Sunday, 24 July 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २४ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 July 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

****

·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभपूर्वक निरोप, देश भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं वंचितांच्या उत्थानाचं स्वप्न साकार करण्याकडे वाटचाल करत असल्याची भावना

·      शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

·      न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण होण्याची आवश्यकता-  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ३३६ रुग्ण, मराठवाड्यात १६० बाधित

·      बीड जिल्ह्यात पकडलेल्या गुटख्यातून अर्धा साठा गायब करणारा पोलिस निरीक्षक डी बी कोळेकरसह तिघे जण निलंबित

·      मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी पाऊस

आणि

·      भारत - वेस्ट इंडीजमध्ये आज दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना

****

आता सविस्तर बातम्या

****

समाजाच्या तळागाळातल्या घटकाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांच्या उत्थानाचं पाहिलेलं स्वप्न साकार करण्याकडे देश वाटचाल करत असल्याचं, मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. कोविंद यांना काल संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभपूर्वक निरोप देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड काळात देशानं केलेल्या कार्याचा उल्लेख करत, सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. केंद्र सरकारसह सर्वच घटकांनी केलेल्या सहकार्याचा राष्ट्रपती कोविंद यांनी कृतज्ञतापूर्व उल्लेख केला. ते म्हणाले...

 “राष्ट्रपती  के  पद  को  आप  सबने  जिस  प्रकार  निरंतर  सम्मान  दिया  है उसकी  मैं  सराहना करता  हूँ | मुझे  प्रधानमंत्री  श्री नरेंद्र  मोदीजी  व  उनके  मंत्री  मंडल के  सदस्योंके  साथ  काम  करनेका  अवसर  मिला  है | उन  सबने  मुझे जो  विशेष  सम्मान  दिया  है  उसके  लिए  मै  उन  सबको  धन्यवाद देता  हूँ | आप  सब  हमारे  महान  संविधान  के  अनुरूप  सर्वाच्च  लोकतांत्रिक  परंम्पराओ  को  और  भी  मजबूत  बनाएंगे | मेरी  शुभकामना  है  की  आप  सब  समाज  व  राष्ट्र  को  और  अधिक  मजबूत  बनानेके  अपने  प्रयासोमें  सफलता  प्राप्त  करें  धन्यवाद, जय  हिन्द |”

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या निरोप समारंभाला उपस्थित होते. लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी कोविंद यांच्या एकूण कार्यकाळाचा आढावा घेत, त्यांच्या कार्यातून तसंच विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत, कोविंद यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती कोविंद यांना यावेळी स्मृतिचिन्ह तसंच खासदारांच्या स्वाक्षरी असलेली एक पुस्तिका भेट देण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपती कोविंद आज रविवारी संध्याकाळी सात वाजता देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरुन प्रसारित केलं जाणार आहे. नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचा शपथविधी समारंभ उद्या सोमवारी होणार आहे.

****

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती, त्या पार्श्वभूमीवर आयोगानं या दोन्ही गटाला पुरावे सादर करण्यासाठी आठ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे.

****

 

न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण होण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या विधीज्ञ संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त औरंगाबाद इथं काल विधिज्ञ परिषद घेण्यात आली. या परिषदेत 'न्याय व्यवस्थेतील तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर न्यायमूर्ती ओक बोलत होते. देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्यायालयात काय चालतं हे जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी केलेल्या भाषणात, जलद गतीने न्यायदानासाठी न्यायाधीशांची संख्या वाढण्याची आवश्यकता व्यक्त केली, सध्या दहा लाख लोकांमागे वीस न्यायाधीश असून ही संख्या वाढली पाहिजे. कॉलेजियम पद्धतीने नावं पाठवूनही वर्ष वर्षभर न्यायाधीशांच्या नियुक्ती होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ३३६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ३२ हजार २४६ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ५६ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ३११ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ६९ हजार ५९१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १४ हजार ५९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १६० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ६१, औरंगाबाद ४९, लातूर ३१, तर जालना जिल्ह्यातल्या १९ रुग्णांचा समावेश आहे. 

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं, कोविड प्रतिबंधक खबरदारीची लस मात्रा ७५ दिवस मोफत देण्याची मोहिम १५ जुलैपासून सुरु केली आहे. ही मात्रा सर्वांनी घ्यावी यासाठी, सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यातले लाभार्थी देविदास कापसे यांनी याबाबत आपला अनुभव या शब्दांत कथन केला...

“मी  कोरोनाच्या पहला  डोस एप्रिल  मध्ये  आणि दुसरा मे मध्ये घेतलेला आहे  त्यानंतर मी  तिसरा  डोस हि  घेतला  तिन्ही  डोस माझे  पूर्ण  झालेले  आहे त्यामुळे  मी  कोविड  पासून  पूर्ण  सुरक्षित  आहे आपणही  सुरक्षित राहण्यासाठी     कोटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी  बुस्टर  डोस घ्यावा”

उस्मानाबाद जिल्ह्यातले समाधान गौरकर यांनी स्वत: बूस्टर डोस घेतल्यानंतर सर्व पात्र नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...

“पंत प्रधान मा . नरेंद्र  मोदी सरांनी   जे  कोरोना  मुक्त  करण्यासाठी जे  स्वतंत्राचे  अम्रुत  महोत्सव निमित्त ५७ दिवसाचा  कोरोना  बोस्टर  डोसच्या  कार्यक्रम  ठेवलेले  आहे त्याचा  मध्ये  मी  डोस  घेतलेला  आहे  आपला  स्वतःचा  असेल  कुटुंबाचा  असेल समाजाच्या  असेल त्याचबरोबर देशाच्या  आरोग्य  विवस्थित  ठेवण्यासाठी  हा  डोस घेऊन  प्रशासन ला  सहकार  करावे  हि  नम्र  विनंती”

 

****

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची काल पनवेल इथं बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या सरकारने तीस दिवस पूर्ण होण्याआधीच इंधन दर कपात, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन, औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांचं संभाजीनगर तसंच धाराशीव असं नामांतर, आदी निर्णयाबद्दल सरकारचं अभिनंदन या बैठकीत करण्यात आलं.

****

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पुन्हा जनतेचा कौल घेण्यासाठी सामोरं जावं, असं आवाहन शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात झालेल्या मेळाव्यात बोलतांना केलं. गंगापूर इथंही त्यांनी काल शिवसैनिकांना संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी अहमनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केलं. नेवासा मतदारसंघात भर पावसात त्यांची सभा झाली. यावेळी केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी, बंडखोर आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याचं खुलं आव्हान दिलं. त्याचवेळी मातोश्रीची दारं उघडी असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.

****

 

स्थानिक उत्पादकांना रेल्वे स्थानकावर आपली उत्पादने विक्री करता यावीत यासाठी केंद्र सरकारने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात एक स्टेशन एक उत्पादनउपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीनं हिंगोली रेल्वे स्थानकावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर

हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या  खाद्यपदार्थां सोबतच हस्तकला, खेळण्याच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, विणकाम, लाकडी खेळणी, जात्यावर बनवलेली घरगुती हळद, मिरची पावडर, मसाले, शेवया, तीळ लाडू सारखे पदार्थ आता रेल्वे स्थानकावर विक्री करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

रमेश कदम, पिटीसी, हिंगोली.

****

 

बीड जिल्ह्यात पाटोदा इथं,  गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर, त्यातला अर्धा साठा काढून घेणाऱ्या पोलिस निरीक्षक डी बी कोळेकर याच्यासह संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके या दोन कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी निलंबीत केलं आहे. काल पाटोदा इथं टाकलेल्या धाडीत पोलीसांनी एकूण ५० पोते गुटखा पकडला,  मात्र पोलिसांनी प्रत्यक्षात केवळ २७ पोते आढळून आल्याची नोंद करत १६ लाख रुपये किमतीचा २३ पोती गुटखा गायब केला. याबाबत खात्री झाल्यानंतर पोलीस अधीक्षक ठाक़ूर यांनी या तिघांवर निलंबनाची कारवाई केली

****

 

 

मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पाऊस झाला. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागरातला पाणीसाठा सुमारे ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या १५ हजार १२१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.

परभणी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात काल दिवसभर पाऊस सुरु होता. परभणी शहर परिसरात काल रात्री सुमारे दीड तास पाऊस झाला. जालना शहर परिसरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुरु झालेला रिमझिम पाऊस रात्रीपर्यंत सुरु होता. जालना जिल्ह्यात सलग गेल्या ११ दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे. बीड जिल्ह्यातही काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. ३ दिवसांच्या विश्रांतीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात काल पुन्हा पावसाला सुरुवात झाली. उमरग्यात काल जोरदार पाऊस झाला तर इतर तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात २ दिवसांनंतर काल पाऊस झाला. या उघडीपीनंतर आंतरमशागतीच्या कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना काम थांबवावं लागलं. जिल्ह्यातल्या बळेगाव बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र गेले २४ तास,  पावसाची संततधार सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून रहात असल्यानं पिकांची वाढ खुंटली आहे. लातूर जिल्ह्यात ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल, दिवसभर पाऊस झाला.

राज्यात पुढच्या दोन दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज त्रिनिदाद इथल्या क्वीन्स पार्क मैदानावर होणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.

****

अमेरिकेत ओरेगॉन इथं सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा, आज सकाळी, पुरुषांच्या अंतिम फेरीत भाला फेकणार आहे. नीरजने परवा ८८ पूर्णांक तीन नऊ मीटर अंतरावर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, काल महिलांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत भारताची अन्नु राणी सातव्या स्थानावर राहिली. तिनं फेकलेला भाला ६१ मीटर १२ सेंटीमीटर अंतर गाठू शकला. ऑस्ट्रेलियाच्या केल्सी बार्बरनं ६६ मीटर ९१ सेंटीमीटर अंतरावर भाला फेकून सुवर्ण पदक पटकावलं.

****

बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदांमधल्या इतर मागासवर्गीय- ओबीसींच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. बीड नगर पालिकेत १४ जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून अंबाजोगाई नगर परिषदेत ७, गेवराई ५, धारूर  , माजलगाव ६, तर परळी नगरपरिषदेत ८ जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment