Tuesday, 2 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही

·      केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रशासनानं परस्पर समन्वय ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      मुंबई आणि मराठी माणसांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची क्षमायाचना

·      देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल, राजकीय पक्षांसोबतच जनतेनेही विचार करण्याची गरज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

·      िवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

·      गटआणि गटसंवर्गातल्या स्पर्धा परीक्षेसाठी एकच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षाघेण्याचा राज्य लोकसेवा आयोगाचा निर्णय

·      जेष्ठ पत्रकार राज्याचे माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचं निधन  

अणि

·      राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्य पद

****

जागतिक पातळीवरच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर सरकार आपली अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. लोकसभेत काल महागाईच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कोविड काळातही भारत ही सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था ठरली असून, जगाच्या तुलनेत भारताला मंदीचा फटका तीव्र स्वरूपात बसला नाही. असं सीतारामन यांनी सांगितलं. महागाईवर बोलताना काँग्रेस सरकारच्या काळात महागाईचं प्रमाण किती होतं, याची तुलना केल्याशिवाय मोदी सरकारच्या काळात महागाई नियंत्रणात ठेवली गेली की नाही, हे समजणार नाही, सं त्या म्हणाल्या़,  खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी पाम तेल, तसंच सोयाबीन, सूर्यफूल तेलावरील आयातकर कमी करण्यात आला, खाद्यतेलांच्या आयातीवरील नियंत्रणही काढून टाकलं आहे, आता खाद्यतेल कितीही प्रमाणात आयात करता येतं, त्यामुळे खाद्यतेलांचे दर कमी होऊ लागले आहेत, असं त्यांनी नमूद केलं. महागाई आटोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचं, सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी या विषयावर चर्चेला सुरुवात करताना, नोटबंदी आणि वस्तू आणि सेवाकर अंमलात आणल्याबद्दल सरकारला खडे बोल सुनावले. या चर्चेत द्रमुकच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसकडून काकोली घोष दस्तीदार, बसपाच्या संगीता आझाद, बिजू जनता दलाकडून पिनाकी मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर खासदारांनी भाग घेतला.

****

केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रशासनानं कार्यक्षमता वाढवावी, तसंच परस्पर समन्वय ठेवावा, अशी सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह योजना अंमलबजावणीसंदर्भात काल मुंबईत प्रशासकीय आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना त्यांनी केली. राज्यातल्या सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांचं पत्र पाठवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. मराठवाडा ग्रीडविषयी एक संपूर्ण सादरीकरण करावं, जलजीवन मिशनला वेग द्यावा, तसंचहर घर नल से जलची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे, याकडे लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

मुंबई आणि मराठी माणसाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी क्षमा मागितली आहे. सदर भाषणात आपल्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल, तर महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून, राज्यातील जनता, या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन, आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो, असं राज्यपालांनी याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असून, आता राजकीय पक्षांसोबतच जनतेनेही विचार करण्याची गरज असल्याचं मत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेना पक्षप्रवक्ते खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रादेशिक पक्ष संपवण्याचं भाजपचं धोरण असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पाठोपाठ भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचं विधानही भाजपच्या याच धोरणाचं सुतोवाच करत असल्याचं, उद्धव ठाकरे म्हणाले.

****

दरम्यान, संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत महसूल संचालनालय- ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर मध्यरात्री राऊतांना ईडीनं अटक होती. त्यानंतर काल, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात राज्यात शिवसेनेच्या वतीनं काल ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

****

राज्य लोकसेवा आयोगानं राज्यसेवेसह गटआणि गटसंवर्गातल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती होणाऱ्या सर्व पदांसाठी,महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षाया नावानं, एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करतानाच, उमेदवारांकडून विविध पदांसाठीचे पर्याय मागवले जातील. त्यानुसार भरती करायच्या पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची संख्या निश्चित केली जाईल, आणि प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल. राजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची विविध पदांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाईल.

अराजपत्रित गटआणि गटसंवर्गासाठीहीमहाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षाया नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा होईल. पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षांपासून हे बदल लागू होणार आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८३० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ४हजार २८५ झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १० इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल एक हजार २४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ८हजार ३७२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल औरंगाबाद जिल्ह्यात आठ, तर नांदेड जिल्ह्यात सहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.

****

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' उपक्रमात, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

औरंगाबाद तालुक्यातल्या तीसगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते काल राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तीसगावचे उपसरपंच नागेश कोठारे यांनी आनंद व्यक्त करत सर्वांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...

‘‘खूप आनंदाची बाब आहे आमच्या गावासाठी. पूर्ण जिल्हाभरामधून आमच्या गावामध्ये पहिल्यांदा माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आम्हाला वितरीत करण्यात आले. यासाठी आम्ही तीन हजार झंड्यांची खरेदी केलेली असून आम्ही आमच्या गावामध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणात व्यापक जनजागृती करून प्रत्येकाने आपल्या घरावर हा राष्ट्रध्वज फडकवावा असं आम्ही सर्वांना आवाहन करणार आहोत.’’

                                   ****

जालना जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात उमेद स्वयं सहायता गटानं स्थापन केलेल्या ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ, काल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी होत आपल्या घरावर तिरंगा फडकावा, असं आवाहन जिंदल यांनी केलं.

****

तिरुपतीला दर्शनासाठी गेलेल्या हिंगोली इथल्या भाविकांच्या वाहनाला कर्नाटकात अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. बंगळुरू महामार्गावर चित्रदुर्ग इथं रविवारी ही दुर्घटना घडली. गंभीर जखमींना चित्रदुर्ग इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे भाविक डोंगरकडा इथले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जेष्ठ पत्रकार आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेले धारुरकर यांनी, तरूण भारत वृत्तपत्राचे संपादक म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं प्रताप नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धारूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत काल चौथ्या दिवशी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्य पदक मिळाली.

जुदो मध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सुशीला देवीनं रौप्य पदक पटकावलं, तर पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात विजय कुमार यादवनं तर भारोत्तोलनात महिलांच्या ७१ किलो वजनी गटात हरजिंदर कौरनं कांस्य पदक जिंकलं.

बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र सांघिक प्रकारात भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

हॉकी मध्ये भारतीय पुरुष संघाचा इंग्लंडसोबतचा सामना बरोबरीत सुटला.

लॉन बॉल या खेळात भारतीय महिलांचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोचला आहे. लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रुपा राणी यांच्या संघानं आज उपांत्य फेरीतल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला १६-१३ ने पराभूत केलं.

पुरुष बॉक्सिंगमध्ये अमित पंल आणि हुसाम उद्दिन मोहम्मद यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

जलतरणमध्ये ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात भारताचा श्रीहरि नटराजन अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

या स्पर्धेत भारत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदक जिंकून पदक तालिकेत सहाव्या स्थानवर आहे. 

****

दुसऱ्या टी - टे्वेन्टी क्रिकेट सामन्यात काल वेस्ट इंडीनं भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं विसाव्या षटकात सर्वबाद १३८ धावा केल्या. प्रत्युत्तरावेस्ट इंडिजच्या संघानं विसाव्या षटकात पाच गडी गमावत १४१ धावा केल्या. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानं एक - एक अशी बरोबरी साधली आहे.  

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी केली. यावेळी अनेक शेतात पाणी साचलेलं असून पिकांचं पूर्णपणे नुकसान झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे याचे पंचनामे करुन या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवण्याच्या सूचना, आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

****

No comments:

Post a Comment