Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 May 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मे २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
राज्यात कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही - आरोग्य मंत्री
राजेश टोपे.
·
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेलाच व्यक्ती
उमेदवार असावा अशी राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस.
·
राज्य सरकारनं पेट्रोल - डिझेलच्या मूल्यवर्धित करात केलेली
कपात फसवी असल्याचा भारतीय जनता पक्षाचा आरोप, दारूप्रमाणे पेट्रोल - डिझेलच्या करात
५० टक्के कपात करण्याची मागणी.
·
ज्ञानवापी मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालय उद्या निकाल
सुनावणार.
आणि
·
औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात भाजपचा ‘जलआक्रोश मोर्चा’.
****
राज्यात
कोविडच्या चौथ्या लाटेची सुतराम शक्यता दिसत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी
म्हटलं आहे. आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले –
आपण
बघतो आहोत खूप मोठ्या पद्धतीनं लोक गर्दी करतायत. कार्यक्रम मोठे होतायत. राजकीय मेळावे
मोठे होतायत. आणि या सगळ्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने लोक एकमेकांमध्ये गर्दी करून
असतायत. परंतू जी संख्या अपेक्षित वाढ वाटत होती तशी होत नाही. आणि त्यामुळे काळजी
करण्याचा अजिबात विषय वाटत नाही चौथ्या लाटेचा सुतराम शक्यता मला वाटत नाही.
राज्यात
सध्या सक्रीय रूग्णांची संख्या एक हजार ९५० असून, हा फार मोठा आकडा नसल्याचं टोपे म्हणाले.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बुस्टर डोस देण्यात येत असून, अँटीबॉडीज टेस्ट करुन लोकांनी
बुस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले.
शरद
पवार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक भागातल्या पक्ष संघटनेला वेळ देतोय, कार्यकर्त्यांशी
चर्चा करतोय, त्यात आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देत असल्याचं ते
म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील,
असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
मुंबईत
मंकी पॉक्स या आजाराचा अद्याप एकही रूग्ण आढळलेला नाही, तरी मुंबई महापालिका प्रशासनानं
खबरदारीचे विविध उपाय केले आहेत. विमानतळावर या आजाराची लागण झालेल्या देशांतून येणाऱ्या
प्रवाशांची तपासणी सुरू आहे. यातल्या संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा रूग्णालयात २८ खाटांचा
एक वेगळा वॉर्ड बनवण्यात आला आहे. इथल्या रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पुण्यातल्या राष्ट्रीय
विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत मंकीपॉक्स
हा आजार आढळतो.
****
विधान
परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेलाच व्यक्ती उमेदवार असावा, अशी शिफारस
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात आयोगानं
केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. अकोल्यातले विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे
माजी तज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी सातत्यानं या मागणीचा पाठपुरावा केला होता.
ही शिफारस मान्य झाल्यास शिक्षक मतदारसंघातल्या संस्थाचालक आणि राजकारण्यांच्या घुसखोरीला
चाप बसू शकणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्र
सरकारनं पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्यानं राज्याचा मूल्यवर्धित कर -व्हॅट सुद्धा
कमी होतो, त्यामुळे राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलच्या मूल्यवर्धित करात केलेली कपात
फसवी असल्याचा आरोप, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं
वार्ताहरांशी बोलत होते. २०१९ मध्ये जो व्हॅट द्यायचा त्यावरच तो फ्रीझ करुन जनतेला
दिलासा द्यावा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. जनतेला न्याय देण्याची भूमिका
या सरकारची नाही असा आरोपही मुनगंटीवार यांनी यावेळी केला.
दरम्यान,
राज्य सरकारनं दारूप्रमाणे पेट्रोल - डिझेल वरील करातही तातडीनं ५० टक्के कपात करून
जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी, प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी
केली. ते आज मुंबईत बोलत होते. पेट्रोल डिझेल वरील मूल्यवर्धित करात कपात करण्याची
केवळ घोषणा न करता त्याबाबतचा शासन आदेश जारी करावा, असं ते म्हणाले.
****
महिलांनी
शेळी पालनाचा व्यवसाय करुन आर्थिक विकास साधावा, असं आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आणि
दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्याच्या रामटेक
तालुक्यातल्या अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाच्या बोंद्री इथल्या
प्रक्षेत्रावर, गोट बँकेच्या सहकार्यानं पाचशे महिलांना शेळ्यांचं वितरण करण्यात आलं,
त्यावेळी ते बोलत होते. गोट बँकेच्या संकल्पनेतून राबवण्यात येणारा महिला शेळी वितरणाचा
राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे. या योजनेच्या यशस्वीतेनंतर ही योजना संपूर्ण राज्यात
राबवण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.
****
ज्ञानवापी
मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालय उद्या निकाल सुनावणार आहे. आज याप्रकरणी
सुनावणी पू्र्ण झाली असून, दोन्ही बाजुंचं म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल
सुरक्षित ठेवला आहे. उद्या दुपारी दोन वाजता निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या
आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयासमोर झाली.
****
हज
यात्रेला जाण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे बनवण्यात आली असून, कोविड महामारीच्या
दोन वर्षानंतर हज यात्रेकरूंवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची देखील
दक्षता घेण्यात आल्याचं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्ली इथं हज यात्रेचे
समन्वयक, अधिकारी आणि मदतनिसांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्धाटन करतांना
ते बोलत होते. यात्रेच्या प्रक्रियेला संपूर्णपणे डिजिटल बनवण्यात आल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
यावर्षी
२१ जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम म्हैसूर इथं
होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी सामूहिक योग कार्यक्रमाचं नेतृत्व करतील. आयुष
मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. हा
योग दिवस यावर्षी आझादी का अमृत महोत्सवातल्या वर्षात येत असल्यामुळे संपूर्ण देशात
७५ प्रमुख ठिकाणी तो आयोजित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या २७ तारखेला
हैदराबाद इथं योग उत्सव होणार असून, यामध्ये दहा हजाराहून अधिक नागरीक सहभागी होतील,
असं सोनोवाल यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महानगरपालिका कार्यालयावर आज ‘जलआक्रोश मोर्चा’
काढण्यात येत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा, पाण्याचा खंड वाढवण्यात आला आहे तेव्हापासूनची
पाणी पट्टी रद्द करण्यात यावी आदी मागण्या भाजपच्या वतीनं करण्यात येत आहेत.
दरम्यान,
औरंगाबाद शहराच्या गंभीर होत चाललेल्या पाणी प्रश्नांसाठी भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही
पक्ष कारणीभूत असून, आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चा काढणं आणि
पाणी पट्टी कमी करणं ही त्यांची नाटकं सुरु असल्याची टीका, खासदार इम्तियाज जलील यांनी
केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या तीस वर्षात यांनी औरंगाबादचं
नामकरण, हिंदू - मुस्लिम दंगली हेच प्रश्न उपस्थित करुन सत्ता उपभोगली. यादरम्यान जर
पाण्यासारख्या गंभीर विषयाबाबत त्यांनी तत्काळ निर्णय घेवून कामं केली असती तर आता
ही वेळ पहावयास मिळाली नसती, असं खासदार जलील म्हणाले.
****
इतर
मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षण न मिळाल्यानं ओबीसींवर झालेल्या अन्यायाविरोधात आज नंदुरबार
इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण करत महाविकास आघाडी
विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर इथंही ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण द्यावं
या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
धुळे
इथंही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ओबीसी आरक्षणाविरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात
आलं. यावेळी बोलतांना खासदार सुभाष भामरे यांनी, मध्यप्रदेश सरकारनं योग्य इम्पीरिकल
डाटा आणि ट्रिपल टेस्ट केल्यामुळे त्यांना ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात
यश आलं, मात्र महाराष्ट्र सरकार पूर्ण निष्क्रिय ठरलं असल्याची टीका केली.
****
राज्यातल्या
सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिलं महावितरण कंपनीनं
लागू केली आहेत. ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य नाही, अशा ग्राहकांनी ही रक्कम सहा
हप्त्यांत भरावी, अथवा तेही शक्य नसल्यास प्रीपेड मीटरची मागणी करावी, असं महाराष्ट्र
वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात
त्यांनी आज एक पत्रक जारी केलं. सुरक्षा ठेव रक्कम आता दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात
आली असल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर आजपासून पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी
उघडण्यात आली आहे. काही समाज कंटकांच्या धमकीनं पुरातत्व विभागांनं गेल्या पाच दिवसांपासून
ही कबर बंद केली होती. प्रशासनानं आज पोलिस बंदोबस्त कायम ठेवत सर्वांना जाण्याची भुमा
दिली आहे.
****
जेजुरी
तीर्थक्षेत्राचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यासंदर्भात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित
पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित
होते. पहिल्या टप्प्यात सुमारे ११० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
****
नांदेड
इथले ज्येष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम यांनी लिहिलेल्या ‘गांधी समजून घेताना’ या पुस्तकाला,
पुण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंतराव चव्हाण सह्याद्री साहित्य पुरस्कार
प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी इथं
हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. समाजाला गांधी विचारांची आज खरी गरज असल्याचं मत अण्णा
हजारे यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
No comments:
Post a Comment