Thursday, 23 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.06.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 June 2022

Time - 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जून २०२ सायंकाळी ६.१०

****

·      शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा ४६ आमदार सोबत असल्याचा दावा.

·      बंडखोर आमदारांना २४ तासांत मुंबईत परतण्याचं शिवसेनेचं आवाहन.

·      न्याय हक्कासाठी एकनाथ शिंदे यांना बंडखोरीचा निर्णय घ्यायला लावण्यात आला- आमदार संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्र्यांना अनावृत पत्र.

आणि

·      प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सरकारी योजनेत सहज प्रवेश मिळणं गरजेचं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

****

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. गुवाहाटी इथल्या हॉटेलमधून या सर्वांची एकत्र छायाचित्रं आणि ध्वनिचित्रमुद्रण समाजमाध्यमांवर प्रकाशित झालं आहे. दरम्यान शिंदे यांचा हा दावा शिवसेनेनं फेटाळला आहे.

भारतीय जनता पक्षानं शिवसेनेच्या आमदारांची फसवणूक करुन त्यांना पळवून राज्याबाहेर नेल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला. विदर्भातले आमदार नितीन देशमुख, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. सुरतच्या सरकारी रुग्णालयात आपल्याला जबरदस्तीनं दाखल करुन इंजेक्शन दिल्याचं देशमुख म्हणाले. आपल्याला फसवून राज्याबाहेर नेलं होतं मात्र आपण कशीबशी सुटका करुन घेतली, असं पाटील यांनी सांगितलं. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न फसल्यामुळं भारतीय जनता पक्षानं हे कारस्थान रचलं असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी जर शिंदे गटाची असेल तर त्यांनी येत्या २४ तासात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून बोलावं. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. गुवाहाटीत बसून पत्रे पाठवू नयेत, असं आवाहनही राऊत यांनी यावेळी केलं. राऊत यांच्या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारची विधानं करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील आपल्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

****

न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे यांना हा निर्णय घ्यायला लावण्यात आला, असा दावा शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या आमदारांना शिवसेनेत परतण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला शिरसाट यांनी अनावृत पत्रानं उत्तर दिलं आहे. शिंदे यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे हे पत्र सादर केलं. गेली अडीच वर्षे ‘वर्षा’ची दारं आपल्यासाठी बंद होती. लोकप्रतिनिधींना डावलून भोवती जमलेल्या तथाकथित चाणक्यांचं ऐकलं जात होते. ते बडवे आपल्याला डावलून निवडणुकांची व्यूहरचना आखायचे, असं शिरसाट यांनी यात म्हटलं आहे. आपण कधी मंत्रालयातल्या सहाव्या माळ्यावर गेलाच नाहीत. त्यामुळं `वर्षा` निवासस्थानी येऊन भेटण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प्रवेश नसायचा. अनेक तास वाट पाहूनही बडवे भेट नाकारत होते. त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आपली सहज भेट घेत असत, अशी टीका या पत्रात आहे. स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का, हा आपला प्रश्र्न आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंची दारं आपल्यासाठी उघडी होती. मतदार संघातली वाईट परिस्थिती, मतदार संघातला निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असलेला अपमान, आपली ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदेचं ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. ठाकरे अविश्र्वास दाखवत होते, असंही शिरसाट यांनी पत्रात म्हटलं आहे.

****

राज्यात महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक आज सकाळी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर पक्षाचे वरीष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यातल्या राजकीय घडामोडींना हाताळण्यासाठी शिवसेना जे प्रयत्न करेल, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल, असं पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं पत्र एकनाथ शिंदे यांनी सादर केलं होतं. त्यावरच्या काही आमदारांच्या सह्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्या सर्वांची शहानिशा केली जाईल, असं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं.

****

बंडखोर आमदार ठेवण्यात आलेल्या गुवाहाटी इथल्या हॉटेलसमोर निदर्शनं करणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यात पूरस्थिती असताना आसाम सरकार या आमदारांची बडदास्त ठेवण्यात मग्न असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. केंद्र आणि राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं आसाममधील पूरस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचंही या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

****

राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घालावी, तसंच महाराष्ट्रात सध्या सुरू असलेलं राजकीय संकट पाहता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

****

नवीन भारताची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सरकारी योजनेत सहज प्रवेश मिळणं गरजेचं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज उद्योग आणि वाणिज्य भवनाच्या “वाणिज्य भवन” या इमारतीचं आणि निर्यात पोर्टलचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक करदात्याचा आदर करण्यासाठी सरकार विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमुळे भारत आधुनिक होत आहे. या भवनाच्या माध्यमातून देश विदेशातले लोक भारताची वाढलेली शक्ती बघतील, असं उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यावेळी म्हणाले.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी त्या आज नवी दिल्लीत दाखल झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी त्यांची भेट घेतली.

****

सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्यानं राज्यात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार आज जागतिक ऑलिम्पिक दिनी करु या, असं नमूद करत उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खेळ माणसाला शरीरानं, मनानं तंदुरुस्त ठेवतात. खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खिलाडूवृत्तीने वागण्याची शिकवण खेळांमुळे मिळते, असंही पवार यांनी आपल्या या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे अकरा रुग्ण आज आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यात या संसर्गामुळं आतापर्यंत एक लाख दोन हजार ८४२ रूग्ण बाधित झाले. या आजारातून आज एक रूग्ण बरा झाल्यानंतर त्याला सुटी देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत या संसर्गाचे एक लाख १२९ रूग्ण बरे झाले आहेत तर २६९२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या या संसर्गाच्या २१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

राज्यातल्या १४ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु झाली असून, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असं आवाहन अल्पसंख्याक विकास विभागानं केलं आहे. प्रवेशासाठी ३० जून पर्यंत ऑनलाईन नोंदणी करायची आहे. हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, सातारा, सोलापूर इथल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तसंच शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था (मुंबई) इथंही अल्पसंख्याकांसाठी विशेष तुकडी सुरु आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यात मुलींसाठी ३० टक्के, अल्पसंख्याक समुहातल्या विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत.

****

No comments:

Post a Comment