Monday, 1 August 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीनं मध्यरात्री अटक केली असून, साडे अकरा वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घरी दाखल होत त्यांची नऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं.

****

देशात मंकिपॉक्सचे काही रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एका कृती दलाची स्थापना केली आहे. हे कृती दल मंकिपॉक्सच्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेऊन उपाययोजना सुचवणार आहे, तसंच उपचार सुविधा आणि मंकिपॉक्सवरील लसीच्या संशोधन आणि शक्यता पडताळून पाहणार आहे. देशात आतापर्यंत मंकिपॉक्सचे चार रुग्ण आढळले आहेत.

****

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले नेते असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या एकशे दोनाव्या पुण्यतिथीनिमित्त, तर मराठी साहित्यात उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.

****

दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणांत राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं काल देशभरात १३ ठिकाणी छापे टाकले. त्यात महाराष्ट्रात नांदेड आणि कोल्हापूर इथं छापा टाकण्यात आला असून, कोल्हापूर इथं दोन जणांना ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात पूर्व प्राथमिक इयत्ता पाचवी आणि माध्यमिक इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, एकूण २९ हजार ३६५ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार १२३ विद्यार्थ्यांनी काल परीक्षा दिली. विद्यार्थ्यांचं हे प्रमाण ९१ टक्के असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन मध्ये पुरुष गटात भारताच्या अचिंता शेऊलीनं ७३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. २० वर्षीय अचिंतानं ३१३ किलो वजन उचलून ही कामगिरी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रदान नरेंद्र मोदी, क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी अचिंता शेऊलीचं अभिनंदन केलं आहे.

//**********//

 

No comments:

Post a Comment