Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 03 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
१६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध
याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिंदे सरकारच्या आणि
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका, तसंच शिंदे गटातल्या
आमदारांना ठाकरे गटानं अपात्र ठरवणं, त्याचवेळी आपलाच गट अधिकृत असल्याबद्दल शिंदे
गटानं दाखल केलेली याचिका या सर्वांवर एकत्रित सुनावणी होत आहे.
****
संसदेच्या
पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं. कामकाज
सुरु होताच, काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर
छापा टाकल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरुन सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानं
सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर ऊर्जा
संवर्धन सुधारणा विधेयक २०२२ लोकसभेत सादर करण्यात आलं. यादरम्यान देखील विरोधकांची
घोषणाबाजी सुरुच राहील्यानं सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
नवी दिल्लीत आयोजित तिरंगा बाईक रॅलीला उपराष्ट्रपती एम
व्यंकय्या नायडू यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर
ही रॅली काढण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पियुष गोयल यावेळी उपस्थित होते.
****
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय
लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मायावती
यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. तर झारखंड मुक्ती मोर्चाने
विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २३ लाख ४९ हजार ६५१
नागरीकांचं लसीकरण झालं. दरम्यान, देशात काल नव्या १७ हजार १३५ कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, तर १६ हजार ११२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ३७ हजार ५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
लातूर
जिल्ह्यातले सर्व शासकीय निमशासकिय, खाजगी कार्यालये, सर्व शासकीय आणि खाजगी शाळा, महाविद्यालयं तसंच खाजगी शिकवणी वर्ग इत्यादी तंबाखूमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी.पी. यांनी दिले आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत
जिल्हास्तरीय समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यातल्या कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रवेश करण्याच्या आधी सर्व प्रकारचे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ पेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे, कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास संस्था प्रमुखामार्फत
दोनशे रुपये दंड आकारला जाऊ शकतो, असं जिल्हाधिकार्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत
चौधरी यांनी काल डॉ. अस्तिककुमार पांडेय यांच्याकडून पदभार स्वीकारला.
महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यासाठी
प्राधान्य देण्यासह, शहराचा नवा विकास आराखडा, औरंगाबाद शहरासाठीची महत्त्वकांक्षी पाणीपुरवठा योजना आणि स्मार्टसिटीच्या
योजनांसाठी पाठपुरवठा करणार असल्याची ग्वाही, त्यांनी यावेळी
दिली.
****
वीज कोसळून होणारे मृत्यू टाळण्यासाठी स्मार्ट फोनमध्ये दामिनी ॲप इंस्टाल करून
घेण्याचं आवाहन, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलं
आहे. पुणे इथली भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था,
आणि भारतीय हवामान विभागानं हे ॲप विकसित केलं आहे. वीज पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी
सुरक्षा बाबींचं पालन केलं तर जीवित तसंच वित्त हानीपासून बचाव करता येऊ शकतो,
असं शर्मा यांनी म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे इथं आज राज्य राखीव पोलिस दलाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाच्या
प्रसारासाठी पथसंचलन करण्यात आलं. घरांवर तिरंगा झेंडा लावण्यासाठी
यातून जनजागृती करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून
पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. धरणाचे सहा दरवाजे आज बंद
करुन तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
सध्या धरणाच्या दोन दारातून सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एक हजार
४८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं, तर जलविद्यूत केंद्रातून एक हजार
५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसानं गेल्या पाच दिवसानं उघडीप दिली आहे. त्यामुळे
धरणात पाण्याची आवक मंदावली असून सध्या चार हजार १३३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
दाखल होत आहे. नाथसागर धरणाचा पाणीसाठा सध्या ९० टक्के असल्याची
माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.
//**********//
No comments:
Post a Comment