Sunday, 22 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 May 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्य शासनाची पेट्रोल आणि डिझेलवरच्या मूल्यावर्धित करात कपात.

·      संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं संरक्षणमंत्र्यांचं आवाहन.

·      औरंगाबादच्या विकासाला चालना देणार- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड याची ग्वाही.

आणि

·      राज्यघटना हा जगण्याचा विषय - हरी नरके यांचं प्रतिपादन.

****

केंद्र शासनानं काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनानं आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर ‘व्हॅट’मध्ये कपात केली आहे. पेट्रोलवर दोन रुपये आठ पैसे तसंच डिझेलवर एक रुपया चव्वेचाळीस पैसे प्रती लिटर कपात करण्यात आली आहे. यामुळं राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे अडीच हजार कोटी रुपये भार पडणार असल्याचं राज्य सरकारनं एका निवेदनाद्वारे नमुद केलं आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्यानं महिन्याला पेट्रोलकरता ऐंशी कोटी रुपये आणि डिझेलला सव्वाशे कोटी रुपये इतकं महसुली उत्पन्न कमी होणार आहे. सोळा जून २०२० ते चार नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोलवर सात रुपये एकोणसत्तर पैसे आणि डिझेलवर पंधरा रुपये चौदा पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे २०२०मध्ये केंद्र सरकारनं पेट्रोलच्या अबकारी दरात तेरा रुपये आणि डिझेलच्या अबकारी दरात १६ रुपये अशी वाढ केली होती, असंही राज्य सरकारनं या निवेदनात म्हटलं आहे.

****

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नागपूर इथं संरक्षण मंत्रालयातल्या विविध विभागांच्या कार्याचा आढावा घेत अधिकारी-मान्यवरांशी संवाद साधला. संरक्षण मंत्रालयानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सिंह यांना यावेळी लष्करी संरचना आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांतर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती विमानतळावरच्या बैठकीमध्ये देण्यात आली. संरक्षण मंत्र्यांना यावेळी संरक्षण विभागाअंतर्गत सैन्य दल, वायूदल तसंच संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या सर्व संबंधितांनी संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्यावर लक्ष केंद्रीत करताना बाहेरच्या देशांमधल्या तंत्रज्ञानाच्या गतीशी साधर्म्य बाळगण्याचं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केलं. एअर मार्शल शशीकर चौधरी तसंच अन्य मान्यवर, लष्करी तसंच सनदी अधिकाऱ्यांनी त्यांचं नागपूरमधील आगमनावेळी स्वागत केलं. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८९ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि विचार २६ मे पर्यंत ‘माय जी ओ व्ही ओपन फोरम’वर किंवा ‘नमो ॲप’ वर नोंदवता येतील. तसंच १८०० ११ ७८०० या क्रमांकावर आपला संदेश ध्वनिमुद्रीत करुनही पाठवता येणार आहे. दरम्यान, पुढल्या आठवड्यातल्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी अनेक कल्पना आणि सूचना प्राप्त होत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. युवकांनी यासाठी मोठ्या संख्येनं कल्पना पाठवल्यानं आपल्याला आनंद झाला असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमांतून प्रसारित केलेल्या आपल्या संदेशात नमुद केलं आहे. पंतप्रधानांनी गेल्या महिन्यातल्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर आधारित एक पुस्तिका यावेळी सादर केली.

****

औरंगाबादच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याची ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिलं आहे. त्यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथल्या वाळूज औद्योगिक वसाहतीत मराठवाडा ऑटो क्लस्टर अंतर्गत उद्योजकांच्या कायम स्वरुपी उप्तादन प्रदर्शन केंद्राचं उद्‌घाटन झालं, त्यावेळी कराड बोलत होते. या केंद्रामुळं मराठवाडा विभागातील उत्पादन क्षमता सिद्ध होईल, असं ते म्हणाले. या माध्यमातून लघुउद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसंच भावी उद्योजक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध होईल, असा विश्वास कराड यांनी यावेळी व्यक्त केला.

****

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागास प्रवर्ग आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष आयोगानं आज औरंगाबाद विभागातल्या विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरीकांशी चर्चा केली तसंच त्यांच्या लेखी निवेदनांचा स्वीकार केला. आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात ही निवेदनं स्विकारण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं गेल्या अकरा मार्च रोजी “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी हा विशेष आयोग” स्थापन केला आहे.

****

‘राज्यघटना’ हा विषय बोलण्याचा नाही तर जगण्याचा विषय असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं मार्गदीप समुहातर्फे आयोजित “आम्ही भारताचे लोक” या पहिल्या विचार संमेलनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी नरके बोलत होते. धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख घटनेच्या कलम २५ मध्ये आहे. तसंच देशातल्या ८० टक्के हिंदू आणि २० टक्के इतर धर्मियांमध्ये धर्मनिरपेक्षता घटनेला अपेक्षित आहे, असं त्यांनी नमूद केलं. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नव्यानं समजून घ्यावं लागेल तसंच यासाठी चळवळ उभी करुन लोकांना या चळवळीशी जोडलं जावं, अशी अपेक्षा नरके यांनी व्यक्त केली. मार्गदीप समुहाच्या सदस्यांना मार्गदीप रत्न पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आलं. ‘राज्य घटनेचे लाभार्थी आणि त्यांचे सामाजिक दायित्व’ या विषयावर माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचं तर ‘राज्यघटना आणि सामाजिक लोकशाही’ या विषयावर प्रा. प्रल्हाद लुलेकर यांचं यावेळी व्याख्यान झालं. या विचार संमेलनाचा समारोप ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे करत आहेत.

****

इतर मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणाठी नेमलेल्या आयोगाचे राज्यात प्रत्येक महसूल विभागात सुरू असलेले दौरे म्हणजे केवळ दिखावा असून, दोन तासांच्या भेटींमधून आयोग नेमका कोणती माहिती गोळा करणार, अशी विचारना भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. या आयोगानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन माहीती गोळा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाविकास आघाडी सरकारनं इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाच्या बाबतीत मोठा कालावधी वाया घालवाला असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी यावेळी केला.

****

औरंगाबादच्या पाणी प्रश्नासंदर्भात उद्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शहरातल्या महापालिका कार्यालयावर ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता पैठण गेट इथं या मोर्चाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत दिली. एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा, पाण्याचा खंड वाढवण्यात आला आहे तेंव्हापासूनची पाणी पट्टी रद्द करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, शिवसेनेनं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात फलक लावले आहेत. पाणी पट्टी निम्मी केली असल्याचं नमूद करत केंद्र सरकारनं घरगुती गॅसची किंमत कमी करावी, अशी मागणीही शिवसेनेनं या फलकांद्वारे केली आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने अंतर्गत औरंगबाद परिमंडळतल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या ६३३ ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. हा वीज जोडणी कार्यक्रम १४ एप्रिल २०२१ पासून सुरू करण्यात आला असून सहा डिसेंबर २०२२ पर्यत ही योजना सुरू रहाणार असल्याचं महावितरणचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी म्हटलं आहे. यात औरंगाबाद शहर मंडळात २५७, औरंगाबाद ग्रामीण मंडळात २३७ तर जालना मंडळात १३९ ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. या योजनेत लाभार्थ्याला ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे एक रकमी अथवा पाच समान मासिक हफ्त्यांमध्ये वीज देयकाद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

****

औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून काल एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शरणसिंग सेठी असं या संशयीत आरोपीचं नाव असून त्याला नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस’ आज साजरा करण्यात आला.

****

No comments:

Post a Comment