Sunday, 22 May 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २२ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 May 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्र सरकारकडून अबकारी करात कपात; लीटरमागे पेट्रोल साडेनऊ रुपये तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत वर्षभरात १२ वेळा प्रतिसिलिंडर दोनशे रुपये अनुदान

·      महागाई आटोक्यात आणण्यासाठी राज्यांकडेही नियंत्रण आवश्यक-विधीज्ञ प्रकाश आंबेडकर

·      मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद टोळीशी थेट संबंध-मुंबई सत्र न्यायालयाचं निरीक्षण

·      राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ३०७ नवे रुग्ण

·      औरंगाबाद इथं एका महाविद्यालयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या;हल्लेखोर पसार

·      अधिकृत नोंदणी नसल्याने जालना जिल्ह्यातली १४ रुग्णालयं बंद

·      हिंगोली जिल्ह्यात काल वेगवेगळ्या दोन अपघातात तिघांचा मृत्यू

आणि

·      ग्वांग्झू तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला सुवर्णपदक तर थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचं आव्हान संपुष्टात

****

केंद्र सरकारने पेट्रोल डीझेलच्या अबकारी करात मोठी कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल ट्विट संदेशातून ही माहिती दिली. पेट्रोलवरच्या करात प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवरच्या करात प्रतिलिटर ६ रुपये कपात करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर साडेनऊ रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर सात रुपये घट होणार आहे. सर्व राज्य सरकारांनी, विशेषत: केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ मध्ये केलेली कपात लागू न केलेल्या राज्य सरकारांनीही केंद्राच्या धर्तीवर पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करुन सर्व सामान्यांना दिलासा द्यावा, असं आवाहन सीतारामन यांनी केलं आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. एका वर्षात बारा सिलिंडरपर्यंत हे अनुदान लागू राहील, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

****

महागाई आटोक्यात आणण्यासाठी राज्यांकडे काही प्रमाणात नियंत्रण असणं आवश्यक असून संपूर्णपणे बाजारपेठेतल्या व्यवहारांवर अवलंबून राहता कामा नये, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल अमरावती इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्यास राज्यांना हस्तक्षेप करता यायला हवा, असं ते म्हणाले.

सध्या शेतकरी आपल्या शेतीची मशागत करत आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता यावर्षी हा प्रकार होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावं यासाठी पणन मंडळाची स्थापना करण्यात आली होती मात्र त्याचा उद्देश पूर्ण होताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.

****

इतर मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणासंदर्भात दोन वर्षांत अनुभवजन्य आकडेवारी तयार करण्यात राज्य सरकार कमी पडलं असल्याचा पुनरुच्चार विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी हे सरकार धडपड करतं, मात्र ओबीसी आरक्षणासाठी माहिती संकलित करू शकत नसल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

****

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिम टोळीशी थेट संबंध असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. काल झालेल्या सुनावणीत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हे निरीक्षण नोंदवत, पुढील कारवाईसाठी ईडीला पुरेसा आधार असल्याचं, स्पष्ट केलं आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर हिच्याशी व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे, तेव्हापासून मलिक तुरुंगात आहेत.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथल्या विविध ऐतिहासिक स्थळांची काल पाहणी केली. राजे लखोजी जाधव राजवाडा इथल्या जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांनी दर्शन घेतलं. राजवाड्यातल्या पुरातत्व विभागातर्फे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करुन पवार यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.  

****

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे कामगारांना न्याय देऊ अशी ग्वाही  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते काल सोलापूर इथं शेतकरी स्नेह मेळावा आणि गळित हंगाम सांगता समारंभ कार्यक्रमात बोलत होते. महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरवला जाणार आहे. तसंच महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृहांची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणं  आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. 

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ३०७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८२ हजार ४७६ झाली आहे. काल या संसर्गाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल २४० रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३२ हजार ७९२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार ८२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

राज्यातली अकरावी प्रवेशाची ऑनलाइन अर्ज सरावप्रक्रिया उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. मुंबई महानगर क्षेत्र यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती आणि नाशिक महापालिका क्षेत्रातल्या राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी 11th admission.org.in या संकेत स्थळावर ही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना सरावासाठी उपलब्ध अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. ३० मे पासून अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत, अर्जाचा पहिला भाग भरता येईल. तर निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात होईल.

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातले अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधून औरंगाबाद शहराला वगळण्यात आल्याचं पत्र विभागीय शिक्षण उपसंचालकांना पाठवल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

****

 

आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड‘ ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते काल जालना इथं बोलत होते. या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकरण्यात येणार नसून ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांनाही परीक्षा देता यावी यासाठी शिफारस करण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

जल जीवन मिशन योजने अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणी पोहचवण्यासाठी 'हर घर नल, हर घर जल' या बिद्रवाक्याप्रमाणे हे मिशन यशस्वीरित्या राबवण्याच्या सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केल्या आहेत. औरंगाबाद इथं या योजने संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जायकवाडी धरण आणि हर्सूल तलाव इथं तरंगते सौरऊर्जा प्रकल्प लवकरच तयार करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प दरात वीज मिळेल तसंच पाण्याचे बाष्पीभवन होण्यास अटकाव होऊन दुहेरी लाभ होणार असल्याचं डॉ.कराड यांनी सांगितलं. जिल्ह्यातील ७१ टक्के गावांचा जल जीवन मिशन जिल्हा कृती आराखडा तयार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली.

****

औरंगाबाद इथं काल एका महाविद्यालयीन तरुणीची भर दुपारी हत्या झाली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरातल्या नामांकित महाविद्यालयात शिकणारी ही तरुणी काल दुपारी महाविद्यालयाजवळच्या कॉफी शॉपमधून बाहेर पडत असताना, संबंधित तरुणाने तिला आपल्यासोबत बळजबरीने ओढत नेलं, आणि धारदार शस्त्राने अनेक वार करून फरार झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केलं असून, सदर तरुणाचा तपास सुरू केला आहे.

****

अधिकृत नोंदणी नसल्याने जालना जिल्ह्यातली १४ रुग्णालयं काल बंद करण्यात आली. जालना तालुका आरोग्य अधिकारी शीतल सोनी यांनी काल रामनगर, सिंधीकाळेगाव इथल्या रुग्णालयांची तपासणी केली, त्यावेळी ही बाब निदर्शनास आली. जालन्यात बोगस डॉक्टरकडून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा प्रकार उघडकीला आल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागानं आठ पथकांच्या माध्यमातून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची तपासणी करून कारवाई सुरू केली आहे.

****

 

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा आणि लाहोरा तालुक्यातील भूकंपग्रस्त आणि तालुक्यातील विविध समस्याकडे जिल्हा प्रशासन आणि विभागानं लक्ष घालून प्रश्न सोडवावेत असे आदेश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना त्यांच्या हक्क देण्याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ज्या शेतकऱ्यांनी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वत:च्या जमिनी दिल्या त्यांचे पाल्य आणि वारस बेरोजगार आहेत. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढावा असंही त्यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात काल वेगवेगळ्या दोन अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हिंगोली- सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ एका चार चाकी वाहनाशी झालेल्या अपघातात रिक्षातले दोन प्रवासी ठार झाले. दुसऱ्या अपघातात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नांदेड - हिंगोली मार्गावर वरुड तांडा इथं झाला, या ठिकाणी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू झाला.

****

दक्षिण कोरियातल्या ग्वांग्झू इथं सुरू असलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं  सुवर्णपदक पटकावलं. फ्रांसविरुद्धच्या निर्णायक लढतीत पहिल्या दोन सेटमध्ये पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघानं उत्कृष्ट कामगिरी बजावत दोन गुणांनी विजय नोंदवला. अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि रजत चौहान यांचा समावेश असलेल्या चौथ्या मानांकित भारतीय पुरुष संघानं फ्रान्सविरुद्धच्या या लढतीत २३२-२३० असा विजय मिळवला.

****

थायलंड इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला उपांत्यंफेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दोन वेळा ऑलिंपिक विजेत्या चीनच्या चेन यू फेईकडून  सिंधूचा १७-२१,१६-२१, असा सरळ सेटमध्ये पराभव झाला. सिंधूचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या पाणी पश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी काल घागर मोर्चा काढला. महिला कार्यकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर माठ फोडून महापालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. दररोज स्वच्छ पाणीपुरवठा करावा, नळजोडणी नसलेल्या वसाहतींमध्ये त्वरित नळ जोडणी देण्यात यावी, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी पाणीपुरवठा विभागाला सादर करण्यात आलं.

दरम्यान, वाढत्या महागाईविरोधातही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काल औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली.

****

 

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी वामन दादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काल नांदेड इथं साहित्य संमेलन घेण्यात आलं होतं. या संमेलनाचं उदघाटन सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. संमेलनाच्या अध्यक्षपदी यशदाचे अधिकारी बबन जोगदंड हे होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक, नाटककार प्राध्यापक दत्ता भगत यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड जवळ गाढेजळगाव इथं होत असलेला बाल विवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना समजावून सांगत त्यांच्याकडून हमीपत्र घेतलं आहे. करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

****

हिंगोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. एल.एम. पठाण यांचं काल हिंगोली इथं निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते. वर्ष १९८५ मध्ये ते मुस्लिम लीगच्या तिकिटावर निवडून आले आणि विविध नगरसेवक मंडळींच्या सहकार्यानं नगरविकास आघाडीच्या बळावर नगराध्यक्ष झाले होते. एक यशस्वी डॉक्टर म्हणून डॉ. एल. एम. पठाण यांचा नावलौकिक होता.

****

मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झालेला मोसमी पाऊस येत्या दोन दिवसांत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

उर्वरित महाराष्ट्रात पाच जूनपर्यंत मोसमी पाऊस पोहोचू शकतो. तर बारा जून ते पंधरा जून या कालावधीत संपूर्ण राज्यभरात त्याचा विस्तार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

****

परभणी शहरासह जिल्ह्यात परवा शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परभणी  तालुक्यातील झरीसह परिसरातील ६४ गावांचा वीज पुरवठा सुमारे २४ तास खंडीत झाला होता. काल दुपारनंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment