Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 April 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं
आहे. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनच्या इमारतीचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते
आज मराठी नव वर्षाच्या प्रारंभाच्या मुहुर्तावर झालं, त्यावेळी ठाकरे बोलत होते. भाषा
ही संस्कृतीची ओळख आहे तसंच मराठी भाषेची सक्ती करावी लागते, हे दुर्दैव असल्याची भावना
त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीच्या कामाचं
भूमीपूजनही आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केलं. सरकारमध्ये
कुठेही रुसवे-फुगवे नाहीत, आपल्या सरकारचं नाव महाविकास आघाडी आहे. ही आघाडी जमिनीवर
राहून राज्य विकासाचं नियोजनबद्ध काम करत आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गुढीपाडवा,
मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचं जावो अशी
आपण प्रार्थना करतो. आगामी वर्षात आपल्या सर्व
मनोकामना पूर्ण होवोत, असं मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशवासीयांना
शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेतीचंद, नवरेह तसंच साजिबू
चेराओबाच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८४ कोटी ५२ लाखांहून अधिक मात्रा देण्यात
आल्या आहेत. काल १८ लाख ३८ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. दरम्यान, देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या १
हजार २६० रुग्णांची नोंद झाली, ४ हजार ४०० हून अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले,
अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात सध्या १३ हजार ४४५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. देशात या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७६ शतांश टक्के
आहे. या संसर्गातून आता पर्यंत ४ कोटी २४ लाख ९२ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
देशात या संसर्गासाठी ७९ कोटीहून अधिक चाचण्या झाल्या असून काल दिवसभरात ५ लाख २८ हजारांहून
अधिक चाचण्या करण्यात आल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र
गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण `म्हाडा`चा वर्ष २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प
आणि वर्ष २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प प्राधिकरणाला नुकताच सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या
वर्ष २०२२-२०२३ च्या दहा हजार ७६४ कोटी ९९ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि वर्ष २०२१-२०२२
च्या सुधारित सात हजार ९७६ कोटी ७४ लाख रुपयांच्या रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता
मिळाली आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या औरंगाबाद
तसंच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोंकण या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १५
हजार ७८१ सदनिकांचं बांधकाम करण्याचं प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात सात हजार
एकोणीस कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
दौलताबादजवळ आज सकाळी रेल्वे रुळावरुन मालगाडीचे आठ डब्बे घसरल्यानं रेल्वे
वाहतूक विस्कळित झाली आहे. या अपघातामुळं रोटेगाव- काचीगुडा प्रवासी रेल्वे पोटूळ रेल्वे स्थानकावर
तर जालना -दादर जनशताब्दी औरंगाबाद स्थानकावर
थांबवण्यात आली होती. निजामाबाद- पुणे प्रवासी
रेल्वेही औरंगाबाद स्थानकावर थांबवण्यात आली होती. अमृतसर -नांदेड सचखंड जलद रेल्वेला लासुर स्थानकावर थांबवण्यात आलं होतं. रेल्वे वाहतूक आता सुरळित होईल,
असं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक बहुल भागाच्या विकासासाठी
राज्य शासनानं अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून ५ कोटी ६० लाख रुपये
मंजूर केले आहेत. त्यापैकी भोकर मतदारसंघासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात
आला आहे.
****
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन
भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या बैठकीत परिषदेच्या कार्यकारिणीत फेरबदल
करण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment