Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 July
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१५ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.
****
·
सरपंच तसंच नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेमधून
केली जाणार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा
अधिकार बहाल
·
राज्यात पेट्रोल प्रतिलिटर पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त, केंद्र सरकारची अमृत योजना राज्यातल्या सर्व शहरांना लागू
·
९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीच्या
निवडणुकां स्थगित करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
·
राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार २२९ रुग्ण, मराठवाड्यात ८८ बाधित
·
मराठवाड्यात काल पावसाचा जोर कमी
·
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी भारतीय कृषी
संशोधन संस्थेचे सहसंचालक डॉक्टर इंद्र मणी यांची नियुक्ती
आणि
·
दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा भारतावर शंभर धावांनी विजय
****
राज्यात सरपंच तसंच नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेमधून केली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळाच्या
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती दिली. देशातल्या मोठ्या
राज्यांमध्ये या पद्धतीनं निवड होते. आपल्या राज्यातही या पुढे अशी निवड
केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्येही शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल
करण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले..
‘‘नगरपरिषद, नगरपंचायतींच्या
ज्या नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 2018 ला तो निर्णय घेतला होता नंतर
तो बदलला होता. तर त्या देखिल थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्रांमपंचायतीचे
देखिल संरपंच आहेत थेट त्यांची निवडणूक होईल. आणि बाजार समितीमध्ये देखिल शेतकऱ्यांना
थेट मतदानाचा जो अधिकार आहे तो देखिल पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्ये
तो 2020 ला आपण रद्द केला होता.’’
राज्यामध्ये पेट्रोलचे दर पाच रुपये
आणि डिझेलचे तीन रुपये प्रती लिटरनं कमी करण्याचा निर्णयही
काल घेण्यात आला. काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले. या निर्णयामुळे शासनाच्या
तिजोरीवर सहा हजार कोटी रुपयांचा भार पडेल, मात्र जनतेला त्याची झळ बसू दिली जाणार नाही. जनतेला महागाई कमी होण्याचा दिलासा
मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारनं कर कपात
केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ही कर कपात करण्यात
आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारची अमृत योजना आता
राज्यातल्या सर्व शहरी भागांमध्ये लागू करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत घेण्यात आला. आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांसाठी सन्मान योजना
देण्यासंदर्भातला गेल्या सरकारनं स्थगित केलेला निर्णय आता लागू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. असे
सुमारे तीन हजार सहाशे संग्राम सेनानी असून, आणखी आठशे प्रस्ताव आहेत.
त्यांची पडताळणी करून त्यांच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात २०१८-१९ च्या अतिवृष्टीमुळं
शेतकऱ्यांना शासनाच्या वतीनं नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ५०
हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वगळण्यात आलं होतं. मात्र नियमित कर्जफेड
करणाऱ्या या शेतकऱ्यांना देखील हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पुढील
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवानिमित्त राज्यात अठरा ते ५९ वर्षे वयोगटातल्या नागरीकांसाठी कोविडची वर्धक मात्रा पुढचे पंच्च्याहत्तर दिवस निःशुल्क दिली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती
दिली. या मोहिमेतला एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना वर्धक मात्रा
मिळालीच पाहिजे, यासाठी राज्यातल्या सर्व
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना सहभागी करून घ्यावं, पुरेशी जनजागृती करावी, असे निर्देश
आरोग्य विभागाला देण्यात आले असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत
अभियान टप्पा दोन नुसार राज्यात देखील स्वच्छ राज्य टप्पा दोन मोठ्या प्रमाणावर
राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
राज्यात महाविकास
आघाडी सरकार असताना पेट्रोल आणि डिझेलवरच्या करात ५० टक्के
कपातीची मागणी विरोधी पक्ष करत होता, मात्र आता सत्तेत आल्यावर
केवळ पेट्रोलवर पाच रुपये तर डिझेलवर तीन रुपये प्रतिलिटर कपात करुन पळवाट शोधल्याचा
आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. ते काल
पुण्यात बोलत होते. ५० टक्के कपात केली असती तर पेट्रोल १७ रुपयांनी
तर डिझेल ११ रुपयांनी स्वस्त झालं असतं, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं कर कपात केली
असली तरी केंद्र सरकार सतत दर वाढ करत राहतं, त्यामुळे कर कपातीचा फायदा ग्राहकांना
मिळत नसल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ९२ नगरपरिषदा
आणि चार नगरपंचायतीच्या
निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. इतर मागास वर्ग आरक्षणाची १९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
आहे. या सुनावणीनंतरच पुढला निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित
झाल्यामुळे लागू करण्यात आलेली आचारसंहिताही संपुष्टात आली आहे. राज्यातल्या सर्वच नेत्यांनी इतर मागास वर्ग आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ
नयेत, अशी भूमिका घेतली होती.
****
राष्ट्रीय
लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी काल मुंबईत
येऊन पाठिंब्यासाठी संबंधितांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर
त्यांचं आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. भाजपा, तसंच एकनाथ
शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची मुर्मू यांनी एकत्रित भेट घेतली. केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, रामदास
आठवले, नारायण राणे आणि पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित
होते. मुर्मू यांना राज्यातून आघाडीच्या मतांपेक्षाही अधिक मतं मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या
आमदार खासदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपण आभारी आहोत, असं
मुर्मू यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, शिवसेना
खासदार राजेंद्र गावित यांनी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.
****
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय
पांडे यांच्यावर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय शेअर
बाजारातल्या घोटाळ्यासंबंधी सीबीआयनं केलेला तपास आणि गुन्ह्याच्या आधारे ही कारवाई
करण्यात आली.
****
नॅशनल स्टॉक एक्सचेंज - एनएसईच्या
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृषणन यांना बेकायदेशील फोन टॅपिंग आणि कर्मचाऱ्यांच्या हेरगिरीप्रकरणी काल अटक करण्यात
आली. दिल्ली न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं ही कारवाई
केली.
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार २२९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या, ८० लाख १२ हजार ४५२ झाली आहे. काल या संसर्गानं ४ जणांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
एक लाख ४८ हजार पाच एवढी झाली असून, मृत्यूदर
एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ५९४ रुग्ण बरे झाले. राज्यात
आतापर्यंत, ७८ लाख ४७ हजार ८९४ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९५ शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या १६ हजार ५५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ८८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद ४८, उस्मानाबाद २६ तर लातूर
जिल्ह्यात १४ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
मराठवाड्यात काल पावसाचा जोर कमी झाला. मात्र विदर्भात कालही अनेक भागात
जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूर ओसरला असून, धरणांमध्ये पाण्याची आवक
सुरु आहे.
औरंगाबाद
इथल्या पैठणच्या नाथसागर धरणात ६२ हजार दोनशे २२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
दाखल होत आहे. धरण साडे ५६ टक्के भरलं आहे.
बीड जिल्ह्यात
काल सरासरी ३१ पूर्णांक ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात
आतापर्यंत दिडशे मिलिमीटर पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात
वार्षिक सरासरीच्या ४६ पूर्णांक आठ दशांश टक्के पावसाची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात
तेलंगणाच्या सिमेवरचं शेवटचं गाव अप्पाराव पेठ इथं लोकसहभागातून दूर्घटना टाळण्यात
आली. इथल्या निझामकालीन पाझर तलावातून गळती सुरू असल्याचं गावकऱ्यांच्या
लक्षात आल्यानंतर प्रशासनाला हे कळवण्यात आलं. प्रशासन आणि गावकऱ्यांनी
ही गळती तात्पुरत्या स्वरुपात थांबवली.
****
परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिल्लीच्या भारतीय
कृषी संशोधन संस्थेचे संशोधन सहसंचालक, डॉक्टर इंद्र
मणी यांची नियुक्ती झाली आहे. विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी ही
नियुक्ती जाहीर केली आहे. कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचा कार्यकाळ गेल्या सहा मे रोजी
संपल्यामुळे विद्यापीठाचं कुलगुरुपद रिक्त झालं होतं. डॉ.
इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेतून कृषी अभियांत्रिकी
या विषयात एम.एससी. आणि पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना
अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य आणि
कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे.
****
लॉर्ड्स इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं
भारताचा शंभर धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघानं २४६ धावा केल्या.
२४७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीपासून खास कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा आणि ॠषभ पंत शून्यावर बाद झाले. शिखर धवननं नऊ, विराट कोहलीनं १६ धावा केल्या. ३९व्या षटकातच भारतीय
संघ १४६ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत
आहेत.
****
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून
मराठवाड्यातले जुने आणि रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावले, याचं समाधान वाटत असल्याचं,
माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं काल कुसुमताई चव्हाण
स्मृती पुरस्कारांचं वितरण आणि माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त
आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामन्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी
अडीच वर्ष प्रयत्न केले, आता विरोधी पक्षात असलो तरी संघर्ष सुरुच राहील, असं पाटील
म्हणाले. मराठवाड्यातल्या पाण्याचा अनुशेष आम्ही गेल्या अडीच वर्षात भरुन काढण्याचा
प्रयत्न केला, यात आणखी काम करण्याची गरज असल्याचं माजी मंत्री अशोक चव्हाण यावेळी
म्हणाले.
****
केंद्र
सरकारनं अनब्रँडेड जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के
वस्तू आणि सेवा कर लावल्याच्या निर्णयाविरोधात, येत्या १६
तारखेला देशभरातल्या धान्य व्यापाऱ्यांनी एकदिवसीय भारत
बंदचा निर्णय घेतला आहे. चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेड
आणि ग्रोमा, या धान्य, तांदूळ आणि
तेलबिया व्यापाऱ्यांच्या संघटनेनं हा निर्णय घेतला आहे.
ग्रोमा संघटनेचे अध्यक्ष शरद मारू यांनी काल नवी मुंबईत ही माहिती दिली. सरकारच्या
या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांवर ९ ते १० रूपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचं
संघटनेनं म्हटलं आहे. या बंदमध्ये देशभरातील ७ हजार ३०० कृषी उत्पन्न बाजार समित्या,
१३ हजार दालमिल, ९ हजार ६०० राइस मिल, ८ हजार चक्की आटा व्यापारी सहभागी होणार आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. काल ४७
उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, या निवडणुकीसाठी आतापर्यंत
६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
****
पूर्व उच्च प्राथमिक -पाचवी आणि
पूर्व माध्यमिक - आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलै ऐवजी
आता ३१ जुलैला घेण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं काल जाहीर केलं.
****
No comments:
Post a Comment