Monday, 1 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रीमंड‍‍ळ बैठकीत लवकरच निर्णय घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

·      औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय, क्रीडा विद्यापीठ स्थापनेस ही मान्यता

·      मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाकडून मध्यरात्री अटक

·      “हर घर तिरंगा” मोहिमेत देशवासियांनी भाग घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

·      १६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर आता बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८४९ रुग्ण, मराठवाड्यात ६८ बाधित

·      बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन मध्ये अचिंता शेऊली आणि जेरेमी लालरिनुंगाला सुवर्णपदक. बिंदिया राणीला रौप्य पदक

अणि

·      भारत - वेस्ट इंडीजमध्ये आज दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना

****

मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनं बाधित शेतकरी, नागरिकांना तातडीनं  मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी काल पाऊस, अतिवृष्टी, पीकपाणी आणि विकासकामांचा विभागीय आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टी बाधित शेतजमिनींचे दोन ते तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं हे राज्य शासनाचं उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांना बँकांचं कर्ज तातडीनं उपलब्ध करुन देण्यात यावं, आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. औरंगाबाद इथं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या निर्णयासह या बैठकीतल्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले

‘‘संभाजीनगर येथे जे क्रीडा विद्यापीठ आहे ते क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर वेरुळ घृष्णेश्वर काही डेव्हलपमेंट मागणी येथे आली होती. नांदेड शहराच्या रस्त्यांच्याबाबतीमध्ये नगरोत्थान मधून काही प्रस्ताव पाठवलेले आहेत. परभणीतील समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईल त्यासाठी जे काही आपल्याला त्याच्यात अडचणी आहेत, त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. त्याचबरोबर नांदेड जालना समृध्दी हायवे आहे तो झाला पाहिजे. त्या तिथल्या लोकांना त्याचा बेनीफीट होईल. नांदेडमध्ये भुमीगत गटार योजना जी आहे, ती मंजूर करण्यात येईल. औंढानागनाथ मंदीरासाठी विकास निधी, जिल्हा सामान्य रुग्णालय जे लातूरचं आहे, त्याच्यामध्ये मोफत जमीन त्यासंदर्भात ज्याकाही अडचणी आहेत, त्या आपण दूर करु. घाटी जे हॉस्पीटल आहे, त्याचं प्रायव्हटायझेशन होता कामा नये. त्याचा सकारात्मक निर्णय आपण घेतलेला आहे.’’

****

औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे आता औरंगाबादच्या रहिवाशांना लवकरच एक दिवसाआड पाणीपुरवठा करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. १०० कोटी रुपये खर्चाच्या पडेगाव ते समृद्धी महामार्गासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्या गटात किंवा भारतीय जनता पक्षात येऊ नका, असं उपरोधिक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.

दरम्यान, काल सकाळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं ग्रामदैवत संस्थान गणपतीचं दर्शन घेऊन औरंगाबाद दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरात आचार्य श्री पुलकसागर यांची त्यांनी भेट घेतली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीज आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं औरंगाबाद इथं राज्यस्तरीय व्यापार परिषदेला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. वस्तू आणि सेवा कर जीएसटी, प्लास्टिक बंदी आणि बाजार समिती एपीएमसी कायदा हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांनी काल रात्री सिल्लोड इथं जाहीर सभेला संबोधित केलं. राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.संऔरंगाबाद शहरातल्या टी.व्ही.सेंटर परिसरातल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

****

महसूल विभागाचा आकृतिबंध आणि पदभरतीसंदर्भात मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेनं काल मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिलं. महसूलव्यतिरिक्त अधिकच्या कामांमुळे कर्मचाऱ्यांच्या णावात वाढ होत आहे. जुना आकृतिबंध आणि रिक्त पदांमुळे कामं मुदतीत पूर्ण होत नसल्यानं नवीन आकृतिबंध मंजूर होईपर्यंत सध्या मंजूर असलेली १०० टक्के पदं तात्काळ भरण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****

मराठा समाजातल्या सामाजिक आणि अर्थिकदृष्या मागास तरुणांना संबंधित प्रवर्गांमधून नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलं.

****

औरंगाबाद नामांतरासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. शहराचं नाव बदलण्यात येऊ नये, अशा आशयाचं निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलं. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचंच असेल, तर नवीन शहर स्थापन करा. त्याचं आम्ही स्वागत करू, असं खासदार इम्तियाज माध्यमांशी बोलताना म्हणाले.

****

मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीनं मध्यरात्री अटक केली. काल सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घरी दाखल होत त्यांची चौकशी सुरू केली होती. नऊ तास चौकशी केल्यानंतर पथकानं त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर परत त्यांची चौकशी करुन अखेर मध्यरात्री अटक करण्यात आली. आज सकाळी साडे अकरा वाजता राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक निदर्शनं करत असून, पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे.

****

१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित “हर घर तिरंगा” या मोहिमेत देशवासियांनी भाग घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी काल देशवासियांशी संवाद साधला. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा ९१वा भाग होता. या काळात, आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा किंवा आपल्या घरात लावावा. दोन ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्ट पर्यंत आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाल पिक्चर्स मध्येही तिरंगा लावून मोहिमेत उत्साह भरावा, असं ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानं आता एका लोकचळवळीचं रूप घेतलं आहे. विविध क्षेत्रांतले, समाजाच्या प्रत्येक वर्गातले लोक यानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत हे उत्साहवर्धक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

****

१६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, मात्र आजच्या कामकाज तालिकेमध्ये या याचिकांचा समावेश केलेला नाही, त्यामुळे ही सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८४९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ४७ हजार ४५५ झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १०४ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल एक हजार ८५३ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ८६ हजार ३४८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ टक्के झाला आहे. राज्यात सध्या १३ हजार तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या बीए फोर प्रकाराचे १०, बीए फाईव्ह प्रकाराचे ५२, तर बी ए टू पॉईंट सेवन फाईव्हचे ७९ रुग्ण आढळले. राज्यात बीए फोर आणि बीए फाईव्ह रुग्णांची संख्या आता २५८, तर बी ए टू पॉईंट सेवन फाईव्हच्या रुग्णांची संख्या १९९ झाली आहे.

****

मराठवाड्यात काल ६८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २७, जालना १८, नांदेड १२, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या ११ रुग्णांचा समावेश आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानामुळे, दुबार पेरणीसाठी शासनानं विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी, अंबाजोगाई या तालुक्यात त्यांनी काल पीक पाहणी केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यावेळी उपस्थित होते. सुमारे तीन हजार सहाशे हेक्टरवरच्या सोयाबीन पिकाचं गोगलगायींनी शेंडे खाऊन नुकसान केलं आहे. गोगलागायींच्या प्रादुर्भावाचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करण्यासह दुबार पेरणीसाठी मदतीची मागणी पवार यांनी केली.

****

दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणांत राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयएनं काल देशभरात १३ ठिकाणी छापे टाकले. त्यात महाराष्ट्रात नांदेड आणि कोल्हापूर इथं छापा टाकण्यात आला असून, कोल्हापूर इथं दोन जणांना ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. भारोत्तोलन मध्ये पुरुष गटात अचिंता शेऊलीनं ७३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. २० वर्षीय अचिंतानं ३१३ किलो वजन उचलून ही कामगिरी केली. तर १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा यानं पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं.

५५ किलो वजनी गटात भारताच्या बिंदिया राणीनं रौप्य पदक पटकावलं. बिंदियानं स्नॅचमध्ये ८६, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११६ किलो, असं एकूण २०२ किलोंचं वजन उचलून स्पर्धेत विक्रम नोंदवला.

अन्य स्पर्धांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी महिला संघाचा पराभव केला. टेबलटेनिसमधे भारताच्या पुरुष संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे, तर महिला मुष्टीयोद्धा निखात झरीननं ५० किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांमधे शिवा थापाला मात्र आज पराभव पत्करावा लागला.

बॅडमिंटनमध्ये अश्विनी पोनप्पा आणि सुमित रेड्डी यांच्या जोडीनं मिश्र दुहेरी प्रकारात उपान्त्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या जोडीचा २१-९, २१-११ असा पराभव केला.

भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं आहे.  

****

सांगली इथला भारोत्तोलक संकेत सरगर याला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल औरंगाबाद इथं ही घोषणा केली. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी अभिनंदनीय आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. संकेतच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकून एक शून्य अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, १८ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या झिम्बाबे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयनं क्रिकेट संघाची काल घोषणा केली. या दौऱ्यात शिखऱ धवनकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेनंतर २२ ऑगस्टला भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराताला रवाना होईल.

****

No comments:

Post a Comment