▼

Thursday, 24 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.03.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ मार्च २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

जागतिक क्षयरोग जनजागृती दिवस आज पाळण्यात येत आहे. क्षयरोगाचे आरोग्यावर होणारे परिणाम तसंच सामाजिक, आर्थिक परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि जागतिक साथरोग निवारणाचे प्रयत्न करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च ला हा दिवस पाळला जातो. क्षयरोगाचं संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी दि्ल्ली इथं होत आहे.

दरम्यान, जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, क्षयरोग निर्मुलनात गुंतलेल्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. देशाला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.

****

भारतानं अंदमान आणि निकोबारमध्ये ब्रह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पृष्ठभागावरून यशस्वी चाचणी घेतली आहे. विस्तारित पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राने अचूकपणे लक्ष्य गाठलं. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी अभिनंदन केलं.

****

देशातल्या १२ ते १४ वयोगटातल्या ५० लाखांपेक्षा अधिक मुलांना कोविड पासून बचाव करण्यासाठी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. जगातली ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असून अभियानाचं हे आणखी एक मोठं यश असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे.

****

राज्य परिवहन महामंडळ एस. टी. चा संप तत्काळ स्थगित करावा या मागणीसाठी आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एस. टी. वाचवा - एस. टी. वाढवा कृती समितीच्या वतीनं निदर्शने करण्यात आली. विद्यार्थी-सामान्यांची लूट थांबवण्यासाठी तत्काळ एस टी सेवा सुरू झाली नाही तर, प्रत्येक बस डेपो समोर सत्याग्रह करण्याचा इशारा साथी सुभाष लोमटे यांनी यावेळी दिला. 

****

दुबई इथं सुरु असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत धावपटू प्रणव प्रशांत देसाईनं काल भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं आणि पुरुषांच्या २०० मीटर अंतिम फेरीमध्ये सर्वोच्च पारितोषिक मिळवलं. फाझा अजिंक्यपद स्पर्धांमधील माजी सुवर्णपदक विजेत्या देसाईनं २४ पूर्णांक ४२ सेकंदात शर्यत संपवली.

****

No comments:

Post a Comment