Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 June 2022
Time - 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जून २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणालाही
वापरता येणार नाही-शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय.
·
आम्ही शिवसेनेतच, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेस यांच्यासोबत आघाडीस विरोध- शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून भूमिका स्पष्ट.
·
बंडखोर आमदारांचा विरोध तसंच समर्थनासाठी शिवसैनिकांची
राज्यभर निदर्शनं.
·
आणि
·
भैरवनाथ शुगर खाजगी साखर कारखान्याचा देशातला पहिला
सांडपाण्यावरचा सीएनजी निर्मिती प्रकल्प.
****
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणालाही वापरता येणार नाही, असा ठराव
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत यासह विविध सहा ठराव संमत करण्यात आले. बंडखोर
आमदारांवर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, मात्र कारवाईचे सर्वाधिकार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णयही कार्यकारिणीने आज घेतला आहे.
****
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे गटातल्या १६ आमदारांना अपात्रतेची
नोटीस दिली आहे. या निर्णयाला एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय
घेतला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे,
त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने
उपस्थित केला आहे.
****
आपला गट शिवसेनेच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही, मात्र काँग्रेस आणि
राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडीत राहण्यास आमचा विरोध असल्याचं, शिवसेनेच्या
बंडखोर गटाकडून सांगण्यात आलं आहे. या गटाच्या वतीनं आमदार दीपक केसरकर यांनी आज ऑनलाईन
पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण कोणीही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही,
आपल्या गटाचं नाव शिवसेना बाळासाहेब गट असं असेल, मात्र निवडणूक आयोगानं नकार दिला,
तर विचार करू, असं केसरकर म्हणाले. शिवसेनेत आमच्या गटाकडे बहुमत असल्याने, एकनाथ शिंदे
हेच विधीमंडळ गटनेते असतील, अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाला आमचा विरोध असून, त्या निर्णयाविरोधात
दाद मागणार असल्याचं, केसरकर यांनी सांगितलं. शिवसैनिकांना वेगळी माहिती देऊन त्यांची
दिशाभूल केली जात आहे, शिवसैनिकांनी संयम राखण्याचं आवाहनही केसरकर यांनी केलं. विधानसभा
उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव फेटाळला, तर विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याची
मागणी करू, असं केसरकर यांनी सांगितलं.
राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना, सर्वसामान्य जनतेच्या शिवसेनेकडून विकासकामांबाबत
अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र महत्त्वाची सगळी खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे
असल्याने, प्रत्येक वेळी शिवसेनेच्या आमदारांना त्या त्या मंत्र्यांकडे मागणी करावी
लागे, संबंधित मंत्री मात्र बैठकही घेत नसे, असं केसरकर यांनी सांगितलं.
खासदार श्रीकांत शिंदे यांनीही आज ठाण्यात शिवसैनिकांशी संवाद साधताना, राष्ट्रवादी
काँग्रेसकडून विकासकामांबाबत होणारी अडवणूक आणि त्यामुळे होणारी घुसमट कथन केली. एकनाथ
शिंदे यांच्या समर्थनात शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
****
राज्यात आज बंडखोर आमदारांविरोधात अनकि ठिकाणी समर्थक तसंच विरोधकांनी निदर्शनं
केली.
नाशिक इथंले शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या समर्थनात शिवसैनिकांनी आज
नाशिकमध्ये संपर्क कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. सुहास कांदे हे नांदगाव- मनमाड मतदारसंघातून
निवडून आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघाला विकासकामांसाठी निधी मिळाला नाही,
त्यामुळे आमदार कांदे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू
असं यावेळी त्यांच्या समर्थकांनी माध्यमांना सांगितलं.
****
दरम्यान, राज्यात आज अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात निदर्शनं
करत, काही ठिकाणी तोडफोडही केली. पुण्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदे यांच्या तर्फे
उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या फलकाला शिवसैनिकांनी काळं फासलं. पुण्यातच
शिवसेना नेते आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली.
मुंबईत आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेरच्या नामफलकाची शिवसैनिकांनी तोडफोड
केली. या प्रकरणी शिवसेनेचे शाखाप्रमुख दिलीप
मोरे आणि एकोणीस आंदोलकांना, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नांदेड इथल्या
निवासस्थानी शिवसैनिकांनी मोर्चा काढून कल्याणकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
आमदारांनी २४ तासात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेत परत येण्याचं आवाहन
माजी जिल्हा प्रमुख भुजंग पाटील डक यांनी केलं आहे. तर नांदेड तालुका शिवसेना पक्ष
प्रमुख जयंत कदम यांनी कल्याणकर यांना मतदार संघात फिरू दिलं जाणार नाही, असा इशारा
दिला आहे.
औरंगाबाद इथं संदिपान भुमरे यांच्या कार्यालयाबाहेरच्या फलकावर भुमरे यांच्या
छायाचित्राला काळं फासल्याची घटना आज घडली. पैठण इथं मात्र भुमरे यांच्या समर्थनात
फलक झळकावले जात आहेत.
****
राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची
मुंबईत बैठक झाली. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कार्यरत आहोत. सध्याच्या घटनात्मक
पेचावर कायद्याची लढाई सुरु असल्याचं ज्येष्ठ नेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
यांनी म्हटलं आहे, ते माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडी स्थापना करतांना जी कायदे
विषयक समिती कार्यरत होती ती या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. राज्यात राष्ट्रपती
राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नसून, महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदार, मंत्र्यांबाबत
काय करायचं याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं थोरात म्हणाले.
कोणी कुणाच्या नावानं गट तयार केला तरी, जोपर्यंत अधिकृतरित्या त्या गटाला आणि
नावाला मान्यता मिळत नाही तोवर याला काही अर्थ नाही, असं सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक
चव्हाण यांनी म्हटलं आहे. या बैठकी नंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यात कुठेही कायदा
सुव्यवस्थेचा प्रश्न नाही असंही ते एका प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले
****
बहुजन समाजवादी पार्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही
आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाध्यक्ष मायावती
यांनी सांगितलं की भाजपाला पाठिंबा देण्याचा किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात
जाण्याचा आपला हेतू नाही तथापि आदिवासी महिलेला देशाचं सर्वोच्च पद मिळावं या भूमिकेतून
हा निर्णय घेत आहोत असं मायावती म्हणाल्या बसपाचे उत्तर प्रदेशात एक आमदार असून संसदेत
१० खासदार आहेत.
****
पंतप्रधान मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी
व्यवहार मंत्रालयाच्या पंतप्रधान नागरी आवास योजनेला आज सात वर्ष पूर्ण झाली. या योजनेअंतर्गत सुमारे
एकशे तेवीस लाख घरं मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यंत एक कोटींहून अधिक घरं
उभारण्यात आली असून, ६१ लाखांहून अधिक
घरं लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या
भैरवनाथ शुगर या खाजगी साखर कारखान्यात वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून सीएनजी
गॅस निर्मिती प्रकल्प उभारला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिला सीएनजी निर्मिती प्रकल्प
आहे. हा प्रकल्प ग्रामीण शेती पूरक व्यवसाय देशाच्या प्रगतीला हातभार लावून आत्मनिर्भरतेकडे
नेणारा ठरेल, असा विश्वास या कारखान्याचे संचालक भैरवनाथ ठोंबरे यांनी व्यक्त केला
आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर...
Byte…
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
यांनी वेस्ट टू वेल मधून संपत्ती निर्मिती आणि पर्यावरण संतुलित उद्योग निर्मिती या
संकल्पनेनुसार केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरण संतुलन राखत भैरवनाथ साखर उद्योगानं
साखर उद्योगातील सांडपाण्यावर बायोगॅस निर्मितीपासून सी एन जी निर्मिती प्रकल्प सुरू
केला आहे. या कारखान्यात उत्पादित होत असलेल्या इथेनॉल निर्मितीनंतरच्या सांडपाण्यावर
प्रक्रिया करून दररोज पन्नास हजार घनमीटर बायोगॅस इथं तयार होतो. त्यातून दररोज पाच
टन बायो सी एन जी इथं निर्मिती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक असणारा हा शेतीपूरक
व्यवसाय देशाच्या प्रगतीला हातभार लावून आत्मनिर्भरतेकडे नेणारा ठरेल असा विश्वासही
ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर
उस्मानाबाद
****
हिंगोली इथं सुसज्ज असं ग्रंथालय भवन उभारण्यात येणार
आहे असं जिल्ह्याच्या पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. जिल्हा
वार्षिक नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या. हिंगोली इथं २०१० मध्ये शासकीय ग्रंथालय सुरु
करण्यात आलं असून ते सध्या भाड्याच्या जागेत आहे. या ग्रंथालयाच्या इमारतीसाठी २० गुंठे
जागा अधिगृहीत करण्यात आली असून या जागेवर सुसज्ज असं ग्रंथभवन उभारण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी आणि प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सार्वजनिक
बांधकाम विभागामार्फत ६ कोटी ७२ लाखाचा प्रस्ताव सादर केला आहे असं गायकवाड म्हणाला.
****
No comments:
Post a Comment