Sunday, 21 August 2022

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २१ ऑगस्ट २०२२ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी अर्थात आपली ओळख प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कॉमन सर्विस सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधारकार्ड आणि आधारकार्डला आपला मोबाईल क्रमांक जोडावा असं आवाहन वाशिम जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा  बारावा हप्ता  लाभार्थी शेतकऱ्यानं ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय मिळणार नसल्याचंही प्रशासनानं म्हटलं आहे.

****

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रातून हद्दपार होईल, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काल अकोला इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यावेळी बावनकुळे बोलत होते. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या कपोलकल्पित बातम्या आहेत,  ते महाराष्ट्रातच राहतील असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी यावेळी दिलं.

****

राज्यात येत्या तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काही भागात २३ ऑगस्ट पर्यंत यलो ऍलर्ट देण्यात आला असून, घाट माथ्यावर आणि कोकणात बहुतांश भागात पाऊस पडेल. मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज ही पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

****

जालना जिल्हयात महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा २३ ते २९ ऑगस्ट या कालावधीत येणार आहे. या यात्रेमध्ये जिल्हयातील जास्तीतजास्त विदयार्थी तसंच नवउदयोजकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचं संकेतस्थळ WWW.MSING.IN वर नोंदणी करावी, तसंच तालुकास्तरीय प्रचार-प्रसिध्दी अभियान किंवा जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जालना जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

No comments:

Post a Comment