Sunday, 14 August 2022

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १४ ऑगस्ट २०२२ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१४ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. आज पहाटेच्या सुमारास मुंबईकडे जात असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मेटे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.   गंभीर जखमी मेटे यांना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

त्यांचा वाहनचालक आणि सुरक्षारक्षकाची प्रकृती गंभीर आहे. महामार्गावरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी बीड इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

***

बीड जिल्ह्यातल्या मांजरसुभा रस्त्यावरील बामदळे वस्ती जवळ चारचाकी आणि   टेम्पोचा अपघात होऊन यात सहा जण ठार झाले आहेत. .

  पुणे इथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी  जीवाची वाडी तालुका केज इथलं कुटे कुटुंब जात असताना बामदळे  वस्ती  इथे आज  सकाळी सात वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. चारचाकीमधल्या दोन लहान मुलांसह इतर चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत.

***

उत्तर मुंबईमधल्या कांदिवलीत अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्र संकुलात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं. शिल्पकार उत्तम पाचारणे यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती ब्राँझ धातूचा पुतळा तयार केला आहे.

***

राज्याचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज १० वा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज सकाळी ९ वाजता लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथल्या विलासबाग इथं प्रार्थना सभा घेण्यात आली. 

***

//*********//

 

No comments:

Post a Comment