निर्बंध कायम ठेवावेत, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आह़े.  याशिवाय, चाचणी, रुग्णशोध, उपचार, लसीकरण आणि नियम पालन या पंचसूत्रीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचनाही आरोग्य मंत्रालयानं केली आह़े.

****

राज्य परिवहन महामंडळ-  एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचं स्पष्ट करणारा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल, राज्य मंत्रिमंडळानं काल स्वीकारला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय अहवालात, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी समजणं आणि महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सरकारच्या विभागामार्फत करणं, ही मागणी मान्य करणं कायद्यातल्या तरतुदीनुसार  तसंच प्रशासकीय आणि व्यावहारिक बाबी विचार घेता शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात ८४, तर डिझेलच्या दरात ८५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात आता पेट्रोलचा दर ११३ रुपये ३२ पैसे प्रती लिटर, तर डिझेलचा ९७ रुपये ५० पैसे प्रती लिटर झाला आहे.

****

राज्यात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अवैध गर्भलिंग निदानाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सभागृहात आकडेवारीही सादर केली. २०१६ मधे नागरी नोंदणी प्रणालीच्या अहवालानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात जन्माच्या वेळी असलेल्या मुलामुलींच्या गुणोत्तरात, एक हजार मुलांमागे ८७४ मुली होत्या, तर २०१९ मधे हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९१३ मुलींवर गेलं आहे. त्यामुळे मुलींचे प्रमाण उस्मानाबादमधे घटलेले नाही, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यात २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या महिन्याभराच्या कालावधीत गर्भलिंग निदान चाचणीसंदर्भातल्या कायदेशीर तरतुदींचा भंग होत असल्यावरून १८१ सोनोग्राफी चाचणी केंद्रांना कारणे दाखवा नोटिस देण्यात आली असून तीन केंद्रांतली सोनोग्राफी मशिन्स सील केली आहेत, तसंच ७३ गर्भपात केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या असून त्यापैकी १५ केंद्रांची मान्यता रद्द करून ती बंद करण्यात आली आहेत, अशी माहितीही टोपे यांनी विधानसभेत दिली. 

****

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित सुविधा असणारी राज्यातली पहिली आदर्श शाळा औरंगाबाद इथं ११ एकर जागेवर उभारण्यात येत असल्याची माहिती, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण व्यवस्था राज्यात सर्वत्र मिळावी यासाठी खासगी भागीदारीतून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती या खात्याचे मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या विभागाच्या उत्तरात दिली. सरकारी पातळीवरची सुविधा असणारी राज्यातली पहिली एकात्मिक औषधी व्यवस्थेची औषध नगरी पुण्यात उभारण्यात येत आहे असंही त्यांनी सांगितलं.

यानंतर सर्व विभागांच्या अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्या सभागृहानं मंजूर केल्या आणि त्यानंतर खर्चासाठी आवश्यक असणारे विनीयोजन विधेयकही मंजूर करण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या पाझर तलावांच्या दुरूस्तीची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशी माहिती मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी काल विधानसभेत दिली. या पाझर तलावांचं ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असून, त्याची दुरूस्ती लवकरात लवकर करून मिळावी, असा प्रश्न विधानसभा सदस्य लक्ष्मण पवार यांनी उपस्थित केला होता. या कामांसाठी १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचंही गडाख यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातला क्रांती चौकातील उड्डाण पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परीषदेत दिली. या पुलाचं बांधकाम महामंडळामार्फत करण्यात आलं असून, या पुलावरील रबरी भागाची दुरूस्तीही करण्यात आली आहे. त्याला आता कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण आणि, सुनिल शिंदे यांनी प्रश्न  पस्थित केला होता.

****

हिंगोली जिल्ह्यात ग्रामस्थांकडून अवैध धंद्याबाबत प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, तसंच त्या ठिकाणी पुन्हा अवैध धंदे सुरु होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात येतील, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्याबाबत तक्रारी करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक जारी केला असून, प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर स्थानिक गुन्हे शाखा तसंच संबंधित पोलिस स्टेशनकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येत असल्याचं देसाई यांनी सांगितलं. गुटखा विक्री आणि वाहतुकीसंदर्भातही हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

****

पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस सह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज काही काळासाठी स्थगित झालं होतं.

राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी ही मागणी फेटाळून लावली. यावरुन विरोधकांनी सदनात फलक झळकावत घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सदनाचं कामकाज स्थगित करावं लागलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १४९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७२ हजार ८१७ झाली आहे. या संसर्गानं काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४३ हजार ७६९ एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल २२२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २३ हजार ९५९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात दोन, तर औरंगाबाद, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. लातूर, बीड, परभणी, तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

अखंड हरीनामाच्या गजरात पैठणच्या नाथषष्ठी महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्त हजारो दिंड्या काल पैठण शहरात दाखल झाल्या. षष्ठीनिमित्त काल गावातल्या नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान आणि आणि अभिषेक करुन नाथ वंशजांच्या हस्ते पुन्हा स्थानापन्न करण्यात आलं. नाथ मंदीरातल्या संत एकनाथांच्या समाधीची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सपत्निक पूजा केली. दुपारच्या वेळी गावातल्या नाथ मंदिरातून नाथवंशज आणि मानकर्यांची मानाची निर्याण दिंडी पारंपारिक अभंग म्हणून काढण्यात आली.

****

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांचा स्मृतिदिन काल देशभरात शहीद दिवस पाळण्यात आला. यानिमित्त औरंगाबाद इथं स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ इथं रक्तदान शिबीर घेण्यात आलं.

परभणीत शहिद दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा आणि परभणी महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.

उस्मानाबाद इथंही भाजप युवा मोर्चाच्या वतीनं महापुरुषांच्या नावानं असलेल्या चौकांची स्वच्छता करून शहिदांना अभिवादन करण्यात आलं.

****

कृषी पणन मंडळानं आंबा निर्यातीसाठीची अत्यावश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. गेली दोन वर्षे कोविडमुळे आंबा निर्यात अडचणीत आली होती. यंदा सुमारे अडीच हजार टन आंब्याच्या निर्यातीचं उद्दिष्ट असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. राज्यात आंबा निर्यातीच्या प्रक्रियेसाठी कृषी पणन मंडळाची नऊ निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत झाली आहेत. त्यात बारामती, रत्नागिरी जिल्ह्यातलं नाचणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जामसंडे  तसंच जालना, लातूर, बीड, वाशी इथल्या केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून सुमारे ३५ ते ४० हजार मेट्रिक टन आंबा निर्यात केली जाते.

****

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद शहरालगत कौडगाव इथं साकारलेला ‘महानिर्मितीचा’ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, पाच मेगावॅट ऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे. हा  प्रकल्प ५० मेगावॅट क्षमतेचा असून पुढील तीन महिन्यात पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर रामराव उंदरे यांची, तर उपाध्यक्षपदी विश्वंभर बाबर यांची निवड झाली आहे. खरेदी-विक्री संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांन उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर काल संघाच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांची निवड करण्यात आली.

****

राष्ट्रीय पोषण माह पंधरवडा निमित्त उस्मानाबाद तालुक्यात तेर इथल्या अंगणवाड्यांमध्ये बालकांना द्यावयाच्या सकस पूरक पोषण आहार तसंच स्वच्छता जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती. या जनजागृती रॅलीमध्ये नागरिकांना बालकांची काळजी आणि त्यांचा आहार याविषयी माहिती देण्यात आली.

****

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड रेल्वे विभागा मध्ये सध्या धावत असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-तिरुपती-पूर्णा या रेल्वे गाड्यांना १ एप्रिल ते २ ऑगस्ट दरम्यान मुदतवाढ दिली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात आलेल्या समृद्ध गाव या स्पर्धेअंतर्गत गुणवंत ठरलेल्या ११ गावांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमानपत्र देऊन गौरवण्यात आलं. या ११ गावांनी जलसंधारणाच्या १७ घटकांवर सातत्यानं काम केलं.

****

No comments:

Post a Comment