Friday, 1 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.04.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेले सर्व निर्बंध उद्यापासून हटवण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मास्क घालण्याचा निर्णय ऐच्छिक

·      ४० ते ५० वर्ष वयोगटातल्या सर्व राज्य कर्मचाऱ्यांची दोन वर्षातून एकदा, तर ५१ वर्षावरील कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी, राज्य कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरांत आजपासून सुधारणा

·      राज्य परीवहन महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय

·      स्थावर मालमत्ता खरेदी - विक्रीसाठीच्या रेडीरेकनर दरात पाच टक्के वाढ

·      राज्यात कोविड संसर्गाचे ८३ तर मराठवाड्यात सात नवे रुग्ण

·      राज्यातल्या शाळांना दोन मे ते १२ जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर

·      नागपूरमधील विधिज्ञ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक

आणि

·      संशोधक विद्यार्थीनीला २५ हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच्या शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे निलंबित

****

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेले सर्व निर्बंध उद्यापासून हटवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. मास्क बंधनकारक न ठेवता ऐच्छिक ठेवल्याची घोषणाही त्यांनी केली. ५० टक्के उपस्थिती, मास्क, दुहेरी लसीकरण, हे निर्बंध हटवण्यात आले आहेत, मात्र याचा अर्थ लोकांनी बिनधास्तपणे वागावं असा नाही. काळजी घ्यायला हवीच, असंही टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले,

‘‘लोकांनी वागावं आणि वावरावं, एक नक्किच आहे की काळजी घेतलीच पाहिजे, अन् त्यासाठी  जरीही इंग्लिशमधे मेंडेटरी म्हणजे अनिवार्य असा नाही, परंतू ऐच्छिक जरूर आहे, आणि ऐच्छिक असल्या कारणानी अपील हीच राहील, विनंती हीच राहील लोकांनी आपली स्वतःची आणी इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल तेवढ्या मैग्ज़िमम पब्लिकच्या ठिकाणी आणि मह्त्वाच्या सगळ्या ठिकाणी मास्क घालावं परंतू ते ऐच्छिक स्वरुपाने असेल, असा निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे.’’

[$2F98AAA0-2860-427F-BBF6-4CC8B6AD9708$Rajesh Tope Byte for 01.04.2022 07.10 - Rajesh Tope Byte for 01.04.2022 07.10 - ]

याबरोबरच आता राज्यातले उत्सव, गुडीपाडवा, विविध प्रकारच्या शोभायात्रा तसंच डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण उत्साहानं साजरी  करण्यात येईल, संही टोपे यांनी सांगितल.  

****

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र भविष्यात कोविडचा धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, लस घेण आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. आरोग्य विषयक नियम पाळून आपली तसंच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. पोलीस यंत्रणा,  पालिका-नगरपालिका, महसूल आणि ग्रामविकास यंत्रणा, तसंच एकूणच यंत्रणेनं कोविड साथीचा दिवसरात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं आणि सर्वांचे मनापासून आभार मानले.

****

राज्यातल्या ४० ते ५० वर्ष या वयोगटातल्या सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोन वर्षातून एकदा, तर ५१ आणि त्यावरील वयोगटातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यासाठी पाच हजार रुपये इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरांत आजपासून सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता किमान ६७५ ते कमाल ५४०० रुपये एवढा वाहतूक भत्ता दरमहा कर्मचाऱ्यांना मिळेल. शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयातले अध्यापक, संच अधिष्ठाता, सह संचालक आणि संचालक या संवर्गाना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते लागू करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत--- घेण्यात आला.

राज्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्याही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

अनुदानित कला संस्था कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली ३१ अशासकीय कला संस्थांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देण्यास, १० जलदगती न्यायालयांना पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास, १४ व्या वित्त आयोगांतर्गत पाच वर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या १४ कौटुंबिक न्यायालयांना कायमस्वरुपी मान्यता देण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन अंतर्गत सामाजिक परिवर्तनाच्या हेतूनं राज्यात मिशन महाग्राम’ राबवण्यास आणि, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही बंद करण्याऐवजी १० टक्के राज्य योजना म्हणून राबवण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं कोवॅक्सिन लस उत्पादित करण्याच्या प्रकल्पास अर्थसहाय्य करण्यास आणि उत्पादनाच्या तंत्रज्ञानात काही आवश्यक बदल करण्यासदेखील काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

संपकरी राज्य परीवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारनं सात वेळा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होत, मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, संप मागे घेत नाहीत. याचा अर्थ या कर्मचाऱ्यांना कामाची गरज नाही, असंही परब म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी, तसंच इतरांनाही मोठ्या प्रमाणावर त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कत्रांटी कर्मचाऱ्यांना एसटीच्या सेवेत घेतलं जाईल आणि एसटी पूर्णक्षमतेनं कार्यान्वित केली जाईल. जवळपास ११ हजार नवीन कत्रांटी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे, असं परब यांनी सांगितलं.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ३९ कोटी रुपये काल महामंडळाला वितरीत करण्यात आले.

****

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं स्थावर मालमत्ता खरेदी - विक्रीसाठीच्या रेडीरेकनर दरात पाच टक्के वाढ केली आहे. मुंबई वगळून ही वाढ करण्यात आली असून, आजपासून हे नवे दर लागू झाले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रेडीरेकनरच्या दरात दोन पूर्णांक ३४ टक्के, ग्रामीण भागात सहा पूर्णांक ९६ टक्के, नगरपरिषद हद्दीत तीन पूर्णांक ६२ टक्के, महानगरपालिका हद्दीत आठ पूर्णांक ८० टक्के वाढ झाली आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७हजार २४ झाली आहे. या संसर्गानं काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७८ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल २१९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २५ हजार ३३९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नांदेड, परभणी, तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना दोन मे ते १२ जून पर्यंत  उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.  नवीन शैक्षणिक वर्ष १३ जून पासून सुरु होणार असल्याचं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी सांगितलं आहे. विदर्भातल्या शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता २७ जून पासून सुरु होणार आहे.  उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करुन या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळ सारख्या सणांच्या वेळेस देता येणार आहेत.  या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहे.  मात्र या सुट्टया देताना त्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार असल्याचं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.  

****

नागपूरमधील विधिज्ञ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना सक्तवसुली संचालनालय - ईडीनं अटक केली आहे. जमीन व्यवहारांसंबंधी एका प्रकरणात ईडीने त्यांच्यावर काल छापेमारी केली होती, तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. उके यांना २०१८ साली एका जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोन महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतरही ते पोलिसांना शरण न आल्यानं त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही नागपूर खंडपीठानं दिले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करत सतीश उके यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.

****

संशोधक पीएच डी करणाऱ्या विद्यार्थीनीला २५ हजार रुपये मागितल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांना निलंबित करण्यात आलं आहे. एक प्राध्यापिका संशोधक विद्यार्थिनीला प्रति विद्यार्थी २५ हजार आता आणि तेवढेच पैसे मौखिक परिक्षेच्यावेळी गाईडला द्यावे लागतील, अशी ऑडियो क्लिप सामाजिक माध्यमावर व्हायरल झाली. शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे ५० हजारांची लाच मागण्यात आली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये विद्यार्थी संघटनेनं कुलगुरुंकडे आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती.  यासंदर्भात चौकशी केल्यानंतर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ही कारवाई केली.

****

वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी, तसंच वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ. राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याविषयी सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश औरंगाबादमधल्या महावितरणच्या सह व्यवस्थापकीय संचालकांना दिल्याचं राऊत यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद महानगरपालिकेचा आर्थिक वर्ष २०२२-२३ चा एक कोटी ७६ लाख नऊ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात एक हजार ७२८ कोटी अपेक्षित जमा आणि जवळपास एक हजार ७२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या आर्थिक वर्षात २०० कोटी रुपपयांचे रस्ते, महापुरुषांचे पुतळे, संशोधन केंद्राची निर्मिती, व्यापारी संकुल, सेंट्रल नाका इथं मनपाची प्रशासकीय इमारत बांधण्याचा संकल्प केला असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

****

बीड जिल्ह्याल्या सर्व एच आय व्ही बाधीत महिलांना गुडीपाडव्याच्या निमित्तानं बीड जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या वतीनं साड्या भेट देण्यात आल्या. जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी शिल्लक असलेल्या निधीमधून हा अभिनव उपक्रम राबवला.

****

No comments:

Post a Comment