▼

Thursday, 23 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.06.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ जून २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

ड्रोन तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि अंतराळ संशोधन यांसह सर्वच क्षेत्रात नव्या संकल्पनांना पाठिंबा देण्याची भारताची भूमिका आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल ब्रिक्स देशांच्या व्यापार मंचाला आभासी माध्यमाद्वारे संबोधित करत होते. २०२५ सालापर्यंत भारताच्या डिजिटल क्षेत्राचं मूल्य एक हजार अब्ज डॉलर्सच्या वर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

सीबीआय नं एचडीएफसी बँकेचे कपिल वाधवानी आणि धीरज वाधवान यांच्याविरोधात आज नव्यानं गुन्हे दाखल केले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियासह १७ बँकांची ३४ हजार ६१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांच्या मुंबईतल्या १२ ठिकाणी तपासणी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार फाईव्ह जी इंटरनेटच्या स्पेक्ट्रम लिलावाला लवकरच प्रारंभ होत असून, त्यानंतर या वर्षाअखेरीपर्यंत देशभरातल्या ज्या निवडक शहरात फाईव्ह जी नेटवर्क सेवा उपलब्ध होईल त्यात पुण्याचा समावेश राहणार आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार फाईव्ह जी स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर पुण्यासह ११ शहरामधून सर्वप्रथम ही सेवा उपलब्ध होणार आहे. 

****

भारतीय हवाईदलात कार्यरत असलेले बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातल्या भालगाव इथले सैनिक राहुल इंगळे यांचं काल प्रशिक्षणादरम्यान निधन झालं. उद्या भालगाव इथं त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

****

आषाढी वारीसाठी विविध जिल्ह्यातून तसंच इतर राज्यातूनही लाखो भाविक पंढरपुरात येतात. पायी चालताना वारकऱ्याचा पाय खड्ड्यात पडून काही दुर्घटना होऊ नये, यासाठी शहरातले खड्डे बुजवण्याचे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

****

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत अभिनेते सुशांत शेलार यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. यावेळी बैठकीत इतिवृत्त नामंजूर करण्यात आलं आणि मेघराज राजेभोसले यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

****

No comments:

Post a Comment