▼

Friday, 22 July 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.07.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  22 July  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जुलै २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार.

·      भारतीय नावीन्य निर्देशांकात ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर.

·      युआयडीएआय कडून देशभरातील सुमारे सहा लाख बनावट आधार कार्ड रद्द.

आणि

·      औरंगाबाद इथं उद्या राज्यस्तरीय विधीज्ञ परिषदेचं आयोजन.

****

६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला, तर गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आज नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अभिनेता अजय देवगण आणि तमिळ अभिनेता सूर्या यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना मी वसंतराव या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर झाला तर सायना चित्रपटातल्या गीतांसाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे. सिद्धार्थ मेनन अभिनीत ‘जून’, किशोर कदम अभिनीत ‘अवांछित’, ‘गोदाकाठ’ हे चित्रपट विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म म्हणून गौरवण्यात आले आहेत. ‘टकटक’ या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी अनिश गोसावी, तर ‘सुमी’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकर पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘फनरल’ हा मराठी चित्रपट सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. चित्रपटस्नेही राज्याचा पुरस्कार मध्यप्रदेश राज्याला जाहीर झाला आहे.

****

नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय नावीन्य निर्देशांक २०२१ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६ पूर्णांक ६ शतांश गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचं अहवालात म्हटलं आहे. आज दिल्लीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते ‘भारतीय नावीन्य निर्देशांक २०२१’ हा अहवाल प्रसिद्ध झाला. ‘मुख्य शहरांच्या’ श्रेणीत कर्नाटकाचा प्रथम क्रमांक असून यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. ‘ईशान्य आणि डोंगरी प्रदेशातील राज्ये’ या श्रेणीत मणिपूर सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. तर ‘केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्ये’ या श्रेणीत चंडीगढ अग्रस्थानी आहे. महाराष्ट्र हे एक महत्त्वपूर्ण राज्य असून काही स्तंभात राज्यानं चांगलं प्रदर्शन केलं आहे, तर काही स्तंभात सुधारणेची आवश्यकता असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

****

विकसित आणि उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय रुपयाची स्थिती मजबुत असल्याचं भारतीय रिझर्व बैंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बँक आँफ बडोदाच्या वार्षिक संमेलनात बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत असून महागाई दर स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाचं सरासरी विदेशी कर्ज कमी होत असून परकीय चलनाचा पुरेसा साठा असल्याची माहितीही दास यांनी दिली.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३७ लाख सहा हजार ९९७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ३० लाख ९७ हजार ८१९ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ सीबीएसईचे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. देशात १६ विभागात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल ९२ पूर्णांक ७१ टक्के लागला असल्याचं सीबीएसई मंडळानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

देशभरात सर्वोच्च न्यायालयाची विभागीय पीठं स्थापन करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या विचाराधीन असून, या संदर्भात निर्णय प्रतिक्षित असल्याचं, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं आहे. आज लोकसभेत प्रश्नकाळात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

****

युनिक आयडेन्टीफिकेशन एथॉरिटी ऑफ इंडिया - युआयडीएआय ने देशभरातील पाच लाख ९८ हजार ९९९ बनावट आधार कार्ड रद्द केले आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

गेल्या जानेवारी महिन्यापासून बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या ११ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मोबाईल क्रमांक, पत्ता किंवा फोटो आदी तपशील अपडेट करण्यासाठी युआयडीएआय च्या अधिकृत संकेतस्थळ तसंच अधिकृत आधार केंद्रांना भेट द्यावी, असं आवाहन राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे.

****

हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, यामुळे राष्ट्रीय ध्वजासोबत असलेलं आपलं नातं अधिक दृढ होईल, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. आजच्याच दिवशी १९४७ मध्ये आपला राष्ट्रध्वज स्वीकारला गेला होता, त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

****

औरंगाबाद इथं उद्या राज्यस्तरीय विधीज्ञ परिषद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती अभय ओक या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. शहरातल्या एमजीएम अभिमत विद्यापीठातल्या रुक्खिणी सभागृहात सकाळी दहा वाजता या परिषदेला प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत.

****

दरम्यान, राज्याच्या महाअधिवक्तापदी मराठवाडातल्या विधिज्ञांना संधी देण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचच्या वतीनं करण्यात आली आहे. विकास मंचचे निमंत्रक राजेंद्र दाते पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही मागणी केली. समन्यायिक प्रतिनिधित्वाच्या अनुषंगाने यासंदर्भात लक्ष घालणं अत्यंत आवश्यक असल्याचं राजेंद्र दाते यावेळी म्हणाले. उद्या होत असलेल्या राज्यस्तरीय विधीज्ञ परिषदेत याबाबत चर्चा व्हावी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

****

सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावापासून ७ किलोमीटर अंतरावर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातही काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नाशिक इथल्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट - मेरीच्या भूकंप मापन यंत्रात या धक्क्यांची नोंद झाली. या भूकंपावेळी जमिनीत मोठा आवाज झाल्याचं नागरिकांना जाणवलं. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात रहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त नंदुरबार पोलीस दलाकडून २५ हजार झाडं लावली जाणार आहेत. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते झाड लावून करण्यात आला. पोलीस मुख्यालयाच्या आवारात विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते एक एक झाड लावण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक साहित्याचं एक दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागरिकांसाठी खुल्या असलेल्या या प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment