▼

Friday, 22 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.04.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ एप्रिल २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं आजपासून ९५ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते आज सकाळी ग्रंथ पूजन करून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. त्यानंतर ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन झालं. संमेलनाच्या पहिल्या दिवशी आज परिसंवाद आणि निमंत्रितांचं कवी संमेलन होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ काल मध्यरात्री देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी रेल्वे सिग्नलला कापड बांधून गाडी थांबवली. त्यानंतर तुफान दगडफेक करत सुमारे दहा जणांच्या टोळीने गाडीत प्रवेश केला. यावेळी प्रवाशांचे मोबाईल, पाकिटे, पर्स आणि महिलांचे दागिने लुटून नेल्याची माहिती एका प्रवाशाने दिली आहे. याबाबत दौलताबाद, लासूर, औरंगाबाद शहरात अलर्ट देण्यात आला असून, पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे.

****

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर असून, आज त्यांचं दिल्लीत राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी बोरिस जॉन्सन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. उभय नेत्यांमध्ये आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे. तत्पूर्वी जॉन्सन यांनी राजघाट इथं महात्मा गांधीजींच्या समाधीला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.

****

उत्तर प्रदेशातल्या धार्मिक स्थळांवर यापुढे नव्यानं भोंगे लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसंच धार्मिक मिरवणुकीत शस्त्रास्र प्रदर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. परवानगी घेतलेल्या भोंग्याचा आवाजही धार्मिक स्थळाच्या बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

****

भारताच्या सरिता मोर आणि सुषमा शोकीन या कुस्तीपटूंना आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदकं मिळाली आहेत. मंगोलियात सुरू असलेल्या स्पर्धेत फ्री - स्टाइल गटात त्यांना हे पदक मिळालं. आतापर्यंत भारतानं या स्पर्धेत ७ कांस्य पदकं जिंकली आहेत.

****

No comments:

Post a Comment