Saturday, 23 July 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.07.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  23 July  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जुलै २०२   सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभपूर्वक निरोप.

·      केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश.

·      न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण होण्याची आवश्यकता न्यायमूर्ती अभय ओक यांच्याकडून व्यक्त.

आणि

·      ‘एक स्टेशन एक उत्पादन’ अंतर्गत हिंगोली रेल्वे स्थानकावर विक्री केंद्राला प्रारंभ.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात निरोप देण्यात आला. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या निरोप समारंभाला उपस्थित होते. लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी कोविंद यांच्या एकूण कार्यकाळाचा आढावा घेत, त्यांच्या कार्यातून तसंच विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत, कोविंद यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्मृतिचिन्ह तसंच खासदारांच्या स्वाक्षरी असलेली एक पुस्तिका यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना भेट देण्यात आली.

या वेळी बोलताना राष्ट्रपती कोविंद यांनी, कोविड काळात देशानं केलेल्या कार्याचा उल्लेख करत, सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल समाधान व्यक्त केलं. केंद्र सरकारसह सर्वच घटकांनी केलेल्या सहकार्याचा राष्ट्रपती कोविंद यांनी कृतज्ञतापूर्व उल्लेख केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या रविवारी संध्याकाळी सात वाजता देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरुन प्रसारित केलं जाणार आहे. नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचा शपथविधी समारंभ येत्या सोमवारी होणार आहे.

****

महान देशभक्त लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना अभिवादन केलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही आज लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या गिरगाव चौपाटी इथल्या टिळकांच्या स्मृती स्थळावर, त्यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपालांनी टिळकांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. तसंच स्मृतीस्थळ परिसरात वृक्षारोपण केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं आद्य स्मरण हे आपलं कर्तव्य आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी टिळक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकमान्य टिळक यांच्या जयंतिनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे.

****

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरूद्ध केलेल्या आंदोलनादरम्यान रेल्वेच्या २५९ कोटी रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. आंदोलनावेळी रेल्वेच्या सेवांमध्ये बाधा आल्यामुळं गेल्या जून महिन्यात रद्द झालेल्या प्रवासी रेल्वेगाड्यांच्या तिकिटांचे एकशे तीन कोटी रूपये परत केले असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची आज पनवेल इथं बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या सरकारनं तीस दिवस पूर्ण होण्याआधीच इंधन दर कपात, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन, औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांचं संभाजीनगर तसंच धाराशीव असं नामांतर, आदी निर्णयाबद्दल सरकारचं अभिनंदन या बैठकीत करण्यात आलं.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३४ लाख ९३ हजार २०९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ६८ लाख १४ हजार ७७१ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती, त्या पार्शवभूमीवर आयोगानं या दोन्ही गटाला पुरावे सादर करण्यासाठी आठ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे.

****

न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण होण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या विधीज्ञ संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त औरंगाबाद इथं आज विधिज्ञ परिषद घेण्यात आली. या परिषदेत ‘न्याय व्यवस्थेतील तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर न्यायमूर्ती ओक बोलत होते. देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्यायालयात काय चालतं हे कळण्याचा अधिकार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी केलेल्या भाषणात, जलद गतीने न्यायदानासाठी न्यायाधीशांची संख्या वाढण्याची आवश्यकता व्यक्त केली, सध्या दहा लाख लोकांमागे वीस न्यायाधीश असून ही संख्या वाढली पाहिजे. कॉलेजियम पद्धतीने नावं पाठवूनही वर्ष वर्षभर न्यायाधीशांच्या नियुक्ती होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

स्थानिक उत्पादकांना रेल्वे स्थानकावर आपली उत्पादने विक्री करता यावीत यासाठी केंद्र सरकारने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ‘एक स्टेशन एक उत्पादन’उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीनं हिंगोली रेल्वे स्थानकावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –

हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या  खाद्यपदार्थां सोबतच हस्तकला, खेळण्याच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, विणकाम, लाकडी खेळणी, जात्यावर बनवलेली घरगुती हळद, मिरची पावडर, मसाले, शेवया, तीळ लाडू सारखे पदार्थ आता रेल्वे स्थानकावर विक्री करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

रमेश कदम, पिटीसी, हिंगोली.

****

No comments:

Post a Comment