Tuesday, 26 July 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.07.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

करगील विजय दिवस आज साजरा होत आहे. १९९९ मध्ये ६० दिवसांपेक्षा अधिक चाललेल्या करगील युद्धात भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयाचं स्मरण म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा जवानांचं स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. हा दिवस आपल्या सैन्य दलांनी दाखवलेल्या अतुलनीय साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे, देशातले नागरिक सशस्त्र दलांचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सदैव ऋणी राहतील, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरीकुमार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्मा जवानांना अभिवादन केलं.

****

नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आज पुन्हा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहे. यापूर्वी गांधी यांची अडीच तास चौकशी झाली होती.

****

फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलावाला आजपासून सुरुवात होणार आहे. चार कंपन्या या लिलावात सहभागी होणार आहेत. यात सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना फाईव्ह जी सेवा पुरवण्यासाठी हा स्पेक्ट्रम दिला जाईल. २० वर्षांच्या मुदतीसाठी ७२ हजार मेगा हर्ट्झ क्षमतेचा स्पेक्ट्रम लीलावासाठी ठेवण्यात आला आहे. विविध कमी, मध्यम आणि उच्च फ्रीक्वेन्सीच्या स्पेक्ट्रमसाठी हा लीलाव होईल.

****

ताजं दूध आणि पाश्चराइझ्ड दूध वस्तू आणि सेवा करमुक्त असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत सांगितलं. किंमतीच्या उल्लेखासह वेष्टनामधलं दही, लस्सी, ताक आणि पनीर या पदार्थांवर पाच टक्के इतका माफक जीएसटी लागू राहील, तर कंडेन्स्ड मिल्क, लोणी आणि चीझ या पदार्थांसाठी १२ टक्के जीएसटी आकारला जाईल, असं सीतारामन यांनी सांगितलं.

****

भंडारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य असलेल्या सुगंधी चिन्नोर तांदळाला 'भौगोलिक नामांकन' म्हणजेच 'जी आय टॅगिंग' मिळालं आहे. त्यामुळे आता जगभर हा तांदूळ भंडारा चिन्नोर याच नावाने ओळखला जाणार आहे.

****

 

No comments:

Post a Comment