Tuesday, 2 August 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावर आपलं प्रोफाईल पिक्चर बदललं असून, सर्व देशवासियांनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंगा ठेवावा असं आवाहन केलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज आपल्या तिरंग्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण देश हर घर तिरंगा या गौरवशाली मोहिमेसाठी सिद्ध झाला असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रध्वजाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिंगळी व्यंकय्या यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक मंत्रालयानं नवी दिल्ली इथं तिरंगा उत्सव या सांस्कृतिक-संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

****

मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालिह चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ते आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

****

दिल्लीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय नायजेरियन नागरिकाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. हा इसम नुकताच परदेशी प्रवास करून आला होता. मंकिपॉक्स या आजाराचा हा देशातला सहावा तर दिल्लीतला दुसरा रुग्ण आहे.

****

देशात या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून फाईव्ह जी टेलिकॉम सेवा सुरू होण्याची शक्यता, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. फाईव्ह जी स्पेक्ट्रमच्या लिलावादरम्यान एक लाख ५० हजार कोटीपेक्षाही जास्त किंमतीच्या बोली लावल्या गेल्या, असं त्यांनी सांगितलं.

****

मोठ्या प्रमाणात संहार करणारी शस्त्रास्त्रं आणि त्यांच्या वितरणाबाबत बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध करणारं दुरुस्ती विधेयक, काल राज्यसभेत मंजूर झालं. जैविक, रासायनिक आणि अण्विक शस्त्रास्त्रांचं उत्पादन, वाहतूक, हस्तांतर इत्यादी बाबत बेकायदेशीर कारवायांना, तसंच त्यासाठी वित्त पुरवठा करण्याला आळा घालण्याची तरतूद या विधेयकात आहे.

****

आयकर विवरणपत्र भरण्यासाठी असलेल्या ३१ जुलै पर्यंतच्या मुदतीदरम्यान एकूण पाच कोटी ८३ लाखांहून अधिक विवरणपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती, आयकर विभागानं दिली आहे. काल शेवटच्या दिवशी विक्रमी ७२ लाख ४२ हजार विवरण पत्र दाखल झाली असल्याचं विभागानं सांगितलं आहे.

//**********//

 

No comments:

Post a Comment