Sunday, 3 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.04.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मजूर प्रकरणात तपासकामी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. उद्या सोमवारी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीच्या धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून त्यांनी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून जवळपास २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८४ कोटी ६६ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल १२ लाख ७५ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत १२ ते १४ वयोगटातल्या ८४ लाखांहून अधिक मुलांचं लसीकरण झालं आहे. एकंदर २ कोटी ३४ लाख आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि ६० वर्षांवरच्या नागरिकांना लसीची वर्धक मात्रा देण्यात आली आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोना विषाणु संसर्गाचे नवे १ हजार ९०० रुग्ण आढळले तर १ हजार ४०० रुग्ण या आजारातून बरे झाले. सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७६ शतांश टक्के आहे. सध्या देशभरात जवळपास १३ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारांना केंद्रसरकारनं आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या १८५ कोटी २१ लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सद्यस्थितीत केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांकडे लसीच्या १५ कोटी ६२ लाखांहून अधिक मात्रा शिल्लक आहेत.

****

आणखी तीन महिने तरी भारतात कोविडची चौथी लाट येणार नाही, असा दावा भारतीय वैद्यकीय परिषद महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी केला आहे. मात्र असं असलं तरी मास्क वापरणं बंद करू नका, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापराच, असा सल्ला डॉक्टर भोंडवे यांनी दिला आहे. राज्य सरकारनं प्रतिबंधात्मक नियम, मास्क निर्बंध शिथील केले आहेत मात्र, मास्क वापरू नका असं सांगितलेलं नाही असं डॉक्टर भोंडवे यांनी नमूद केलं आहे.

****

सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. ती आजही कायम आहे आणि उद्याही राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपासंदर्भात कोल्हापूरमध्ये वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. गेल्या काही वर्षातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी तपासला तर त्यांना हे दिसून येईल, याउलट राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसतं, हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे, असं ते म्हणाले. राज ठाकरे बरेच वर्षे हे कुठं भूमिगत झाले होते, ते काल आले, दोनचार वर्षे भूमिगत होतात, नंतर बाहेर येतात एखादं व्याख्यान देतात आणि परत दोन वर्षे काय करतात हे आपल्याला माहिती नाही, असंही पवार म्हणाले.

विरोधी पक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचं आपण नेतृत्व स्वीकारणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असं सांगत ज्या पक्षाचा देशभर विस्तार आहे, त्याच्याकडे नेतृत्व असावं, असं ते यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

****

नंदुरबार जिल्ह्यात धडगावमध्ये आज शिवसेनेच्या वतीनं वाढत्या महागाई विरोधात थाली बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नंदुरबार शहरात देखील शिवसैनिकांनी अंधारे चौकात आंदोलन करत घोषणाबाजी केली. औरंगाबाद जवळच्या वाळूज पंढरपूर इथं ही युवासेनेनं महागाई विरोधात थाली बजाओ आंदोलन केलं.

****

पुण्यात काल झालेल्या गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्यांकडून पोलिसांनी २७ लाखांची रोकड आणि आठ मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सनी उर्फ भुपेंद्र चरणसिंग गिल, रिक्की राजेश खेमचंद आणि सुभाष रामकीसन अगरवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. पिंपरीत वैभव पॅराडाईज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा सट्टा खेळला जात होता, याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या इमारतीवर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतलं.

****

No comments:

Post a Comment