Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 14 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ८२ पोलिस कर्मचाऱ्यांना
पोलिस पदक जाहीर झाले आहेत. यातील ३४७ जणांना शौर्य पुरस्कारांनं गौरवण्यात येणार आहे.
८७ जणांन विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीचं
पोलिस पदक आणि ६४८ जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं
पोलिस पदक प्रदान करण्यात येईल.
यामध्ये महाराष्ट्रातील ४२ पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं
पोलिस पदक, तीन जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीचं
पोलिस पदक आणि ३९ जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं
पोलिस पदक जाहीर झालं आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलातील १०९ आणि जम्मू कश्मीर पोलिस दलातील १०८ कर्मचाऱ्यांना
शौर्यासाठीचं पोलिस पदक घोषित झाले आहे. सात जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं
राष्ट्रपतींच सुधार सेवा पदक आणि ३८ जणांना
उत्कृष्ट सेवेसाठीचं सुधार सेवा पदक प्रदान करण्यात
येईल.
****
बीडचे
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी
आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. आज
पहाटेच्या सुमारास मुंबईकडे जात असताना मुंबई- पुणे द्रुतगती
मार्गावर पनवेल ते खालापूर दरम्यानच्या भातन बोगद्याजवळ हा अपघात घडला. मेटे
यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीनं मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात
दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या
वाहन चालक आणि सुरक्षा रक्षकाची प्रकृती गंभीर आहे. विनायक मेटे
यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी साडेतीन वाजता बीडमध्ये
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ट्रकने हुलकावणी दिल्यावरुन
हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचं
सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या
विकासातील योगदान मोठं आहे अशा शब्दात
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मेटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विनायक मेटे यांचं अपघाती निधन अत्यंत वेदना देणारं असून त्यांच्या
निधनानं मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचं नेतृत्व हरपलं
अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल
श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही मेटे यांच्या
निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
प्रख्यात शेअर बाजार गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी
मुंबईत, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झालं. ते ६२
वर्षांचे होते. हवाई वाहतुक कंपनी आकाशा एअरलाईन्सचे ते मालक आहेत. काही दिवसांपूर्वीच या कंपनीनं मुंबई -अहमदाबाद अशी उड्डाण सेवा सुरु करत
आपल्या व्यावसायिक कार्याचा प्रारंभ केला आहे. भारताचे वॉरेन
बुफेट अशी ओळख असलेले झुनझुनवाला यांची संपत्ती ५ अरब ८० कोटी रुपये आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ५ हजार रुपये गुंतवून त्यांनी शेअर बाजाराच्या
व्यवसायाला सुरुवात केली होती.
****
बीड जिल्ह्यात मांजरसुभा रस्त्यावरील बामदळे वस्ती जवळ चारचाकी आणि टेम्पोचा
अपघात होऊन यात सहा जण ठार झाले आहेत. पुणे इथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी केज
तालुक्यातील जीवाची वाडी इथलं कुटे कुटुंब जात असताना बामदळे वस्तीजवळ आज सकाळी सात
वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. चारचाकीमधल्या दोन लहान मुलांसह इतर चार जणांचा
जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले असून, बीडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
****
जिभेचे चोचले पुरवणाऱ्या फास्ट फुडनं रस्त्यावरची आणि पोटाची जागा व्यापली आणि
अनेक व्याधीचा जन्म झाला, असं मत वसंतराव नाईक
कृषि विद्यापीठाचं शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं
रानभाज्या महोत्सवात काल ते बोलत होते. रानभाज्या आरोग्यदायी असल्यामुळे असे
महोत्सव काळाची गरज असल्याची भावना अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काढण्यात
आलेल्या ७५ किलोमीटर तिरंगा सायकल रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून करण्यात आलं. ही तिरंगा सायकल राईड संत
नामदेव पोलीस कवायत मैदान इथून निघून सेनगाव, कोळसा,
सेनगाव, नंतर हिंगोली इथे पोहोचेल.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला
आहे. काल २८ लाख १ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या
लसीच्या २०७ कोटी ९९ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
//*********//
No comments:
Post a Comment