Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची
सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी ग्रंथ
पूजन करून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. त्यानंतर ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन
झालं. संमेलनाचं औपचारिक उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या
हस्ते होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत
आहे. या संमेलनासाठी, देशभरातल्या सुमारे एक हजारावर मराठी साहित्यिकांना निमंत्रित
करण्यात आलं आहे. संमेलन स्थळाचं ‘भारतरत्न लता मंगेशकर साहित्यनगरी’ असं नामकरण करण्यात
आलं असून, विविध कार्यक्रमांसाठी सात व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. साहित्यप्रेमींच्या
स्वागतासाठी शहरातल्या मुख्य मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी आज निमंत्रितांचं कवी संमेलन होणार आहे. तसंच स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव - काय कमावले, काय गमावले? या विषयावर, मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे
चित्रण - किती खरे, किती खोटे?, मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्रीवादात अडकले आहे
का?, मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू यांचं भाषिक आणि सांस्कृतिक अनुबंध, आणि लेखक
आणि लोकशाही मूल्ये, या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तसंच लोककलेमध्ये जागरण, गोंधळ,
भारुड, पोतराज, दंडार, घुसाडी आदी नृत्यांचं सादरीकरण होणार आहे.
****
जागतिक वसुंधरा दिन आज पाळण्यात येतो. पृथ्वीच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरण
संरक्षणाचं समर्थन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा
केला जातो. इन्वेस्ट इन अवर प्लॅनेट - आपल्या पृथ्वीसाठी गुंतवणूक करा, ही यंदाची या
दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी, नागरीकांना
पर्यावरणाचं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी चित्रफितीच्या माध्यमातून जागतिक वसुंधरा दिनानिमित्त संदेश दिला
आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयनं ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्ड देणाऱ्या
कंपन्यांना कडक निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय
क्रेडिट कार्ड जारी करू नये किंवा विद्यमान कार्ड अपग्रेड करू नये, असं म्हटलं आहे.
ग्राहकांच्या संमती शिवाय कार्ड दिल्यास त्यांना बिलाच्या दुप्पट रक्कम दंड भरावी लागेल,
असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.
****
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या अटकेला आव्हान
देणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं
नकार दिला आहे. या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
कोरोना संसर्ग कमी झाल्यानं आणि निर्बंध हटवल्यानं यंदाची आषाढी वारी मोठ्या
प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. ही वारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय
ठेवून आवश्यक नियोजन करावं, अशी सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी
दिली आहे. आषाढी वारी पूर्व नियोजन बैठकीत ते आज बोलत होते. यंदाची आषाढी वारी दहा
जुलै ला भरणार असून, सुमारे दहा ते बारा लाख भाविक पंढरपुरात येतात. येणाऱ्या भाविकांना
प्रशासनाकडून आवश्यक मूलभूत सोयी सुविधा, सुरक्षा दिली जावी, जागेची व्यवस्था करावी,
आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ काल मध्यरात्री देवगिरी एक्सप्रेसवर
दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी रेल्वे सिग्नलला कापड बांधून गाडी थांबवली. त्यानंतर
तुफान दगडफेक करत सुमारे दहा जणांच्या टोळीने गाडीत प्रवेश केला. यावेळी प्रवाशांचे
मोबाईल, पाकिटे, पर्स आणि महिलांचे दागिने लुटून नेल्याची माहिती एका प्रवाशाने दिली
आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या गोळेगाव इथं कृषी प्रदर्शनास भेट देण्यासाठी
जात असताना कृषिमंत्री दादा भूसे यांनी काल बाराशिव, करंजाळा शिवारात हळद काढण्यात
येत असलेल्या शेतात भेट देत शेतकरी आणि मजूर महिलांशी साधला. यावेळी त्यांनी हळद शिजवण्यासाठी
वापरात येणाऱ्या कूकर सबसिडीबद्दल माहिती घेतली.
****
मागासवर्गीयांचं जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या
दलित वस्ती तसंच सेस निधी अंतर्गत २० टक्के मागासवर्गीयांना आणि पाच टक्के दिव्यांगना
वैयक्तीक लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लीकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे
यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काल परभणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी अजिंक्य पवार यांना घेराव घालून आंदोलन केलं. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत
वैयक्तिक लाभ यांच्या मंजूर याद्या आणि निधी तात्काळ पंचायत समितींना वर्ग करण्यात
यावा, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
****
No comments:
Post a Comment