Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 01 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ एप्रिल २०२२ सायंकाळी
६.१०
****
** विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षेला सामोरं
जाण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला
** किमान
आधारभूत किंमतीशी संबधित मुद्यावर समिती गठीत करण्यासाठीची प्रक्रिया सुरू - कृषिमंत्री
नरेंद्रसिंह तोमर
**
शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन, आपला सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण
** सहकारी
कायद्यातील
अक्रियाशील सदस्याची तरतूद रद्द
आणि
** सीएनजी
आणि पीएनजी वायूवरील मूल्यवर्धित कर तीन टक्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय
****
विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षेला सामोरं
जाण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देश
-विदेशातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पंतप्रधान मोदी
यांनी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. एप्रिल
महिन्यात आपल्याकडे अनेक सण उत्सव असतात, हाच परीक्षांचाही
काळ असतो. त्यामुळे या उत्सवी वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षांचाच उत्सव करत,
आनंद, उत्साह, आत्मविश्वास
आणि मुक्त वातावरणात परीक्षेला समोरं जावं असं ते म्हणाले. परिक्षा हा आपल्या
जीवनाचा एक भाग असून, आपल्या विकास यात्रेचे हे छोटे छोटे
टप्पे आहेत. तुम्ही जे काही करता ते पूर्ण आत्मविश्वासाने करत राहा, अभ्यास करताना मन एकाग्र ठेवा, असं ते म्हणाले.
मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम
पाहिला.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या जवाहर
नवोदय विद्यालयाच्या ४४२ विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम दूरदर्शनच्या वाहिनीवरून
पाहिला. या कार्यक्रमात विद्यालयाचे ४० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील
सहभागी झाले होते.
वाशिम जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयातले ४९५ विद्यार्थी या कार्यक्रमात
सहभागी झाले होते. मुख्याध्यापक सचिन खरात यांच्यासह ४० शिक्षक आणि १०० पालकांनी थेट
प्रसारण पाहिलं.
धुळे इथं जवाहर नवोदय विद्यालयात आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन
पध्दतीनं या कार्यक्रमात सहभाग घेतला.
****
शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किंमतीशी संबधित मुद्यावर समिती गठीत
करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचं कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज
राज्यसभेत एका पूरक प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं. या
समितीत केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रतिनिधींसोबतच शेतकरी संघटना, तसंच कृषि वैज्ञानिकांना सामील केलं जाईल असं तोमर यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ही समिती
स्थापन करण्याची घोषणा केली होती.
****
राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयानं राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण २०२१चा मसुदा तयार केला आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चन्द्रशेखर यांनी आज राज्यससभेत एका लेखी उत्तरात
ही माहिती दिली. या मसुद्यात सायबर सुरक्षेशी संबधित सर्व मुद्ये समाविष्ट केलं जातील असं त्यांनी सांगितलं.
इंटरनेटचं स्वातंत्र्य, सुरक्षा आणि विश्वास यासाठी कटिबद्ध
असून सरकार सायबर हल्ल्यांसंदर्भात सावध असल्याचंही
चंद्रशेखर यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना
गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. आपला सहकाऱ्यांवर पूर्ण
विश्वास असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री सचिवालयानं
याबाबत पत्रक जारी करुन या वृत्ताचं खंडन केलं
आहे. प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरु होती. यासंदर्भातील बातम्या चुकीच्या आणि
विपर्यास करणाऱ्या आहेत. गृहमंत्री उत्तम काम करीत असल्याचंही
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज
मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
प्रसारमाध्यमांशी
बोलतांना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी, गृह विभागावर
नाराज नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला असल्याचं सांगितलं. आपण सगळ्यांना
विश्वासात घेऊन काम करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. गृहखात्याच्या कामकाजात जर
काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा केली जाईल
असं ते म्हणाले.
गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक झाली, महाराष्ट्र पोलिसांचा ११२ प्रकल्पाचा शुभारंभ
उद्यापासून केला जात आहे. त्यासंबंधीचं नियोजननासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये दुरुस्ती करुन त्यातील
अक्रियाशील सदस्याची तरतूद रद्द करण्यात आली
आहे. २०१३ मध्ये केंद्र सरकारनं ९७ वी घटनादुरुस्ती करतांना सहकार अधिनियमात मोठ्या प्रमाणात बदल केले
होते. त्यानुसार राज्यानंही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये
बदल केले होते. यातील काही बदल राज्याच्या
दृष्टीनं सहकार क्षेत्रासाठी बाधक ठरत होते. मात्र घटनेतील तरतुद असल्याने राज्य शासनास अधिनियमातील कलमात बदल करणे शक्य होत नव्हते. मात्र
सर्वोच्च न्यायालयाने सहकार कायदा हा राज्यसुचीप्रमाणे राज्याचा विषय असल्याचा
निर्वाळा देत ९७ वी घटना दुरुस्तीच रद्दबादल ठरविली. त्यानंतर
राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी बाधक ठरणाऱ्या अधिनियमातील काही
कलमात बदल करण्याच्या प्रस्तावास विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही
सभागृहांनी मंजूरी दिली. त्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून
याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
****
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातल्या
सर्व पथकर नाक्यांवरील पथकरात आजपासून दहा ते ६५ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मोटारीसाठीच्या दरात दहा रुपये तर
व्यावसायिक वाहनांसाठीच्या दरात ६५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्गावर एकूण ३२ पथकर
नाके कार्यरत आहेत.
****
राज्यात वाहनात इंधन म्हणून वापरण्यात येणारा -सीएनजी
आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा पीएनजी वायू या नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कर तीन टक्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय
वायू कंपन्यांनी घेतला आहे. आजपासून या नव्या दराची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
यापूर्वी हा दर साडेतेरा टक्के होता. या इंधनावरचा मूल्य वर्धित
कर कमी करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या
अर्थसंकल्पात केली होती.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील हासेगाव इथल्या एका ५० वर्षीय
शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे. लिंबराज तुकाराम सुकाळे असं या
शेतकऱ्याचं नाव असून शेतात काम करत असतांना त्यांना चक्कर आली. त्यांना
दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यु झाल्याचं डॉक्टरांनी
सांगितलं.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा ४०
अंशावर गेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं
आहे.
****
महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेनं
आज राज्यभरात लाक्षणिक धरणं आंदोलन केलं. उस्मानाबाद
जिल्हा शाखेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
या धरणं आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय
अधिकारी, यांच्यासह जिल्ह्यातले सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार सहभागी झाले होते. प्रलंबीत सेवा विषयक मागण्याचं निवेदन
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या तळगाव इथं गेल्या २९ मार्चला
बेकायदेशीरित्या आयोजित करण्यात आलेल्या बैलांच्या झुंजीत एका बैलाचा मृत्यु
झाल्याप्रकरणी १२ आरोपींविरूद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, शिवसेनेचे ओबीसी सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांच्यासह १०
जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज
दुपारी मालवण न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयान त्यांची जामीनावर
मुक्तता केली.
****
No comments:
Post a Comment