Sunday, 21 August 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २६  लाख  ५८ हजारांहून नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०९  कोटी  ६७ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशात काल नव्या ११ हजारांहून अधिक कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर  १२ हजारांहून अधिक  रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९९ हजार आठशे एकोणाएंशी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ८८ कोटी २४ लाखांहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या २४ तासात ३ लाख ७ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना केंद्र सरकारनं आतापर्यंत २०० कोटी २८ लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या नि:शुल्क मात्रा उपलब्ध करुन दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या लसीच्या ७ कोटी ४ लाख मात्रा शिल्लक असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला प्रकृती अस्वास्थामुळे तळोजा कारागृहातून मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयाशी संबधित त्रासामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. इक्बाल कासकर याच्याविरोधात फारसे गंभीर गुन्हे नसल्याने तो पाकिस्तानमधून भारतात परतला होता. मात्र, त्यानं दाऊदची धमकी देत खंडणी वसूली सुरू केल्याचा आरोप आहे. त्याला ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये अटक केली होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांमधून सुरु असलेला विसर्ग आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास निम्म्यानं कमी करण्यात आला. ९ हजार ४३२ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद या वेगानं सुरु असलेला हा विसर्ग कमी करण्यात आला असून धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात ये असल्याचं धरण प्रशासनानं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावं असं ही सूचित करण्यात आलं आहे.

****

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना आमदार करा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिवसंग्राम टिकवण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी, असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

****

राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील बोगस प्रमाणपत्रधारक ३९ शिक्षकांची यादी माध्यमिक वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकानं प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांचं वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत ७ हजार ८८० उमेदवार बोगस प्रमाणपत्र धारक असल्याचं आढळून आलं.

****

औरंगाबाद शिवसेना शाखेच्या हर हर महादेव कावड यात्रा काढण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातल्या उल्कानगरी इथल्या ओम कारेश्वर महादेव मंदिरापासून ही कावड यात्रा निघाली. खडकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक आणि महाआरती केली जाणार आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं या कावड यात्रेत सहभागी झाले होते.

****

दिल्लीमधल्या अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि अन्य १२ जणांविरोधात लुक आउट नोटीस  जारी करण्यात आली आहे. तसंच या सर्वांच्या विदेश यात्रेलाही प्रतिबंध घालण्यात आला आहे. दिल्ली अबकारी धोरणासंदर्भातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काल गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं मनिष सिसोदियांच्या निवासस्थानासह अन्य ३० जागांची झडती घेतली आहे.

****

गणेशोत्सवानिमित्त राज्य परिवहन महामंडळ २ हजार ३१० जादा बसेस सोडणार आहे. २५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत या जादा बसेस चालवण्यात येणार असून समूह आरक्षणासाठी मुंबई विभागातून ६६७, पालघर विभागातून ३१३ आणि ठाणे विभागातून २८८, अशा एकूण १ हजार २६८ बसेस सोडण्यात येणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी ८७२ बसेस असणार आहेत. कोकणात जाताना घाट रस्ते असल्याने अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा घटना घडल्यास अथवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमुख स्थानकांत १०० अतिरिक्त बस गाड्यांचंही नियोजन करण्यात आलं आहे.

****

 

 

No comments:

Post a Comment