Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२
जुलै २०२२ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या
पावसाळी अधिवेशनात आज पाचव्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज
बाधित झालं.
लोकसभेत
कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, तृणमूल काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र
समिती या पक्षाच्या सदस्यांनी, अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन, महागाई आणि जीएसटी दरवाढ
मुद्यावरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा
तास सुरु करुन, सदस्यांना जागेवर बसण्याची विनंती केली. विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज
होऊ देत नसल्याचं, संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी म्हणाले. महागाईच्या मुद्यावर
सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोविड
संसर्गातून बर्या झाल्यानंतर सभागृहात आल्यानंतर या मुद्यावर चर्चा होईल, असं ते म्हणाले.
मात्र विरोधकांची घोषणाबाजी सुरुच राहील्यानं, कामकाज आधी एक तासासाठी आणि नंतर दुपारी
दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेतही
हीच परिस्थिती पहायला मिळाली. कामकाज सुरु होताच विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात
केली. महागाई आणि जीएसटी दरवाढ मुद्यावरुन विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती
एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांचा गदारोळ आणखी वाढला, आणि
सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित झालं होतं.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षा मंडळ - सी बी एस ई चा बारावी निकाल आज जाहीर करण्यात आला. देशात १६
विभागात घेण्यात आलेल्या या परिक्षेचा निकाल ९२ पूर्णांक ७१ टक्के लागला असल्याचं,
सीबीएसई मंडळानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. महाराष्ट्र राज्याचा निकाल ९० पूर्णांक
४८ टक्के लागला आहे.
केंद्रीय विद्यालयाचे ९७ पूर्णांक चार शतांश टक्के,
तर नवोदय विद्यालयाचे ९८ पूर्णांक ९३ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
****
हर घर तिरंगा
अभियान यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १३ ते १५
ऑगस्ट या काळात आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवा, यामुळे राष्ट्रीय ध्वजासोबत असलेलं
आपलं नातं अधिक दृढ होईल, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. आजच्याच दिवशी १९४७
मध्ये आपला राष्ट्रध्वज स्वीकारला गेला होता, त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्व
असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
देशात कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३७ लाख
सहा हजार ९९७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ३० लाख
९७ हजार ८१९ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या २१ हजार ८८० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ६० रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २१ हजार २१९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ४९
हजार ४८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
निर्यातयोग्य
खाद्यतेलाचं उत्पादन वाढीसाठी पाम, सोयाबीन, सूर्यफुल आणि मोहरीची लागवड वाढवायला हवी
अशी शिफारस संसदीय समितीनं केली आहे. देशाला पाम तेलाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी
केंद्र सरकारनं राज्य सरकारांना सहकार्य कराव अशी शिफारसही व्यापार विषयक समितीनं केली
आहे. व्ही विजयसाई रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं काल आपला अहवाल संसदेत
सादर केला. खाद्यतेलाच्या बाबतीत आयातीवर अधिक अवलंबून राहिल्यामुळे खाद्यतेलांच्या
किंमती वाढतात असंही या अहवालात म्हटलं आहे.
****
राज्य सरकारन
मेट्रो तीन प्रकल्पासाठी मुंबईतल्या आरे परिसरात बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडच्या
बांधकामावरील स्थगिती आदेश उठवला आहे. मेट्रोच्या या मार्गिकेचा रोज प्रवास करणाऱ्या
१७ लाख प्रवाशांना फायदा होणार असून, प्रदूषण कमी होण्यासही मदत मिळेल असं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आरे इथं कारशेड बांधण्याचा
निर्णय पर्यावरणाचा सर्वसमावेशक अभ्यास करूनच घेण्यात आला होता, ज्याला हरित लवादाने
आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्यता दिली होती असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितलं.
****
भारताचा
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि रोहीत यादव यांनी अमेरिकेतल्या
ओरेगॉन इथं होत असलेल्या जागतिक ऍथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक
स्पर्धेच्या 'अ' गटातल्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजने ८८ पूर्णांक तीन नऊ
मीटर आणि रोहीतनं ८२ पूर्णांक चार दोन मीटर अंतरावर भाला फेकला. या स्पर्धेत भारताच्या
एल्धोज पॉल यानं पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
****
भारत आणि
वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज त्रिनिदाद
इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment