Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 May 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मे २०२२ दुपारी १.०० वा.
****
टोकियो इथं
सुरू असलेल्या क्वाड परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी आज एका नव्या फेलोशिपची
घोषणा केली. या योजनेतून ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेतले, विज्ञान, तंत्रज्ञान,
अभियांत्रिकी आणि गणित या विषयांतले हुशार विद्यार्थी एकत्र आणण्यात येतील. या योजनेमधून
क्वाड च्या चार देशातल्या प्रत्येकी पंचवीस विद्यार्थ्यांना अमेरिकेतल्या अग्रगण्य
विद्यापीठांमधून पदव्युत्तर पदवी आणि संशोधन करण्याची संधी मिळेल. अशा प्रकारची ही
पहिलीच फेलोशिप असणार आहे. या योजनेमुळे शैक्षणिक उत्कृष्टता गाठता येईल, तसंच क्वाड
देशांतल्या नागरिकांचे एकमेकांशी बंध तयार होतील, असं सांगत, भारतीय विद्यार्थ्यांनी
या योजनेसाठी जरूर अर्ज करावेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेबद्दलच्या
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
टोकियो इथं
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांच्याशी द्विपक्षीय
चर्चा केली. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यवसायाचा सातत्यानं विस्तार होत असून, या दोन
देशांची भागीदारी विश्वसनीय असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. तंत्रज्ञान क्षेत्रात
भारत अमेरिकेचं सहकार्य वाढलं असून, गुंतवणुकीच्या दृष्टीनंही प्रगती होत असल्याचं
पंतप्रधान म्हणाले. मानवतेच्या कल्याणाच्या हेतूनं भारत अमेरिकेची ही मैत्री कायम राहील,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी पंतप्रधान मोदी यांची
प्रशंसा करत, कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी उत्कृष्ट कार्य केलं, असं म्हटलं.
****
स्वित्झर्लंडमधल्या
दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत विविध देशातल्या तेवीस कंपन्यांनी महाराष्ट्राबरोबर
सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे सुमारे सहासष्ट
हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला
आहे. काल झालेल्या या विविध गुंतवणूक करारांमधली पंचावन्न टक्क्यांहून जास्त गुंतवणूक
सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान या देशांमधून येणार आहे. संगणक क्षेत्रातली
मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट सोबतही एक करार झाला असून, पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी
ही कंपनी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
****
दिल्लीचे
नायब राज्यपाल म्हणून विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायब राज्यपाल
अनिल बैजल यांनी राजीनामा दिल्यानं सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली, ते सध्या खादी
आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष आहेत.
****
केंद्र सरकारनं
बेपत्ता कर्मचाऱ्यांसंदर्भात पेन्शन नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय
मंत्री डॉ. जितेंद्र प्रसाद यांनी ही घोषणा केली. जुन्या नियमांनुसार, बेपत्ता कर्मचा-यांना
कायदेशीरदृष्टया मृत घोषित केलं जात नाही तोपर्यंत, किंवा बेपत्ता झाल्यानंतर सात वर्षापर्यंत
कुटुंबियांना पेंशन योजनेचा लाभ मिळत नसे. मात्र आता बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या परिवाराला
लगेचच पेन्शन मिळू शकणार आहे. या मुळे जम्मू-काश्मीर किंवा ईशान्य भारतात दहशतवाद तसंच
नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.
****
ग्राहकांकडून
सक्तीनं सेवा शुल्क घेणा-या उपाहारगृहांना ग्राहक व्यवहार मंत्रालयानं चेतावणी दिली
आहे. या विभागाचे सचिव रोहित कुमार यांनी भारतीय राष्ट्रीय उपाहारगृह संघटनेच्या अध्यक्षांना
याबाबत पत्र लिहिलं आहे. काही उपाहारगृहं आणि धाबे ग्राहकांकडून सक्तीनं सेवा शुल्क
वसूल करतात, असं दिसून आलं असून, हे शुल्क देणं ग्राहकांच्या इच्छेवर असल्याचं या पत्रात
त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं येत्या दोन
जूनला भारतीय राष्ट्रीय उपहारगृह संघटनेसोबत एका बैठकीचं आयोजन केलं आहे.
****
भारतीय जनता
पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर काही आरोप केले
आहेत. जाधव यांचे भागीदार विमल अग्रवाल यांनी मुंबई पोलिसांना कमी दर्जाची बुलेटप्रूफ
जाकिटं पुरवल्यामुळेच वरिष्ठ अधिकारी हेमंत करकरे यांचा २००८ च्या मुंबईवर झालेल्या
दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याचं, सोमय्या यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात पोलिसांनी
अग्रवाल यांची चौकशीही केली होती, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई होऊ शकली नव्हती,
असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देणं म्हणजे वेळ
वाया घालवणं, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
****
आशिया चषक
हॉकी स्पर्धेत आज भारताचा दुसरा सामना जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या पहिल्या सामन्यात
भारत आणि पाकिस्तानची १-१ अशी बरोबरी झाली.
****
No comments:
Post a Comment